Next
अवाढव्य, अफाट हिमालय..
BOI
Saturday, November 25 | 09:45 AM
15 0 0
Share this story

हिमालय पर्वत

समुद्राच्या गाळापासून पर्वत निर्माण होणं हा निसर्गाचा आविष्कार आहे, चमत्कार आहे. यावरून हे विश्व किती अफाट आहे आणि आपण आपलं आयुष्य त्याच्यासमोर किती छोटं करून ठेवलं आहे याची जाणीव होते. हा हिमालय असाच अवाढव्य, अफाट, गूढ आहे. स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा पाचवा भाग...
............................... 
राष्ट्रीय महामार्ग - एकमी बसमध्ये असुखावह अवस्थेत बसलो होतो. माझ्या शेजारी माझ्याहून डबल साईजचा एक गृहस्थ खिडकीच्या सीटवर बसला होता. पृथ्वीवर जशी एक तृतीयांश जागा समुद्राने व्यापली आहे, तशी सीटची अर्ध्याहून जास्त जागा त्याने व्यापली होती. जम्मू आणि काश्मीरमधील सरकारी बसेस खूपच अनकम्फर्टेबल होत्या. सीट्स छोट्या आणि अरुंद होत्या. बसल्यावर गुडघ्याला समोरची सीट लागत होती. माझी चांगली आरक्षित केलेली आरामशीर विंडो सीट गेली म्हणून मी मात्र आतल्या आत चरफडत होतो. पण करणार काय..! जस-जशी बस समोर उत्तरेकडे जात होती, निसर्गाचं सुंदर रूप आणखी खुलून दिसत होतं. तीन-चार मोठे बोगदे पार केल्यानंतर कटराचा फाटा मागे गेला आणि थोड्या वेळातच कच्चा रस्ता सुरू झाला. हा कच्चा रस्ता म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एक होता. राष्ट्रीय महामार्ग असूनही हा रस्ता बहुतेक वेळेस  कच्चा असतो, कारण दरवर्षी रस्ता पावसाने वाहून जातो. 

गाडीने एक वळण घेतलं आणि त्या वेळी समोर असलेलं दृश्य भयकंपित करणारं होतं. एका मोठ्या खोलीच्या आकारपेक्षाही मोठ्या, अवाढव्य शिळा रस्त्यालगत होत्या. अनेक जेसीबी मशीन्स दिसत होत्या. ओल्या मातीचे खूप मोठे मोठे ढिगारे रस्त्याच्या बाजूला लावले होते. साहजिक ती माती,  दगड, खडक, शिळा हे पावसामुळे पर्वतावरून खाली आले होते. ते बघून धडकीच भरत होती. वरून हा मलबा खाली येत असताना, रस्त्यावरून जर एखादी गाडी जात असेल तर काय होऊ शकतं याचा विचारच करवत नव्हता. परवा असंच झालं होतं. ते नेमकं काय झालं असेल याचा आता अंदाज येत होता. दोन दिवस यात्रा बंद होती,  हा हायवे बंद केला होता. ते सगळं किती योग्य होतं हे आता पटत होतं. पर्वतांची झीज होतेय, जंगलं नष्ट होताहेत. त्यामुळे पाऊस पडत असताना पर्वतावरुन प्रचंड चिखल खाली येतो. 

हिमालय हा अवाढव्य पर्वत आहे. भारतातील तो एक प्रमुख पर्वत आहे. पण तो तेवढाच आतून नाजूक आहे. तो अजूनही नवा आहे. अजुनही 'डेव्हलप' होतोय. विश्वाच्या जडणघडणीत पर्वतमाला निर्माण होत गेल्या. जगभरातील पर्वतांमध्ये हिमालय हा नाजूक आणि तरुण पर्वत समजला जातो. त्याची वाढ, त्याच्या हालचाली अजूनही सुरू आहेत. हिमालय हा पर्वत नाजूक असण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे हा पर्वत गाळापासून बनला आहे. मोठमोठ्या भूगर्भीय हालचाली, घडामोडी होऊन समुद्रातील गाळापासून हा पर्वत निर्माण झाला आहे. भिंतीवर कपाळ आपटल्याने किंवा मुले खेळताना त्यांच्या डोक्यांची टक्कर होऊन कपाळावर किंवा डोक्याला टेंगुळ येतं. त्याचप्रमाणे पृथ्वीवरचं टेंगुळ म्हणजे पर्वतरांगा .

हिमालय पर्वतभारतीय द्वीपकल्प दीड कोटी वर्षांपूर्वी वाहवत उत्तरेकडे सरकत गेला. तिकडून ऑस्ट्रेलिया प्रस्तरही सरकत गेलं. या दोन प्रस्तरांची टक्कर झाली. त्यातून तत्कालीन टेथीस नावाचा समुद्र नष्ट झाला. त्याचा गाळ हलका असल्याने दाब निर्माण झाल्यानंतर तो वर आला व त्यातून हिमालायची निर्मिती झाली. गाळाची जमीन असल्यामुळे हा हिमालय वृक्ष, वनौषधींचा खजिना आहे, पण आतून हा सुकुमार आहे. भूकंपाचे धक्के सहन करू शकत नाही. सहज हादरतो. आजही भारतीय द्वीपकल्प प्रस्तर तिबेटच्या पठाराखाली दरवर्षी पाच मिलिमीटर इतक्या वेगाने आत सरकत आहे. त्यामुळे आजही हिमालयाची निर्माण होण्याची प्रक्रिया सुरूच आहे. तो वर सरकतोच आहे. म्हणून हिमालयीन प्रदेश नाजूक आहे. तिथे भूकंप होत राहतात. त्या मानाने काळा सह्याद्री जास्त पक्का आहे. हिमलयासमोर या पश्चिम पर्वतरांगा छोट्या आहेत पण आतून त्या खडक, काळ्या दगडाने निर्माण झाल्या आहेत. म्हणून सहयाद्री हिमालयासारखा अन्स्टेबल नाही. हिमालयात सतत लँड स्लाइड्स म्हणजे कडे कोसळत असतात. पावसात इथे परिस्थिती नाजूक होते. पण हा निसर्ग आहे. समुद्राच्या गाळापासून पर्वत निर्माण होणं हा निसर्गाचा आविष्कार, चमत्कार आहे. यावरून हे विश्व किती अफाट आहे आणि आपण आपलं आयुष्य त्याच्यासमोर किती छोटं करून ठेवलं आहे याची जाणीव होते. त्यामुळे हिमालयाला त्याच्या आतून सुकुमार असण्याला आपण दोष देऊ शकत नाही. तो जसा आहे तसा अवाढव्य, अफाट, गूढ आहे. 

रस्त्यात उंचावर घरे बांधलेली दिसत होती. लोक आश्चर्यचकित होऊन कौतुक करत होते. मला मात्र हिमालयासाठी, निसर्गासाठी वाईट वाटत होतं. मनुष्याच्या हव्यासाची चीड येत होती. शिमल्याला गेल्यावर पर्वत दिसतंच नाहीत. दिसतात ती फक्त एकमेकांना खेटून असलेली पर्वतावर वसलेली घरं. लोक शिमला मनाली या भागात हिमाचल प्रदेश म्हणून फिरायला जातात, पण फक्त कचरा, घाण व निसर्गाची अवहेलना करतात. तिथे गेल्यावर तिथल्या हिमालयाचं, तिथल्या निसर्गाचं खूप ओंगळवाणं रूप समोर येतं. त्यामानाने काश्मीरचा निसर्ग बऱ्यापैकी स्वच्छ आणि सुंदर आहे. तरीही रस्त्यात अधून मधून पर्वतावर बांधलेली घरं दिसत होतीच. त्या वेळी निसर्गाचं अत्यंत रौद्र रूप आजूबाजूला होतं. तिथला चिखल मलबा, अवाढव्य शिळा धडकी भरवत होत्या. अनेक झाडे उन्मळून पडली होती. ती रस्त्याच्या कडेला लावली होती. हे सगळं माणसाने एकजुटीने काम करण्याने शक्य होतं. निसर्ग आणि मानव दोन्हींच्या शक्तीला तेव्हा मनोमन दंडवत करावासा वाटत होता.

काळजीची गोष्ट ही होती, की तेव्हाही वरून माती आणि छोटी दगडं घरंगळुन खाली येत होते. मी खिडकीतून निरीक्षण करत होतो. वाहतूक खूप असल्याने काही मिनिटे बस थांबली तेव्हा डावीकडून वरून एक पंजाएवढा मोठा दगड वेगाने खाली घरंगळत आला. बॉउन्स होत बसवर येऊन आदळला. लोक झोपले होते. 
आजूबाजूला हिरवीगार सृष्टी होती. थोडयाच वेळात माझंही हो हो - नाही नाही सुरू झालं. डुलकी लागली. दोन तास झाले असतील बस थांबली. ड्रायव्हरने मोठ्यांदा आवाज टाकला, ‘चलो लंगर है..! जिसे खाना है खा लिजीए! चालीस मिनिट गाडी रुकेगी!’

बाहेर जाण्याचा कंटाळा आला होता. पण बाहेर दातृत्वाचं विलक्षण दर्शन झालं. असं असलं, तरी पुन्हा एक अडचण माझा पिच्छा काही सोडत नव्हतीच. पुन्हा ती मुरडून आलीच.

(क्रमशः) 
- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ हा ट्रॅव्हलॉग दर शनिवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/V6rLmU या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sharvari Kulkarni About
सुंदर 💐
1
0

Select Language
Share Link