Next
प्रवास एकटीचा...
BOI
Sunday, May 27, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story


त्यानं मला विचारलं, ‘आप लिखती हो?’ मी साशंकपणे त्याच्याकडे पाहिलं. त्यानं पुन्हा विचारलं, तेव्हा मी हो म्हणाले. ‘बस ऐसेही लगा, की आप लिखती होगी. आप मुंबई के है क्या? आपके यहॉं रिश्तेदार है क्या?’ तो हे सारं निव्वळ कुतूहलानं विचारत होता, हे कळत होतं... वाचा ‘हॅशटॅग (##) कोलाज’मध्ये...
...............
दुपारचे चार वाजले होते. जयपूरच्या पिंक प्रेसक्लबजवळ मी उभी होते. समोरून वेगवेगळ्या ठिकाणांसाठी एसटी धावत होत्या. मला दिल्लीला जायचं होतं म्हणून मी एकाच वेळी दिल्लीच्या बसची आणि जयपूरमधल्या फोटोग्राफर-पत्रकार असणाऱ्या प्रवीण भोजने यांची वाट पाहत होते. भूकही लागली होती; पण आता जेवत बसायला वेळ नव्हता. तितक्यात प्रवीणदादा आले. त्यांना मी पहिल्यांदाच भेटत होते. माझ्या एका रिपोर्ताजसाठी महाराष्ट्रातून आले असल्याने मूळचा महाराष्ट्रीय असणाऱ्या या दादाने, ‘भेटून मगच जा,’ म्हणून गळ घातली होती. मला भेटल्या भेटल्या त्यांनी माझी बॅग ताब्यात घेतली आणि म्हणाले, ‘काही खाल्लं नसशीलच, चल पटकन, प्रेस क्लबमध्ये. जेवून मगच पुढे हो.’

मी आपली ‘नाही, नको, उशीर होईल’चा पाढा घेऊन बसले होते. तसे ते थोडे अधिक आग्रही होत म्हणाले, ‘पुढे आणखी पाच-सहा तास आहेत. असा तसा तुला एवढा वेळ काढायचा आहे तर जेवून घे. जेवणाशिवाय कामं करू नयेत’ आणि ते चालू लागले. तशी मीही गपगुमान त्यांच्या मागे चालू लागले. प्रेस क्लबमध्ये पंधरा मिनिटांत जेवण उरकलं आणि तेवढाच वेळ आम्ही गप्पा मारल्या. त्यांनी जयपूरमधील पत्रकारिता, तिथले लागेबंधे, काम करण्याच्या पद्धती, प्रेसक्लबमधील राजकारण असं बरंच काही सांगितलं. मग पुन्हा स्टॅण्डवर परतलो. अर्धा तास उलटला तरी एसटी बस किंवा एसी बस कशाचाच पत्ता नव्हता. पाच-सव्वा पाच झाले होते. तेवढा पूर्ण वेळ माझी बॅग हातात घेऊन प्रवीणदादा सोबत उभे होते. एक एसटी आली; पण ती खचाखच भरली होती. मला ती सोडताही येणार नव्हती. कारण पुन्हा दिल्लीत पोहोचायला उशीर होण्याची भीती होतीच. पाच वाजताची ही बस किमान दहा-साडेदहापर्यंत पोहोचेल अशी आशा होती. मी घाई करून त्यात चढले. शेवटच्या बाकड्यावर जागा मिळाली.

‘पुढच्या वेळेस येशील तेव्हा आपल्याच घरात राहायचं. इथं एक घरं आहे हे विसरायचं नाही. दिल्लीत पोहोचल्यावर फोन कर. तिथं काही अडचण आल्यास कळव.. पुढे कुठं जाणार आहेस, तिथंही काही लागलं तर लगेच फोन कर. मी होईल ती मदत करेन,’ असं आश्वासन प्रवीणदादा वारंवार देत राहिले. यापुढे जाऊन जेव्हा त्यांनी मला विचारलं, ‘तिकिटाला आणि प्रवासाला पुरतील इतके पैसे आहेत ना..?’ तेव्हा तर मला फारच भारी वाटलं. मी कुठंतरी परक्या राज्यात आहे, ही जाणीव तत्क्षणी कुठंतरी भुर्र्रुकन उडून गेली. आम्ही दोघं पहिल्यांदाच भेटत होतो. भेटण्याच्या अगदी आदल्या दिवशी मला त्यांचा संपर्क क्रमांक मिळाला होता आणि तिथला एक पत्ता माहिती करून घेण्यासाठी मी त्यांना फोन केला होता. एवढीच काय ती आमची ओळख; पण त्यांचं हे असं आपुलकीचं वागणं मला खूपच आश्वासक वाटलं. 

दिल्लीत मला ‘झांशी की रानी सर्कल’ला उतरायचं होतं. कंडक्टरशी तशी बस कुठं थांबते वगैरे विचारणा झाली होती. स्टॉप जवळ आला की सांगा, हेही मी त्याला सांगून ठेवलं. एव्हाना माझ्या बाकावरच्या आणि पुढच्या दोन बाकांवरच्या माणसांना कळून चुकलं होतं, की मला कुठं उतरायचं आहे. एसटीने वेग घेतला. शेवटच्या बाकावर मी एकटीच मुलगी होते माझ्या उजव्या हाताला एक कॉलेजातलं पोरगं आणि डाव्या हाताला तीन-चार पुरुष माणसं. कॉलेजातल्या पोराला म्हटलं, कॉलेज जाते हो.. त्यावर त्यानं होकारार्थी मान हलवत असं काही पाहिलं, की मी पुढं काहीच बोलले नाही. मला जजमेंटल व्हायचं नाहीये; पण त्याच्या नजरेत काहीतरी होतं, जे मला मी मर्यादा ओलांडते टाइप काहीतरी फील करवून देणारं होतं. मीही सरळ दुर्लक्ष केलं. एसटीतले दिवेही बंद झाले. बाहेर काळोख-आत काळोख. नाही म्हणायला लोकांच्या स्क्रीनवरच्या लाइटी नाचत होत्याच. 

कुठल्याश्या एका स्टॉपला कॉलेजवालं पोरगं उतरलं आणि मला खिडकीची जागा मिळाली. आठ वाजले असतील, पुढच्या एका  स्टॉपवर एक मुलगी चढली. माझ्याशेजारी बसली. माझ्यात कुणाशी काहीही बोलायचं अवसान नव्हतं. मी शांत बसून खिडकीबाहेरचा काळोख बघत राहिले. ड्रायव्हरने एका थांब्यावर बस थांबवली. मीसुद्धा अशा थांब्याची बऱ्याच वेळेपासून वाट पाहत होते. माझ्या शेजारची मुलगीसुद्धा तितक्याच लगबगीने उठली. खाली उतरून आम्ही एकमेकींकडे पाहिलं आणि न बोलता एकत्रित टॉयलेट शोधलं. बसपाशी परतलो तेव्हा ड्रायव्हर-कंडक्टर जेवत होते. बाकी प्रवासीही काहीतरी घेत होते. मी दोन चहा घेतले. तिला एक दिला. थंडीच इतकी होती, की चहाशिवाय काही पर्याय नव्हता. मी तिची जुनी मैत्रीण असावी, तसं तिनंही न बोलता हसून चहाचा ग्लास हातात घेतला. मला तिचं ते स्मित भारी आवडलं. ओळख-पाळख नसतानाही.. किंवा अजून काहीतरी वेगळं.. पता नहीं..!

गाडीने पुन्हा वेग घेतला तरीही ती तिच्या निर्धारित वेळेत पोहोचेल असं वाटत नव्हतं. साडेदहा वाजून गेले होते. अजून हरियाणा क्रॉस नव्हता झाला. प्रवासीसुद्धा वैतागले होते. माझी आपली वेगळीच चुळबुळ. आपल्याला स्टॉप कळेल ना. रात्रीचं भलतीकडेच उतरलो, तर पंचाईत. मी आपली पूर्ण वेळ सावरून. धौला कुआजवळ शेजारची मुलगी उतरली. माझ्या आसपास पुन्हा पुरुष. जे गाडीत बसल्यापासून सतत पाहत होते. त्यांच्या डोळ्यात कुतुहल, प्रश्न  दिसत होते. कदाचित मी त्यांना राजस्थानी वाटत नव्हते आणि दिल्लीवालीसुद्धा. यांच्यातल्याच एकाने मला सांगितलं, ‘आपको बताता हूँ, कहा उतरना है. टेन्शन ना लो.’ दुसरे दोघं पुढे होत म्हणाले, ‘कोई लेने आनेवाला है? फोन कर लो, की आप यहॉं तक आयी है!’ मी तिघांनाही होकारार्थी मान हलवली. इतका वेळ त्यांच्या नजरांनी कंटाळलेल्या मला बरंच हायसं वाटलं. दिल्लीत रितेश भुयार हा मित्र घ्यायला येणार होता. त्याला फोन करून कळवलं. स्टॉप जवळ आला तसं पहिल्याने सांगितलं, आगे जाकर रुको. 

रात्रीचे बारा वाजले होते. मी दिल्लीतल्या झांशी की रानी सर्कलजवळ उतरले. इकडं-तिकडं पाहते, तर समोर रितेश उभा होताच! दिल्लीत मला महाराष्ट्र परिचय केंद्रातून वसंत विहार या ठिकाणी जायचं होतं. माझ्या उपलब्ध वेळेत मी मेट्रोचा पर्याय हाताळू शकत नव्हते, म्हणून सरळ कॅब करायचं ठरवलं. कॅबमध्ये बसले. तसा वीस-बाविशीतला असलेला चालक मला म्हणाला, ‘मॅडम आपके मोबाइलमें जितना अमाउंट आया है, उतनाही दे दो, बस मैं ये राइड कॅन्सल करता हूँ.’ क्षणभर मला काहीच समजेना.. तो असं का म्हणत होता. तो पुन्हा तेच बोलला. अनोळखी ठिकाणी अनोळखी माणसांविषयी आपलं एक इस्टींग भलतंच जागं असतं. मला रोख कळाला. तो राइड कॅन्सल करणार. परंतु मला इच्छित स्थळी पोहचवून ती रक्कम कॅब कंपनीला न देता स्वत:कडे ठेवणार. त्याचा फायदा मला कळला; पण मी ती रिस्क घेऊ शकत नव्हते. मी सरळ नाही असं उत्तर देऊन तो बरोबर नेत आहे ना, ते मोबाइलवर पाहू लागले. 

उगीच काहीतरी बोलायचं म्हणून मीही त्याला कितना कमा लेते हो, वगैरे विचारलं. दिवसाला तीनशे ते पाचशे कमावल्याशिवाय जात नाही, असं त्यानं सांगितलं. तो हरियाणाहून रोज अप-डाउन करत होता. त्यानं मला विचारलं, ‘आप लिखती हो?’ मी साशंकपणे त्याच्याकडे पाहिलं. त्यानं पुन्हा विचारलं, तेव्हा मी हो म्हणाले. ‘बस ऐसेही लगा, की आप लिखती होगी. आप मॅरीड है?’ असा खाजगी प्रश्न, विचारल्यावर आता तर मी सरळ दुर्लक्ष केलं. तसा तो वरमला. ‘हमारे यहॉं ना बहुत जल्दी शादी करा देते है. मेरे भी पिछे पडे है. पर मैंने भी कह दिया, जबतक ढंग का कमा ना लूँ. शादी-वादी का सोचना भी नहीं है. पर हमारी बिरादरी में ना बहुत जल्दी सादी होती है. मेरे साथ के तो बाप बन गयें है. आप मैरीड हो?’

त्यानं प्रस्तावनेसह पुन्हा प्रश्न केला. मी ‘हां!’ म्हणाले तसा तो अजून खुशीत येऊन विचारू लागला, ‘आप मुंबई के है क्या? नहीं थोडी देर पहले मुंबई के जुबानसा कुछ बोल रही थी. आपके यहॉं रिश्तेदार है क्या?’ तो हे सारं निव्वळ कुतुहलानं विचारत होता, हे कळत होतं. मीही मग त्याला मोकळेपणानं सांगितलं, हां! दोस्त के यहॉं रुकी हूँ! ‘अच्छा.. जिन्होंने आपको छोडा वो दोस्त. आपके पतीने आपको ऐसेही भेज दिया! अकेली! दोस्त के घर रुकने पर कुछ कहॉं नहीं!’ तो एकाच दमात प्रश्न आणि आश्चर्य असं सारं सामावून बोलला. ‘दोस्त के ही घर तो रुकी हूँ, उसमें पती को परेशानी होने की क्या बात! अगर भरोसा ही नहीं होगा, तो रिश्ता काहे का!’ मी ही आपली डायलॉगबाजी केली; पण तो गप्प झाला. मीही मग काही विचारलं नाही. पाच-सात मिनिटांनी तोच मला म्हणाला, ‘मॅडमजी मैं भी अपनी बीवीपर ऐसाही भरोसा करूँगा. हमारे बिरादरी में तो साला लडकी का घूंघट उपर जाये तो पीटना शुरू कर देते है.. पर आपने ठीक कहा! मैं तो ज्यादा सीखा नहीं. पढाई में मन ना लगा. फिर बस्ती कें बच्चोंके साथ यूंही भटकता रहा. झगडा-फसाद करने की आदत लगी. थोडी अकल आयी और छोड दिया. आज जब बस्ती में दुसरे बच्चे भी आवारागर्दी करते दिखते है, तो बडा तकलीफ होता है. कोशिश करता हूँ, की हमने अपनी जिंदगी बरबाद करली, अब आप तो कुछ समझो. हम तो यहॉं-वहॉं के रास्ते काटकर लोगों को मंजिल पोहचाते. पर हम खुद तो ठहरे भटके हुए!’ तो असा एकटाच बोलत राहिला. शेवटचं वाक्य तर तो काय कमालीचं बोलला. मी शांतपणे त्याचं ऐकत होते, ‘आप ना मॅडमजी बहुत अच्छी हो! कितने टाइम से बकबक कर रहा हूँ. पर बिलकुल रोका नहीं. कभी हमार बारे में भी लिखना मॅडमजी.’

मी फक्त हसले. तेवढ्यात वसंत विहार कुंज हे ठिकाण आलं. मी उतरताना पैसे दिले. तसा तो म्हणाला, ‘वैसे मॅडमजी आपने राइड काटने को मना क्यों किया? आपको लगा की हम कहीं गलत ना छोड दे, हैं ना.’ ‘बिलकुल सही, भरोसा भी तो होते होते होता है... तुम्हारे गाडी में बैठतेही कैसा होगा..!’ ‘वो भी सही बात है. अनजान शहरमें कैसे किसपर भरोसा होगा. मुझे भी पूना-मुंबईमें कोई ऐसा कहे तो मैं आदमी होकर भी एैसे ना करने दूँगा! वैसे अभी तो मुझे घर के लिए निकलना है, वरना मैं आपको वापस भी छोड देता. पर कल अगर आपको कही भी जाना हो, तो मुझे फोन करना मॅडमजी.’

मी होय म्हणून निघाले. मला कॅब कंपनीचा मेसेज आला. ड्रायव्हरच्या राइडिंगला रेटिंग देण्यासंदर्भात. मी त्याला चार स्टार दिले. दुसऱ्या दिवशी त्याला ते माहित झालं बहुधा. त्यानं मला फोन करून कळवलं, ‘मॅडम आपने हमको चार स्टार दिये. बहुत बहुत शुक्रिया. अगली बार आयेंगे, तो मुझे जरूर फोन करना मॅडमजी.’ या चालकाचं नावं होतं, सोनू. मी त्याला पूर्ण नाव विचारलं, तर म्हणाला, ‘सोनू ही कहना, इसके अलावा कुछ पुकारा तो शायद मैं ही रॉंग नंबर कहकर रख दूँगा’, असं म्हणत म्हणत गाडी वळवणारा त्याचा हसतमुख चेहरा अधून-मधून असाच आठवतो.

 या प्रवासात अनुभवलेलं हे माझ्या मनाच्या तळाशी साठून राहिलं होतं, ते सांगावंसं वाटलं इतकंच! बाकी तो आप समझदार है ही...!

- हिनाकौसर खान-पिंजार 
ई-मेल : greenheena@gmail.com

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत. दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणाऱ्या ‘हॅशटॅग (##) कोलाज’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/zHfVVt या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link