Next
लक्ष्मण गोरे यांची कुतुहलापोटीची सहचित्रे!
BOI
Thursday, November 01, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:लोकांना खरेच कलेबद्दल काय वाटते, कलेची गरज असते का, असे नाना प्रश्न मनात घेऊन लक्ष्मण गोरे या तरुण चित्रकाराने सहचित्रांचे प्रयोग शहरी आणि ग्रामीण भागात केले होते. त्यात सगळ्यांनी एकत्र येऊन चित्रे काढणे अभिप्रेत होते. त्यात, चित्रकार आणि चित्रकार नसलेले असे सगळे कोणत्याही भेदभावाशिवाय एकाच कॅनव्हासवर चित्र रंगवतात. या प्रयोगांतून नेमके काय पाहायला मिळाले, याबद्दल वाचा ‘स्मरणचित्रे’ सदराच्या आजच्या भागात...
.............
लक्ष्मण गोरेकुतुहलापोटी एखादा तरुण चित्रकार काय स्वरूपाचे प्रयोग करतो, असा प्रश्न समोर आला, की मला तरी लक्ष्मण गोरे याने केलेले अस्सल प्रयोग आठवतात. अर्थात गोरेने केलेले हे चित्ररूपातील प्रयोग दोन वेगळ्या जीवनपद्धतींच्या संदर्भात होते. एक शहरी आणि दुसरा ग्रामीण होता. दोन विभिन्न भौगोलिक, आर्थिक आणि सामाजिक स्थितींमध्ये त्याने दृश्यकलेतील एक प्रयोग केला. अर्थात तो सर्वार्थाने नवा नसला, तरी ग्रामीण भागात तो करणे सर्वस्वी नावीन्यपूर्ण होते. प्रयोग सोपा, साधा आणि सरळ होता. सगळ्यांनी एकत्र येऊन चित्रे काढण्याचा... आपण याला सहचित्रे असे म्हणू. (जसे सहभोजन, सहकार्य, तसेच सहचित्र! चालेल बहुधा.) येथे चित्रकारानेच चित्र काढावे, असे अपेक्षित नव्हते. कोणीही सहभागी होऊ शकत होते. अगदी कोणत्याही भेदभावाशिवाय चित्रकार आणि चित्रकार नसलेले असे सगळे एकाच कॅनव्हासवर चित्र रंगवतात. हा एक अनौपचारिक सोहळा म्हणता येईल. याला आपण सहचित्र उपक्रम म्हणू या.

पुण्यात सहचित्र काढण्याचा पहिला प्रयोग झाला होता, तो १९९१ साली पिकासोच्या जन्मदिनी म्हणजेच २५ ऑक्टोबरला.. सारसबागेत. इन्फॉर्मल आर्टिस्ट ग्रुप या चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केलेले ते पहिले सहचित्र. सार्वजनिक जागेत एकत्र चित्र काढण्याचे असे अनेक प्रयोग या लोकांनी केले. गोरेने बहुधा त्यापासून प्रेरणा घेतली व आपल्या विद्यार्थिदशेत अभिनव कला महाविद्यालयाच्या समोर मोठा कॅनव्हास पसरला. कुतुहलापोटी, लोकांना खरेच कलेबद्दल काय वाटते, कलेची गरज असते का, असे नाना प्रश्न मनात घेऊन त्याने हा प्रयोग केला होता.

काळ्या डांबरी रस्त्यावर पांढरा शुभ्र कॅनव्हास. रंग टाकायला मित्रमंडळी. रस्त्याने जाणारे-येणारे बघे. सहभागी तसे कमीच. रस्त्याने येणारी-जाणारी वाहने साहजिकच त्यावरून जाणार हे अपेक्षित. त्यामुळे आलेले ‘स्पेशल इफेक्ट.’ हे सगळे घडत होते. गोरे म्हणतो, शहरातील लोकांना त्याचे फारसे काही देणे-घेणे नव्हते म्हणून. सहचित्राचा प्रयोग ‘एक’ संपवून गोरे आपले कलाशिक्षण पूर्ण करत होता. लक्ष्मणने स्वतःसाठी चित्रेदेखील केली. प्रदर्शनात सहभाग घेतला. एका विशिष्ट क्षणी त्याने विचारपूर्वक पुणे सोडून आपल्या गावी, राजुरी येथे परत जाऊन शेती करावी आणि त्याबरोबर चित्रे काढावीत, असे ठरवून स्थलांतर केले. प्रयोग डोक्यात घेऊनच तो परतला असावा.अहमदनगर जिल्ह्यातील सधन शेतकरी कुटुंबात स्वतः शेतीची कामे करताना समोर निसर्ग दिसे. परंतु लक्ष्मण गोरेच्या डोळ्यांना आधुनिक कलेची सवय होती. गावाकडे तसे काही नाही. ही इच्छा भागवायला मग त्याने एक युक्ती काढली. युक्ती सोपी होती. जाता-येता दिसणाऱ्या गोष्टींवरच चित्रे काढायची. लक्ष्मणची ती चित्रकार म्हणून मानसिक गरज होती. सामान्य गरजांपेक्षा वेगळी म्हणून ती समजावून घ्यायला हवी. त्याने ट्रॅक्टरला जोडायची ट्रॉली रंगवली. मजा आली. येता-जाता काही चित्ररूप सहज दिसायला लागले, याचे समाधान. मग त्याने विहीर रंगवली. सिमेंटच्या करड्या रंगावर काळ्याभोर रंगाने ठसठशीत रंगवलेली विहीर. त्याच्या डोळ्यांच्या रोजच्या पार्टीची सोय झाली. येता-जाता आपण चित्रे काढू शकतो, ही लक्ष्मणची गरज विहिरीच्या कठड्यावर त्याने रेखाटलेल्या चित्रांनी पूर्ण होत होती. हे प्रचंड आकाराचे चित्र त्याने जगप्रसिद्ध चित्रकार पिकासोला अर्पण केले आहे. घरावरच्या डिश अँटेनालादेखील त्याने सोडले नाही. चित्रकार गायतोंडे आपल्या जवळपास स्मृतींनी असावेत, म्हणून हे डिश अँटेनावरील चित्र गायतोंडेंना वाहिलेले. गावाला परत जाऊन स्वतःच्या शेतीत काम करताना आपल्यातला चित्रकार मरून जाऊ नये म्हणून ही चित्रे म्हणजे लक्ष्मणने स्वतःसाठी केलेली सोय होती. चित्रे करणे चालूच होते. कुतूहलही जागृत होतेच.

लोकांना खरेच चित्रांची गरज असते का, वगैरे अशा प्रश्नांची मनातील चर्चा मनातच न ठेवता किंवा ते प्रश्न फक्त चर्चेतच न ठेवता लक्ष्मणने त्यावर प्रयोग केला. गावात सार्वजनिक ठिकाण म्हणजे मंदिर. लक्ष्मणने मंदिराच्या बाहेरच्या सोप्यावर चित्रे काढण्याचा ‘कार्यक्रम घेतला...’ चित्रे काढण्यासाठी गावातील सर्वांना आमंत्रण केले. (अर्थातच स्थानिक मर्यादा लक्षात घेऊन पुरुष मंडळी बोलावली.) त्यातही लक्ष्मणने ५० ते ६० हा वयोगट बोलावला. आयुष्याच्या अनुभवाने समृद्ध झालेले त्याच्या  वडिलांचे मित्र-बित्र असा सगळा गाव बोलावला. सहचित्रासाठी मोठा कॅनव्हास फरशीवर पसरला. रंग, ब्रश मुबलक ठेवले. लोकांनी हिरीरीने सहभाग घेतला. कोण काय काढते आहे? चर्चा, चित्रे यांना जणू ऊत आला. लक्ष्मण म्हणतो, तिथे लोकांना चित्रांची गरज आहे. कारण त्यांना व्यक्त व्हायला आवडते. ते लोक त्यामध्ये मिसळून जातात. त्याने एक खूप बोलका प्रसंग सांगितला. एका कुटुंबातील वडील आणि मुलगा भांडण झाल्याने खूप वर्षे एकमेकांशी बोलत नव्हते. सहचित्राच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते चुकून एकत्र आले आणि चित्र करतानाच बोलायला लागले. वर्षानुवर्षांचे भांडण सहजच विरघळले ते चित्राच्या भाषेने, अगदी नैसर्गिक पद्धतीने... कौन्सिलरशिवाय....लक्ष्मणला कुतूहल होते, ते शमले आहे अशातला भाग नाही.. सगळ्याच प्रश्नांना उत्तरे नसतात... पण त्याला काही उत्तरे सापडली असावीत. राजुरीत राहून हा चित्रकार चित्रे काढत असतो. शेती करता करता चित्रे काढण्याचा त्याचा हाही एक प्रयोगच आहे. त्याला तरी सध्या त्याने काढलेली सर्वच चित्रे अर्धवट वाटत आहेत. ती कधी पूर्णत्वाकडे जातील, याचे मला तरी कुतूहल वाटते आहे. त्यालाही कुतूहल वाटत असणारच; पण या सगळ्याबाबत त्याला बरीच स्पष्टता मात्र नक्की आहे. 

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(लक्ष्मण गोरे यांच्या प्रयोगांची आणखी छायाचित्रे पाहा सोबतच्या 
स्लाइडशो’ मध्ये...)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Rupesh Pawar (Hirugade) About 315 Days ago
लक्ष्मणचा अभिमान वाटतो.... डॉ नितीन हडप आपणासही मनापासून धन्यवाद.कारण आजच्या युगात आपल्या सारखी मानसं दुर्मिळच....- रूपेश पवार ( हिरूगडे )
0
0
Vasant Kalamkar About 316 Days ago
Great artists dada
0
0

Select Language
Share Link
 
Search