Next
शीशा हो या दिल हो...
BOI
Sunday, March 31, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक म्हणजे सुमारे चार हजार गीते लिहिण्याचा विक्रम करणारे गीतकार म्हणजे आनंद बक्षी. ३० मार्च हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी लिहिलेल्या ‘शीशा हो या दिल हो....’ या गीताचा...
............
१९५७ ते २००० या ४३ वर्षांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत ६०० हिंदी चित्रपटांकरिता चार हजार गीते लिहिणारे, हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक गीते लिहिण्याचा विक्रम करणारे, कारकिर्दीत चार वेळा उत्कृष्ट गीतकार म्हणून फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळवणारे, एकदा सिने अॅवॉर्ड आणि दोन वेळा स्क्रीन अॅवॉर्ड मिळवणारे, दोन चित्रपटांत स्वतःच्या स्वरात गाणे गाणारे गीतकार, अशी ज्या व्यक्तिमत्त्वाची ओळख सांगितली जाते, ते व्यक्तिमत्त्व म्हणजे गीतकार आनंद बक्षी होय!

‘आदमी मुसाफिर है, आता है जाता है’ या स्वतः लिहिलेल्या काव्याच्या ओळीतील सत्यता सिद्ध करत हा ‘मुसाफिर’ ३० मार्च २००२ रोजी या दुनियेतून जाता झाला! आणि मागे ठेवून गेला अनेक अर्थपूर्ण गीते!

‘आनंद बक्षी आणि अर्थपूर्ण गीते’ हा शब्दप्रयोग अनेक चित्रपटप्रेमींना भावत नाही; पण जरा निरीक्षण केले तर हे लक्षात येते, की एखादा चित्रपटप्रेमी (साधारण १९७०पासून पुढील काळातील) त्याच्या निवांत क्षणी जे एखादे गीत गुणगुणत असतो, अगर शिळेवर धून म्हणत असतो, त्या गीतांपैकी बहुतांश गीते ही आनंद बक्षी यांचीच असतात.

२१ जुलै १९३० रोजी रावळपिंडी येथे जन्मलेल्या आनंद बक्षींना तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना कविता लिहिण्याचा छंद लागला. भारतीय सेनेच्या सिग्नल विभागात स्विच बोर्ड ऑपरेटर म्हणून काम करणारे आनंद बक्षी चित्रपट गीतकार बनण्याचे स्वप्न बघत होते. त्यासाठी सैन्यातील नोकरी सोडून ते मुंबईत आले; पण तेथे गीतकार म्हणून नावारूपास येण्याकरिता त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. मुंबईतून निराश होऊन ते परत गेले आणि १९५७मध्ये पुन्हा मुंबईला आले.

त्या वेळी भगवानदादांनी त्यांना ‘भला आदमी’ या भगवानदादांच्या चित्रपटासाठी गीतकार म्हणून काम दिले. त्या चित्रपटामधील १० गीतांपैकी पाच गीते लिहिण्याचे त्यांना त्या वेळी म्हणजे १९५८मध्ये दीडशे रुपये मिळाले होते. त्या काळात ती रक्कम तशी मोठी होती; पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्या वेळी त्यांना आणखी चार चित्रपटांची कामे मिळाली. १९६१पर्यंत त्यांनी जवळजवळ बारा चित्रपटांसाठी गीते लिहिली; पण आनंद बक्षी हे नाव लोकप्रिय झाले नाही.

‘आनंद बक्षी आणि अर्थपूर्ण गीते’ हा शब्दप्रयोग वापरू नये म्हणून ‘सोमवार को हम मिले, मंगलवार को नैन...’, ‘वन टू का फोर...,’ ‘आज मोहब्बत बंद है...’ अशी ढीगभर गाणी सांगता येतील, हे जितके खरे आहे, तितकेच हे पण खरे आहे, की १९६१च्या ‘रज़िया सुलतान’पासून जे आनंद बक्षी पुढे येत गेले, त्या आनंद बक्षींच्या अर्थपूर्ण गीतांची ही झलक जरा बघा!

ढलती जाए रात...’(रजिया सुलतान), ‘चाँद आहें भरेगा...’ (फूल बने अंगारे), ‘मेरे मेहबूब कयामत होगी...’ (मिस्टर एक्स इन बॉम्बे), ‘चाँद सी मेहबूबा हो...’ (हिमालय की गोदमें), ‘एक था गुल...’ (जब जब फूल खिले), ‘बहारों ने मेरा चमन लूटकर...’ आणि ‘आया है मुझे फिर याद वो जालीम...’ (देवर), ‘हम तुम युग युग’ आणि ‘मुबारक हो सब को...’ (१९६७चा ‘मिलन’) ही अशी अनेक गीते आहेत. ‘अमर प्रेम,’ ‘हरे राम हरे कृष्ण,’ ‘तकदीर,’ ‘आए दिन बहार के’, ‘आप की कसम,’ ‘शालीमार,’ १९७९चा ‘सरगम,’ ‘कटी पतंग’ यांसारख्या अनेक चित्रपटांतील सर्वच्या सर्व नसली, तरी दोन-तीन गीते का होईनात, पण मनाला भावणारी व आशयपूर्ण असायची!

१९६० ते १९७०पासूनची पुढील तीन/चार दशके सतत चर्चेत असणाऱ्या आनंद बक्षींनी अक्षरशः ढीगभर गाणी लिहिली. बंदुकीतून सटासट गोळ्या सुटाव्यात, तशी त्यांच्या लेखणीतून गाणी कागदावर उतरवली जात होती. त्यामध्ये अनेक वेळा संगीतकाराच्या चालीत बसणारे अचूक शब्द निवडण्यात आनंद बक्षींचे कौशल्य दाद देण्याजोगे होते.

...पण चित्रपटाचे कथानक, प्रसंग यास अनुषंगून गीत लिहिण्याची प्रतिभाही त्यांच्या ठायी होती. म्हणूनच सुभाष घई, यश चोप्रा, प्रसाद प्रॉडक्शन, राजश्री प्रॉडक्शन, राज खोसला, शक्ती सामंता अशा दिग्गजांनी त्यांनाच प्राधान्य दिले आणि ‘बॉबी’च्या वेळी खुद्द राज कपूर यांनी त्यांचा हक्काचा गीतकार हसरत जयपुरी असतानाही आनंद बक्षींना आमंत्रित केले. हिंदी, उर्दू आणि पंजाबी भाषेतील शब्दांचे प्रचंड भांडार आनंद बक्षींजवळ होते व त्या आधारे ते साजेसे गीत लिहीत असत.

लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, एस. डी. बर्मन, आर. डी. बर्मन या संगीतकारांच्या धूनवर गीते लिहिणाऱ्या आनंद बक्षींनी नंतरच्या पिढीतील शिव-हरी, जतिन-ललित, तसेच ए. आर. रेहमान या संगीतकारांच्या धूनवरही गाणी लिहिली.

आनंद बक्षींच्या प्रतिभेची साक्ष देणारी अनेक गीते सांगता येतील. एखादी गोष्ट काव्यातून सांगावी, तर ती आनंद बक्षींनीच. उदाहरणार्थ ‘जब जब फूल खिले’ चित्रपटातील ‘एक था गुल...’ हे गीत! १९८२च्या ‘जीवनधारा’ चित्रपटातील ‘गंगाराम कुंवारा रह गया...’ हे गीत! याखेरीज प्रश्नोत्तर पद्धतीने लिहिलेली गीते - उदाहरणार्थ - ‘अच्छा तो हम चलते हैं...’ (आन मिलो सजना), ‘वो कौन है, वो कौन है...’ (अंजाना), ‘वो क्या है...’ (अनुराग), ‘मैंने देखा...’ (दुश्मन) 

‘एक दुजे के लिए’ चित्रपटात तर त्यांनी वेगळाच प्रकार केला. चक्क हिंदी सिनेमांची नावे एकापुढे एक ठेवली - ‘मेरे जीवन साथी, प्यार किए जा...’ अशी नावे एकत्र करून त्यांनी एक गीत तयार केले. (अर्थात चित्रपटाच्या कथानकाची ती गरज होती.)

आनंद बक्षी यांचा मोठेपणा म्हणजे त्यांनी स्वतः कबुली दिली होती, ‘काव्याचे व्याकरण मला कळत नाही. मोठमोठ्या उपमा, अलंकार वापरून गीत तयार करणे मला जमत नाही.!’ परंतु अशी कबुली देणारे बक्षी शब्दांचे वजन आणि संगीतकारांच्या चालीचा ठेका, मीटर पटकन जाणून घेऊन अशी काही रचना करून जात असत, की ते सहजासहजी आपल्या ओठात बसायचे. अशा एक-दोन ओळींतच गहन अर्थ असायचा. त्यासाठी ‘अमर प्रेम’चे गीत बघा- ‘तू कौन है तेरा नाम है क्या। सीता भी यहाँ बदनाम हुई।’ तसेच ‘दोस्ताना’ चित्रपटातील ‘वो ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन, सवालों की राते, जवाबों के दिन।’ 

मै शायर तो नहीं’ असे लिहिणाऱ्या बक्षींनी ‘जिक्र होता है जब कयामत का’, तसेच, ‘वो तेरे प्यार का गम...’ (माय लव्ह) यांसारख्या रचना करून अंतःकरणात बसणारी गाणी लिहिली. बदलत्या काळातही त्यांची ‘पल दो पल का ये सफर...’ आणि ‘ओय राजू, प्यार न करियो...’ (हद कर दी आपने) ही गीते वेगळेपण दाखवून गेली.

मानवी जीवनाविषयी विविध दृष्टिकोनांतून भाष्य करणारी त्यांची गीते हा एक स्वतंत्र विषय आहे. ‘ये जीवन है इस जीवन का...’, ‘कैसे जिते है भला...’, ‘बुरा मत सुनो बुरा मत देखो...’, ‘देखो ओ दिवानो तुम ये काम ना करो...’, ‘गाडी बुला रही है...’ ही गीते लक्षपूर्वक ऐकून समजून घेतली, तर पथदर्शक ठरतील यात संशय नाही. ‘एक बंजारा गाए...’सारखे गीत ऐकल्यावर तर आनंद बक्षी कामचलाऊ गीते लिहिणारे होते, हे विधान करवत नाही.

आनंद बक्षींच्या कारकिर्दीबद्दल सांगण्यासारखे असे बरेच काही आहे. विस्तारभयामुळे ते सांगत नाही. आता त्यांच्या अशा अनेक अर्थपूर्ण गीतांमधून एक ‘सुनहरे गीत’ निवडायचे ही तारेवरची कसरत आहे; तरीही मला भावलेले, माझ्या डोक्यातून न जाणारे आणि माझ्या जीवनाचीच हकीकत सांगणारे आनंद बक्षी यांनी लिहिलेले ‘सुनहरे गीत’ म्हणजे १९८०च्या ‘आशा’ चित्रपटातील लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेले आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेले ‘शीशा हो या दिल हो...’ हे गीत....

काय आहे त्या गीतात? एका अपयशी जिवाची ही कहाणी आहे. जगातील कटू सत्य सांगणारे हे काव्य आहे आणि हे सर्व सांगत असताना तो विषाद हुंदक्यावर मांडला जात नाही, तर डोळ्यांतील पाणी पापणीच्या काठावर रोखून एक हास्य चेहऱ्यावर आणून हे दु:ख मांडले जाते. अहो, हे भावूक माणसाचे हृदय/मन म्हणजे काय असते हो? तेच या गाण्याच्या मुखड्यात सांगितले आहे. ‘ती’ गाते, ती सांगते - 

लब तक आते आते, हाथों से सागर छूट जाता है...

(माझे हे) हृदय काय अगर काच/आरसा काय, अखेर तुटणे, फुटणे हेच त्यांच्या भाळी असते, नाही का? (आणि सामान्यपणे हेच जीवनात दिसून येते, की) ओठांशी आलेला भरलेला पेला हातातून सुटून जात असतो. (सुख मिळाले मिळाले असे वाटत असतानाच त्याचा उपभोग न घेताच दूर निघून जाते.)

जीवनाची ही रीत आणि या बेभरवशी दुनियेबद्दल व आपल्या अपेक्षेप्रमाणे न घडणाऱ्या जीवनातील घटनांबद्दल भाष्य करताना, एक ‘जहरिले’ सत्य सांगण्यासाठी आनंद बक्षी पहिल्या अंतऱ्यात लिहितात...

साकी बस अरमान नहीं, कुछ मिलना आसान नहीं 
दुनिया की मजबुरी है, फिर तकदीर जरूरी है 
ये जो दुश्मन है ऐसे, दोनों राजी हो कैसे 
एक को मनाओ तो, दुजा रूठ जाता है

(आम्ही या जीवनात अपेक्षाभंगाचे एवढे धक्के सहन केले आहेत, एवढी स्वप्ने तुटून जाताना पाहिली आहेत, की) हे मित्रा, आता कोणती नवीन स्वप्ने पाहण्याची उमेदच आमच्यात राहिली नाही. (कोणतेही स्वप्न आता डोळ्यांपुढे नाही. कारण आम्हाला आतापर्यंतच्या या घटनांमुळे हे लक्षात आले आहे, की) कोणतीही गोष्ट प्राप्त होणे सोपे नाही.. (मग ते भले कोणाचे प्रेम असो, अगर अन्य काहीही) या जगाची (जगातील रीतीरिवाजांची) अडचण असते, नाईलाज असतो. (आणि महत्त्वाचे म्हणजे एखाद्याचे प्रेम मिळायलासुद्धा) शिवाय नशीब लागते. (हे नशीब आणि हे जग, त्यातील रीतीरिवाज) हे दोन असे शत्रू आहेत, की दोघेही एकाच वेळेस राजी होत नाहीत. एकाला काबूत आणावे, त्याची मनधरणी करून त्याला वळवावे, तर दुसरा नाराज होतो. (असे हे जीवनातील विक्षिप्त प्रकार आहेत.)

या अशा परिस्थितीत, या जगात आम्ही जन्माला आलो आणि तेंव्हा 

बैठे ये किनारों पे, मौजों के इशारों पे 
हम खेले तुफानों से, इस दिल के अरमानों से
हम को ये मालूम न था, कोई साथ नहीं देता 
माँझी छोड जाता है, साहिल छूट जाता है

(आमच्या त्या तारुण्याच्या दिवसात, उमेदीच्या काळात आम्ही स्वप्नांच्या समुद्राच्या) काठावर बसलो होतो. (विचारांच्या, भावनांच्या, स्वप्नांच्या) लाटांशी (तसेच कधी अडचणींच्या, संकटांच्या) तुफानांशी, या (आमच्या साध्याभोळ्या) हृदयातील स्वप्नांशी खेळत होतो, ती सत्यात उतरवण्यासाठी धडपडत होतो; पण आम्हाला हे माहीत नव्हते, की (आमच्या त्या प्रयत्नात) आपणाला कोणीच साथ देत नाही, (उलट त्या समुद्रात, अडचणींत) नावाडी सोडून जातो, किनारा दूरवर राहून जातो.
मुख्य गीताची ही दोन कडवी चित्रपटात आपण सलगपणे बघतो व काही वेळाने तिसरे कडवेही पुढे येते. आनंद बक्षींची शायरी येथे प्रतिभेचा आणखी उत्कृष्ट आविष्कार दाखवते. ते लिहितात -

दुनिया एक तमाशा है, आशा और निराशा है 
थोडे फूल हैं, काटे हैं, जो तकदीर ने बाँटे हैं 
अपना अपना हिस्सा है, अपना अपना किस्सा है 
कोई लुट जाता है, कोई लूट जाता है...

ही दुनिया म्हणजे एक तमाशा/खेळ/नाटक आहे. येथे आशा आहे व निराशाही आहे. फुले थोडी आहेत, काटे मात्र (खूप) आहेत, जे नशिबाने (प्रत्येकाला) वाटले आहेत. प्रत्येकाचा हिस्सा (प्राक्तन) असतो, वेगळी कहाणी असते. कोणी लुटले जाते, तर कोणी लुटून घेऊन जात असते.

आनंद बक्षींचे हे गीत फार व्यापक अर्थाचे आहे, हे जाणूनच संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी स्वरसम्राज्ञींकडून तो सर्व अर्थ श्रोत्यांपर्यंत पोहोचावा, अशा पद्धतीने ते गाऊन घेतले आहे. ‘कोई लुट जाता है’ ही एकच ओळ, पुन्हा तीच ओळ लिहताना ‘लूट’ असा शब्द लिहिला जातो. अर्थात ऱ्हस्व-दीर्घाचा फरक आणि त्यामुळेच लतादीदींनी ती दोन प्रकारे गायली आहे; त्यामुळे त्या ओळीतील दोन्ही अर्थ लक्षात येतात. कडवे सुरू करतानाचा ओऽऽ ओऽऽ असा आलाप, तसेच ‘कोई साथ नहीं देता’ ही आळवलेली ओळ हे सारे गीताचा प्रभाव वाढवते.

हे गीत पडद्यावर सादर करणारी अभिनेत्री रीना रॉय! तिचा अभिनय - डोळ्यांतले पाणी पापणीवरच थांबवण्याचा भाग - एक हास्य जे दु:खाला हसते की दुःखावर हसते, नायक (जितेंद्र) सारे जाणतो, म्हणून अस्वस्थ होतो; पण बाकी सारे एक छान गीत ऐकण्याच्या आनंदात! 

हे असेही ‘सुनहरे’ गीत असते आणि अशाही रचना आनंद बक्षी यांच्या लेखणीतून झरल्या होत्या. त्या ऐकल्या, की लक्षात येते, की ‘आनंद बक्षी आणि अर्थपूर्ण गीते’ हा शब्दप्रयोग चुकीचा नाही.

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search