Next
रुक्ष सिमेंटला सौंदर्य देणारी कला
BOI
Friday, January 12 | 06:45 PM
15 0 0
Share this story

सर्व फोटो सौजन्य : क्राफ्ट बेटन गॅलरी

अत्यंत रुक्ष, नीरस अशा सिमेंटपासून कलात्मक वस्तूही बनवता येतात, हे सिंथिया रॉड्रिग्ज, इति त्यागी, सोमेश सिंग आणि अॅलन सागा या चार जगावेगळ्या कलाकारांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं आहे. आज, १२ जानेवारीपासून १४ जानेवारीपर्यंत मुंबईतील ‘इंडियन स्कूल ऑफ डिझाइन अँड इनोव्हेशन’मध्ये होणाऱ्या सेरेंडिपिटी कला महोत्सवात या कलाकृती पाहायला मिळणार आहेत. त्या निमित्ताने...
..........
सिमेंट म्हटलं, की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? करड्या रंगाचा एक रुक्ष पदार्थ, बांधकाम सुरू असलेल्या जागा आणि फारच कल्पनाशक्ती लढवली तर सिमेंटच्या जाहिराती. एकंदरीत सगळाच रुक्ष, नीरस मामला; पण याच सिमेंटपासून कोणी अत्यंत कलात्मक वस्तूंची निर्मिती केली तर? हस्तकौशल्याची अशी आगळीवेगळी कला जोपासली आहे सिंथिया रॉड्रिग्ज, इति त्यागी, सोमेश सिंग आणि अॅलन सागा या चार जगावेगळ्या कलाकारांनी. या सर्वांनी मिळून सिमेंटची उपयुक्तता कल्पनेपलीकडे पोहोचवली आहे. त्यांच्या या सुंदर कलाकृती मुंबईतील ‘इंडियन स्कूल ऑफ डिझाइन अँड इनोव्हेशन’मध्ये १२ ते १४ जानेवारी २०१८ या कालावधीत होणाऱ्या सेरेंडिपिटी कला महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. याआधी पणजीमध्ये झालेल्या याच कला महोत्सवात या कलेचा आविष्कार रसिकांना पाहायला मिळाला आहे. सिमेंटचाही कलात्मक कारागिरीसाठी उपयोग होऊ शकतो, हे कला महोत्सवातील प्रदर्शनात ठेवलेले सिमेंटचे टेबल लॅम्प, बुक शेल्फ, स्टूल, क्लच आणि वाइन रॅकसह अन्य कलाकृतींमधून दिसून येतं. 

मेक्सिकन कलाकार सिंथिया रॉड्रिग्ज जेव्हा जयपूरला पहिल्यांदा आली होती, तेव्हा स्त्रियांसाठी पडदा म्हणून वापरल्या जाणाऱ्या दगडी जाळीची कलाकुसर पाहून अचंबित झाली होती. पडदा प्रथा मान्य नसली, तरी त्या कलाकुसरीतल्या कुशलतेचा वापर करायचं तिनं ठरवलं. त्यातूनच सिमेंटच्या कलात्मक वस्तूंची निर्मिती सुरू झाली. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या या फिकट राखाडी रंगाच्या, खरखरीत पदार्थापासून सिंथियानं सुंदर, फॅशनेबल क्लच बनवले आहेत. 

सोमेश सिंगनं रबर अथवा लेदरच्या लॅपटॉप बॅगसारखीच वापरायला सुलभ अशी लॅपटॉप बॅग सिमेंटपासून बनवली आहे. यातून त्यानं कलात्मकतेला कोणतीही मर्यादा नसते, हे दाखवून दिलं आहे. तो म्हणतो, ‘सिमेंटमध्ये सौंदर्य नाही हा सर्वसाधारण समज मला दूर करायचा होता. सिमेंट खूप कठीण, खरखरीत आहे असं लोकांना वाटतं. बांधकामाशिवाय सिमेंटचा दुसरा कुठलाच उपयोग नाही, अशी त्यांची समजूत आहे. ही समजूत मला बदलायची होती. सिमेंटला आकर्षक बनवण्याची माझी इच्छा होती.’ 
‘कोणतंही डिझाइन हे कला व उपयुक्तता यांचा सुंदर मेळ साधणारं असलं पाहिजे. डिझाइन सुंदर आहे; पण वस्तूचा फारसा उपयोग नाही असं असेल, तर त्याला डिझाइन म्हणता येणार नाही,’ असं तो डिझाइनविषयीचं आपलं तत्त्व सांगताना म्हणाला. वूडन फिनिश असलेली फ्रूट बास्केट, प्लास्टिकचा आहे असं वाटणारा गोगलगायीच्या आकाराचा दिवा, बार स्टूल आणि अशाच काही सुंदर वस्तूंची त्यानं निर्मिती केली आहे.

इति त्यागीनं बनवलेलं सेंटर टेबल कलात्मकतेचा उत्कृष्ट नमुना आहे. हे सेंटर टेबल पोषाखाच्या आकाराचं असून, खराच पोषाख आहे असं वाटावं अशी त्याची तरलता आहे. 
‘सिमेंट माझं व्यक्तिमत्त्व दर्शवतं. ते खूप कठीण आहे असं वाटतं; पण प्रत्यक्षात ते हाताळायला खूपच मऊ मुलायम आहे. तुम्हाला ते खूप काळजीपूर्वक, हळुवारपणे आणि कुशलतेनं हाताळावं लागतं. तुम्ही ते योग्य प्रकारे हाताळलंत, तर त्यातलं सौंदर्य उमलून येतं,’ असं इति म्हणते. गूढ गोष्टींविषयी आकर्षण असणाऱ्या इतिनं आपल्या दोन कलाकृती शेरलॉक होम्स व जॉन वॉट्सन या आपल्या आवडत्या डिटेक्टिव्हजना समर्पित केल्या आहेत. 
कुशनसह असलेलं बार्बेक्यू स्टूल ही तिची अशीच एक सुंदर रचना. ते खरंच कुशन असावं इतकं मुलायम दिसतं. स्पॅनिश चित्रकाराच्या ‘दी पर्सिस्टन्स ऑफ मेमरी’ या अजरामर कलाकृतीतून प्रेरणा घेऊन बनवलेलं घड्याळ, पारंपरिक जपानी शैलीतील ग्लास सेट या तिच्या काही अप्रतिम कलाकृती आहेत. 

अॅलन सागा यानं मेक्सिकन संस्कृतीचे रंग दर्शवणारे वॉल लॅम्प्स बनवले आहेत. ताजमहालाच्या आकारातील स्पाइस रॅक, मिडोसाच्या कथेवरून प्रेरणा घेऊन बनवलेला आरसा, मेक्सिकोतील पिरॅमिडशी साधर्म्य असलेले फ्रूट ट्रे या त्याच्या काही वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती आहेत. अॅलननं सिमेंटपासून अत्यंत आकर्षक दागिनेही बनवले आहेत. १९६८च्या मेक्सिको ऑलिम्पिकच्या बोधचिन्हापासून प्रेरणा घेऊन त्यानं पेंडंट, अंगठी आणि इअर रिंग्ज बनवल्या आहेत. 
‘कलाकृतींची प्रेरणा आपल्याला इतिहासातून मिळते. प्रत्येक कलाकृती नुसती सुंदरच नाही, तर त्यांची प्रत्येकीची एक वेगळी कथा आहे. ताजमहाल खूप आकर्षक आहे आणि भारत मसाल्याच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणून मी या दोन्ही बाबींची माझ्या कलाकृतीत सांगड घातली,’ असं अॅलन सांगतो. 

हा कला महोत्सव आयोजित करणाऱ्या आयोजकांचाही कलेकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. ‘समाजाचं भविष्य कृतिशील (क्रिएटिव्ह) विचारांशी थेट निगडित आहे. रूढ परंपरांना छेद देऊन, विचारप्रवृत्त करून समाजाला पुढं घेऊन जाण्याची ताकद कलेमध्ये आहे. म्हणूनच जास्तीत जास्त लोकांना कलेकडे वळवणं, कला शिक्षण देणं, कलेच्या विविध शाखांतर्गत ज्ञानाचं आदानप्रदान घडवून आणणं आणि कलेला आश्रय मिळवून देणारी संस्कृती जोपासणं हे आमचं कला महोत्सव आयोजित करण्यामागचं उद्दिष्ट आहे,’ असं महोत्सवाच्या आयोजकांचं म्हणणं आहे. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link