Next
प्राप्तिकर बचतीसाठी ईएलएसएस फंड
BOI
Saturday, January 20, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

प्राप्तिकर बचतीसाठी ‘पीपीएफ’प्रमाणे ईएलएसएस हा म्युच्युअल फंडाचा प्रकारही उपयुक्त आहे. या फंडांतील गुंतवणुकीवर ‘८०सी’अंतर्गत करवजावट मिळू शकते. या पर्यायाबाबत अधिक माहिती आज पाहू या... ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
..........
दर वर्षी जानेवारी महिना सुरू झाला, की प्राप्तिकर वाचविण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी करदात्यांची धावपळ सुरू होते. बऱ्याचदा घाईगडबडीत केवळ करबचत होतेय, म्हणून चुकीची गुंतवणूक होत असल्याचे दिसून येते. याचे एक प्रमुख उदाहरण म्हणजे जानेवारी ते मार्च या तिमाहीत सर्व लाइफ इन्शुरन्स कंपन्या एकूण व्यवसायाच्या सुमारे ७५ ते ८० टक्के व्यवसाय करतात. एक जागरूक गुंतवणूकदार म्हणून आपण जेव्हा ‘सेक्शन ८० सी’अंतर्गत उपलब्ध असणाऱ्या पर्यायामध्ये गुंतवणूक करणार असतो, तेव्हा प्रत्येक पर्यायाची माहिती घेणे गरजेचे असते. ‘८० सी’अंतर्गत असलेल्या अनेक पर्यायांपैकी पीपीएफ हा पर्याय बहुतेक सर्वांना माहीत असतो. तथापि ईएलएसएस (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम) हा पर्याय आजही बहुतेकांना तितकासा माहीत नाही. त्याबद्दल सविस्तर माहिती या लेखात घेऊ या. 

ईएलएसएस हा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा प्रकार असून यातील दीड लाखांपर्यंतची गुंतवणूक ‘८० सी’ नियमानुसार करसवलतीस पात्र असते. अशाच प्रकारची सवलत पीपीएफ, एनएससी, लाइफ इन्शुरन्स प्रीमियम, ज्येष्ठ नागरिक ठेव योजना व करबचत मुदत ठेव यांसारख्या गुंतवणुकीवर मिळत असते. याशिवाय गृहकर्जाच्या मुदलाच्या परतफेडीवरही अशी सवलत मिळत असते. तथापि ज्या प्रमाणात पीपीएफ, एनएससी, लाइफ इन्शुरन्स प्रीमियम, ज्येष्ठ नागरिक ठेव योजना व करबचत मुदत ठेव यांमध्ये करबचतीसाठी गुंतवणूक होताना दिसते, तशी ‘ईएलएसएस’मध्ये होताना दिसत नाही, याचे कारण ‘ईएलएसएस’बाबत माहिती नसणे हेच आहे.

‘ईएलएसएस’मध्ये आपण कितीही गुंतवणूक करू शकता; मात्र केवळ एक लाख ५० हजारांपर्यंतची गुंतवणूक ‘८० सी’अंतर्गत करसवलतीस पात्र असते. या गुंतवणुकीस तीन वर्षांचा ‘लॉक इन पीरियड’ असतो. सुरुवातीची तीन वर्षे आपण यातली रक्कम काढू शकत नाही. तीन वर्षांनंतर रक्कम काढायलाच पाहिजे, असेही बंधन नाही. सर्व म्युच्युअल फंड ईएलएसएस ही सुविधा गुंतवणूकदारांना देऊ करतात. यातील गुंतवणूक प्रामुख्याने शेअर बाजारात केली जाते. त्यामुळे या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा शेअर बाजाराच्या परताव्याप्रमाणे कमी-अधिक होत असतो. असे असले, तरी शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीतून १४ ते १५ टक्के इतका परतावा मिळत असल्याचे दिसून येते. ‘८० सी’च्या अन्य पर्यायांतून सध्या जेमतेम सहा ते ८.३ टक्के इतकाच परतावा मिळत आहे. त्या दृष्टीने करबचतीसाठी गुंतवणूक करताना ईएलएसएस पर्याय स्वीकारणे निश्चितच फायदेशीर आहे.
आता आपण ४ प्रमुख म्युच्युअल फंडांच्या ‘ईएलएसएस’च्या गुंतवणुकीतून मिळालेला परतावा पाहू.


या तक्त्यावरून आपल्या असे लक्षात येईल, की ‘८० सी’च्या अन्य पर्यायांपेक्षा ‘ईएलएसएस’मधील गुंतवणूक निश्चितच जास्त परतावा देऊ शकते. म्हणून करबचतीसाठी केवळ पीपीएफ किंवा एनएससी, लाइफ इन्शुरन्स पॉलिसी अशा पारंपरिक पर्यायांचाच विचार न करता जास्तीत जास्त रक्कम ‘ईएलएसएस’मध्येच गुंतविणे योग्य राहील. इथे एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीसी वाटते, ती अशी, की आपण दर वर्षी एक लाख रुपये ‘पीपीएफ’मध्ये सलग १५ वर्षे गुंतविले असतील, तर आतापर्यंत वेळोवेळी बदललेल्या व्याजानुसार आपली जमा झालेली रक्कम सुमारे ३० लाख रुपये इतकी झाली असेल. याउलट आपण एक लाख रुपये सलग १५ वर्षे ‘ईएलएसएस’मध्ये गुंतविले असतील, तर आपली जमा झालेली रक्कम ५० लाख ते ७५ लाख रुपयांच्या दरम्यान असेल.
वरील विवेचनावरून असे लक्षात येईल, की प्राप्तिकर बचतीच्या उद्देशाने गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडाचा ईएलएसएस हा एक अत्यंत फायदेशीर व सुलभ पर्याय आहे. याकडे दुर्लक्ष करणे निश्चितच हितावह नाही.

- सुधाकर कुलकर्णी 
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search