Next
‘नर्सिंग क्षेत्रात निरंतर शिक्षणाची गरज’
प्रेस रिलीज
Saturday, July 08, 2017 | 02:45 PM
15 0 0
Share this article:

कराड (सातारा) : ‘आरोग्य क्षेत्रात नर्सिंग व्यवसायाचे महत्त्व अनन्यसाधारण असून, जागतिक बदलांचा वेध घेऊन सरकारने नर्सिंग व्यवसाय व शिक्षणाबाबत नवे धोरण निश्चित करण्याची गरज आहे. तसेच नर्सिंग व्यवसायाचा सध्याचा नवनिर्माणाचा काळ लक्षात घेता, नर्सिंग क्षेत्रात निरंतर शिक्षणाची प्रक्रिया कायमस्वरूपी सुरू राहण्याची गरज आहे,’ असे मत कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त कृष्णा विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित ‘कॉन्फ्लक्स- २०१७’ या परिषदेचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले होते. व्यासपीठावर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. रामलिंग माळी, व्यवस्थापक मंगला अंचन, निरंतर शिक्षण विभागाचे अध्यक्ष डॉ. महादेव शिंदे, डॉ. एम. आय. मोमीन, डॉ. नूतन माळी, छाया लाड, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, ‘कृष्णा नर्सिंग’च्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. अशोक क्षीरसागर आदी मान्यवर होते.

मिश्रा म्हणाले, ‘२०१६ साली जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात २०३५मध्ये जगात ११.२० कोटी नर्सेसची गरज असल्याचे नमूद केले आहे. २००१च्या जनगणनेनुसार भारतात २००९पर्यंत १२ लाख नर्सची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले होते. सध्या नर्सिंग क्षेत्राची व्याप्ती वाढत आहे; पण यामध्ये फक्त संख्यात्मक वाढ होणे अपेक्षित नसून, नर्सिंग व्यवसाय व शिक्षणाचा गुणात्मक दर्जाही वाढणे तितकेच गरजेचे आहे. विकासाच्या प्रत्येक टप्प्यात नवनिर्मितीचा काळ येतो. नर्सिंग क्षेत्रातही हा काळ आला असून, या दृष्टीने या क्षेत्राची भविष्यातील वाटचाल निश्चित करताना आपल्याला अनेक गोष्टींची सांगोपांग चर्चा करून नवी दिशा व धोरण ठरवायला हवे. माहिती तंत्रज्ञानामुळे जग एकत्र आले असून, जगात नर्सिंग क्षेत्रात होत असलेले अभूतपूर्व बदल आपणही आत्मसात करायला हवेत.’ त्यासाठी सरकारने धोरण ठरवून, नर्सिंग शिक्षण देणाऱ्या शिक्षकांच्या विकासासाठीही कार्यक्रम राबविण्याची गरज डॉ. मिश्रा यांनी व्यक्त केली.
या वेळी ‘कृष्णा समूहाने नर्सिंग क्षेत्राच्या प्रगतीला नेहमीच विशेष महत्त्व दिले असून, मेडिकल अगोदर नर्सिंगचा अभ्यासक्रम सुरू केल्याचे सांगितले. अलीकडच्या काळात नर्सिंग क्षेत्राकडे पुरुषांचाही ओढा वाढत असून, या क्षेत्रात संशोधनाला चालना देण्याचा प्रयत्न कृष्णा अभिमत विद्यापीठ सातत्याने करत आहे,’ असे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले. ‘महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलटचे अध्यक्ष डॉ. रामलिंग माळी यांनी कौन्सिलमार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते नर्सिंग क्षेत्रातील विविध पुरस्कारांचे वाटप विभागनिहाय करण्यात आले. ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन उत्कृष्ट नर्स शिक्षक’ हा सन्मान ज्योत्स्ना बुधगावकर, देवराव मडावी, कृष्णा उकिरडे यांना, ‘डॉ. ए. पी. जे. कलाम उत्कृष्ट नर्स प्राचार्य पुरस्कार’ खुर्शीद सुलतान जमादार, अस्मिता राऊत, प्रिया खरबंदा आणि ‘सावित्रीबाई फुले उत्कृष्ट क्लिनिकल नर्स पुरस्कार’ अनिता भालतिलक, दुर्गा बगाडे, कल्पना शिवडीकर, सुवर्णा शिंदे, नीलिमा थंगे यांना प्राप्त झाला.

कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. एस. टी. मोहिते, डॉ. शशिकिरण एन. डी., डॉ. वरदराजुलू, डॉ. काळे, शुभांगी शिंदे, प्रा. अविनाश साळुंखे, नर्सिंग डायरेक्टर डॉ. सुनीता टाटा, सहायक कुलसचिव डॉ. एस. ए. माशाळकर यांच्यासह नर्सिंग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search