Next
‘मोठ्या प्रमाणावर लेखिकांचे व्यक्त होणे हा महत्त्वाचा बदल’
‘वूमन्स रायटर्स फेस्टिव्हल’मध्ये उमा कुलकर्णी यांचे मत
BOI
Friday, September 14 | 12:48 PM
15 0 0
Share this story

‘वूमन्स रायटर्स फेस्टिव्हल’मधील चर्चासत्रात सहभागी झालेल्या ज्येष्ठ लेखिका उमा कुलकर्णी, स्वाती राजे व लीना सोहोनी

पुणे : ‘मराठी साहित्य खूपच बदलले आहे. लेखकांच्या अभिव्यक्तीच्या पद्धतीबरोबरच लेखनाची भाषाही बदलली आहे. विशेषतः लेखिका पूर्वीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहेत आणि हाच एक महत्त्वाचा बदल म्हणायला हवा’, असे मत साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका डॉ. उमा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

लेखिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘शी द पीपल, वूमन्स रायटर्स फेस्टिव्हल’मध्ये इंग्रजी आणि मराठीतील मान्यवर लेखिकांसह नवोदित लेखिकांनीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली. या संमेलनातील चर्चासत्रात उमा कुलकर्णी बोलत होत्या. लेखिका व संमेलनाच्या समन्वयक सुधा मेनन, लेखिका अर्चना पै कुलकर्णी, ‘शी द पीपल’च्या संस्थापिका शैली चोप्रा या वेळी उपस्थित होत्या.   

‘स्त्रीला तिच्या घरात जेव्हा मानाने व बरोबरीच्या नात्याने वागवले जाईल, तेव्हाच तिच्या प्रती समाजाची असलेली वागणूक बदलू शकेल’, असे सांगून, उमा कुलकर्णी यांनी स्त्री आणि पुरूष यांच्याकडे पाहण्याच्या रूढ दृष्टिकोनाबद्दलचे आपले अनुभव सांगितले.

‘वूमन्स रायटर्स फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झालेल्या म्युझिक जॉकी टीया सलुजा, आरजे शोनाली, आरजे स्मिता व सुधा मेनन
लेखिका तनुश्री पोदार म्हणाल्या, ‘लेखनातील विशिष्ट पैलूंना न्याय देण्यात लेखिका कमी पडतील असा एक समज आहे. ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे.’

सुधा मेनन म्हणाल्या, ‘मी गेली २५ वर्षे पुण्यातील लेखिकांचे काम पाहात आहे. लेखिकांबरोबरच स्टँडअप कॉमेडियन, स्टोरीटेलर आणि रेडिओ जॉकी असलेल्या महिलांची संख्याही पुण्यात वाढते आहे. मराठी भाषेतील उत्तम लेखिका आणि अनुवादिकांना भेटण्याची संधीही मला मिळाली. या सगळ्या जणींना या संमेलनाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आणणे ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे.’

लेखिका स्वाती शोम, किरण मनराल, लीना सोहोनी, स्वाती राजे, सुचरिता दत्ता असाने, यामिनी पुस्तके भालेराव, ललिथा सुहासिनी, अंजली शेट्टी यांनी संमेलनातील विविध परिसंवादांमध्ये सहभाग नोंदवत संवेदनशील विषयांवर आपली मते मांडली. 

प्रसिद्ध अभिनेत्री, नाट्यलेखिका विभावरी देशपांडे यांनी ‘रायटिंग थ्रू द जेंडर लेन्स’ या विषयावरील सत्रात आपले लेखनाचे अनुभव सांगितले. पुस्तकांच्या दुकानांचे वाचकस्नेही सांस्कृतिक कट्ट्यात रुपांतर करण्याबद्दल ‘पगदंडी बुकस्टोअर’चे नेहा आणि विशाल पिपरिया आणि ‘अक्षरधारा’चे रसिका व रमेश राठिवडेकर यांनी अनुभवकथन केले. 

निवेदनाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आरजे शुभ्रा, आरजे शोनाली, आरजे स्मिता, एमजे टिया, ‘स्टँडअप कॉमेडी’ कलाप्रकारातील प्रसिद्ध कलाकार आयुषी जागड, निकी रे, स्वेता मंत्री यांच्यासह काकोली बागची आणि सीमा गौरव या प्रसिद्ध ‘स्टोरीटेलर्स’नी देखील संमेलनात सहभाग घेतला होता.

‘शी द पीपल टीव्ही’हे महिलांना विचारविनिमय, अभिव्यक्ती आणि विकासासाठी प्रोत्साहन देणारे विशेष व्यासपीठ आहे. ‘वेगवेगळ्या विषयांवर होणाऱ्या लेखनाचे स्वागत करणे आणि नवीन लेखिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे संमेलन महत्त्वाचे आहे’, असे संस्थेच्या संस्थापिका शैली चोप्रा यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link