Next
ग्रामीण रुग्णालयातील ‘त्या’ डॉक्टरकडून दिवसभरात ४८३ जणांवर उपचार
शशिकांत घासकडबी
Wednesday, September 11, 2019 | 03:31 PM
15 0 0
Share this article:नंदुरबार :
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव या अतिदुर्गम, आदिवासी भागातील सरकारी रुग्णालयात गेल्या आठवड्यात एक विक्रम झाला. डॉ. संतोष परमार या वैद्यकीय अधिकाऱ्याने वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त असलेल्या ४८३ रुग्णांवर एका दिवसात उपचार केले. या रुग्णालयातील अन्य सात डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्याने गेले काही दिवस ते एकटेच नर्सच्या साह्याने या रुग्णालयाचा पसारा सांभाळत आहेत. 

सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांची जनतेच्या मनातील प्रतिमा फारशी चांगली नसते; मात्र त्याला अपवाद असलेलेही काही जण असतात. त्यापैकीच एक म्हणजे डॉ. संतोष परमार. नंदुरबार जिल्हा दुर्गम म्हणून ओळखला जातो. त्यातही धडगाव तालुका म्हणजे अतिदुर्गम. तिथे आजही रस्ते, वीज, पाणी यांसारख्या अत्यावश्यक सुविधांची वानवा आहे. 

आदिवासी बहुसंख्याक असलेल्या धडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आठ डॉक्टर असणे अपेक्षित आहे. त्यापैकी काही जागा रिक्तच आहेत आणि त्यात काही डॉक्टर्सनी काही कालावधीपूर्वी राजीनामे दिले. त्यामुळे स्त्रीरोगतज्ज्ञ असलेले डॉ. संतोष परमार हे एकमेव डॉक्टर सध्या तेथे आठवड्याचे सातही दिवस २४ तास सेवा देत आहेत. त्यांच्या जोडीला फक्त नर्स आहेत. गेल्या आठवड्यात एका दिवशी त्यांनी ४८३ रुग्णांवर उपचार केले. त्यात साप चावलेल्या, तसेच अपस्माराच्या रुग्णांचाही समावेश होता. त्या दिवशी दोन पोस्टमॉर्टेमदेखील त्यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्याच दिवशी पाच गरोदर मातांची प्रसूतीही त्याच रुग्णालयात यशस्वीरीत्या झाली. धडगावच्या डोंगराळ भागात असलेल्या या सरकारी रुग्णालयात आजूबाजूच्या परिसरातल्या जवळपास १५० गावांतील लोक उपचारांसाठी येतात. दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या ४५० ते ५०० एवढी असते. खासगी डॉक्टर कदाचित एका दिवसात इतके पेशंट तपासत असतीलही; पण सरकारी डॉक्टर्सची अनास्था अनेक ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयांत दिसते. या पार्श्वभूमीवर, एकट्याने दिवसभर सर्व रुग्णांवर उपचार करणे, ही दखलपात्र गोष्ट आहे.

आपण केवळ कर्तव्य केले, अशी डॉ. संतोष परमार यांची भावना आहे; मात्र अशी उदाहरणे दुर्मीळ झालेली असल्यामुळे रुग्णांनी आणि ग्रामस्थांनी डॉ. परमार यांचे विशेष आभार मानले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा लवकरात लवकर भरल्या जाव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
राजेंद्र निकुंभ About 7 Days ago
डाँक्टरांना व त्यांना assist करणाऱ्या नर्स ताईंना प्रणाम 🙏🙏🕉🕉🚩🚩
1
0
Sunil Chole About 8 Days ago
हॅट्स ऑफ डॉक्टर,
0
0

Select Language
Share Link
 
Search