Next
कोपरीची चौपाटी बनणार इतिहासाची साक्षीदार
१७व्या शतकातील तोफा खाडीच्या दर्शनी भागावर ठेवणार
प्रशांत सिनकर
Thursday, February 07, 2019 | 11:44 AM
15 1 0
Share this article:

ठाणे : ठाण्याच्या खाडीकिनारी असलेल्या ऐतिहासिक तोफांचे लवकरच संरक्षण होणार असून, पर्यटकांना पाहण्यासाठी त्या दर्शनी भागावर ठेवण्यात येणार आहेत. पुरातत्त्व विभाग, ठाणे महानगरपालिका, मेरिटाइम बोर्ड आणि दुर्गवीर प्रतिष्ठानने या कामासाठी पुढाकार घेतला आहे. कोपरी येथील खाडीकिनारी मातीमध्ये गाडण्यात आलेल्या या तोफा आता लवकरच जमिनीवर मांडण्यात येणार असल्याने मोकळा श्वास घेणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गड-किल्ले संवर्धन समितीने सहा फेब्रुवारी २०१९ रोजी या तोफांची पाहणी केली.

ठाणे शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अनेक ऐतिहासिक गोष्टींच्या खाणाखुणा आजही येथे आढळून येतात. ठाण्यातील मध्यवर्ती कारागृह हासुद्धा इतिहासाचाच एक भाग आहे. पूर्वीचा भुईकोट किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या या किल्ल्याच्या संरक्षणासाठी सुमारे ४० तोफा तैनात ठेवण्यात आल्या होत्या, असे जाणकार सांगतात;  मात्र काळाच्या ओघात आणि पुरातत्व खाते व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दुर्लक्षामुळे सद्यस्थितीत या तोफांची माती होऊ लागली आहे. सध्या येथे अवघ्या ११ तोफा मातीमध्ये उलट्या गाडलेल्या आहेत.

सोळाव्या शतकात पोर्तुगीज आणि अरबी लोक या बंदराचा व्यापारासाठी वापर करीत होते. व्यापारी जहाजे बांधण्यासाठी काही तोफांचा वापर केला जात असे. त्यातील सद्यस्थितीत ११ तोफा शिल्लक राहिल्याचे दिसते. शिल्लक राहिलेल्या तोफा अर्ध्या जमिनीत गाडल्यामुळे त्याची माती होऊ लागली आहे. त्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान आणि चेंदानी कोळीवाडा समितीने पुढाकार घेऊन या तोफांचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरातत्व विभागाच्या परवानगीने या तोफा जमिनीबाहेर काढून मोकळ्या जागेत ठेवल्या जाणार आहेत. त्यासाठी ठाणे महापालिका, मेरिटाइम बोर्ड यांचेही सहकार्य लाभणार आहे.

सहा फेब्रुवारीला गड संवर्धन समितीचे सदस्य सचिन जोशी, कोळीवाडा जमात ट्रस्टचे सुबोध ठाणेकर, दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते या वेळी तोफांची पाहणी करण्यासाठी उपस्थित होते. या निमित्ताने त्यांनी तोफांच्या भोवताली असलेल्या झाडाझुडपांची सफाई केली. आता लवकरच या तोफा काढून त्या खाडी किनारीच मोकळ्या जागेत सुस्थितीत ठेवल्या जाणार आहेत. चिपळूण येथील गोवळकोट किल्ल्यावरही अशाच प्रकारे तोफांचे जतन केले जात आहे.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search