Next
सर्चिंग : तंत्रज्ञानाच्या विळख्यात सापडलेल्या मानवी नातेसंबंधांचा शोध
BOI
Tuesday, June 11, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


सध्याचं जग, लोक, त्यांच्यामधले नातेसंबंध, रोजच्या जगण्यातले तणाव, अतिशय कमी झालेला परस्परांतील संवाद आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सोशल मिडिया व इंटरनेटमार्फत आपल्या सगळ्यांचं बाहेरच्या आभासी जगाशी जोडलेलं असणं, या आभासी जगातल्या आभासी लोकांशी असलेले आपले संबंध, इत्यादी गोष्टींवर सर्चिंग हा चित्रपट प्रकाश टाकतो... ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या ‘सर्चिंग’ या हॉलीवूडपटाबद्दल....
..............................
तंत्रज्ञानामुळे सध्या जग जवळ आलं आहे. भौगोलिकदृष्ट्या कितीही लांब असणाऱ्या व्यक्तीशी अगदी सहज, एका क्लिकसरशी संपर्क होऊ शकतो, पण त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा सर्वत्र व सर्वदूर पगडा असलेल्या या जगात आपण खऱ्याखुऱ्या माणसांपासून, आपल्या घरच्यांपासून दूर चाललो आहोत का? आभासी जगातले मित्र हे आपल्याला घरच्यांपेक्षा अधिक जवळचे वाटू लागले आहेत का? कुटुंबातल्या व्यक्ती, शाळा कॉलेजमधील मित्र, नातेवाईक, यांच्याशी आपला संवाद पुरेशा प्रमाणात होतो आहे का? इत्यादी महत्त्वाच्या प्रश्नांचा वेध घेण्याचं काम, ‘सर्चिंग’ हा चित्रपट अत्यंत प्रभावीपणे करतो. 

जॉन छॉ२०१८च्या सनडान्स फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला पारितोषिक देण्यात आलं. ‘सॅन होजे’, कॅलिफोर्निया, इथे राहणाऱ्या डेव्हिड किम याची पत्नी पामेला, काही वर्षांपूर्वी कर्करोगाने मरण पावली आहे. सध्या डेव्हिड (जॉन छॉ) त्याची मुलगी मार्गो हिच्याबरोबर राहतो आहे. मार्गो एक कुमारवयीन मुलगी आहे. वडील आणि मुलगी, या दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे, पण मार्गोचं अर्धवट वय आणि डेव्हिडच्या कामात व्यग्र असण्यामुळे सध्या त्यांच्यात पुरेसा व मनमोकळा संवाद राहिलेला नाही. त्यात एक प्रकारची औपचारिकता आलेली आहे. ते एकमेकांशी गरजेपुरताच संवाद साधतात. डेव्हिड वडिलांच्या नात्याने मार्गोच्या एकूण दिनक्रमाची बारकाईने चौकशी करत असला, तरीही त्यात फक्त काळजी आहे. संशय मात्र नाही. मार्गो त्याच्या प्रश्नांना कधी व्यवस्थित उत्तरं देते, तर कधी उडवाउडवी करते. 

एक दिवस, रात्री मैत्रिणीच्या घरी अभ्यासाला जाते, असं सांगून मार्गो जी घराबाहेर पडते, ती सकाळ उजाडली तरी घरी परतत नाही. त्या रात्री, डेव्हिड घरी झोपलेला असताना, मार्गोचा तीन वेळेस फोन येऊन जातो, जो झोपेमुळे त्याच्या लक्षात येत नाही. सकाळी तो मार्गोशी संपर्क करायचा प्रयत्न करतो, तर संपर्क होत नाही. डेव्हिडला हे सगळं संशयास्पद वाटायला सुरुवात होते. शाळा, पियानो क्लास इत्यादी ठिकाणी चौकशी केल्यानंतरही, मार्गोचा शोध लागत नसल्याचं पाहून, डेव्हिड पोलिसांना फोन करतो. ‘रोजमरी विक’ (डेब्रा मेसिंग) नावाच्या एका खासगी गुप्तहेरकडे (प्रायव्हेट डिटेक्टिव्ह) ही केस सोपवली जाते. डेव्हिड आणि रोजमरी मिळून मार्गोचं शोधकार्य सुरू करतात. मार्गोशी संबंधित असणारी सर्व ठिकाणे व व्यक्तींचा वेगाने शोध सुरू होतो. मार्गो तिचा लॅपटॉप घरीच विसरून गेल्याचं डेव्हिडच्या लक्षात येतं. त्या लॅपटॉपचा वापर करून डेव्हिड तिच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागतो, तर दुसरीकडे, डिटेक्टिव्ह विक तिच्या पातळीवर शोध सुरू ठेवते. डेव्हिड आणि विक एकमेकांशी संपर्क करून तपासातील प्रगती कळवत राहतात. जसजसा तपास पुढे जातो, तसतसा प्रेक्षक कथानकात गुंतत जातो. विचार करू लागतो. त्याच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागतात. 

सध्याचं जग, सध्याचे लोक, त्यांच्यामधले नातेसंबंध, रोजच्या जगण्यातले तणाव, समस्या, अतिशय कमी झालेला आणि जवळपास लोप पावण्याच्या मार्गावर असलेला परस्परांतील संवाद आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सोशल मिडिया व इंटरनेटमार्फत आपल्या सगळ्यांचं बाहेरच्या आभासी जगाशी जोडलेलं असणं, या आभासी जगातल्या आभासी लोकांशी असलेले आपले संबंध, इत्यादी गोष्टींवर हा चित्रपट प्रकाश टाकतो. कुटुंबातील व्यक्तींचा एकमेकांशी पुरेसा, मनमोकळा व निरोगी संवाद आहे का? ज्या गोष्टी, घरच्या व्यक्तींशी शेअर केल्या पाहिजेत त्या आपण करतो का? बाहेरच्या, अनोळखी व्यक्तींशी आपण गरजेपेक्षा जास्त संवाद साधतो का? त्यांना आपली व्यक्तिगत स्वरुपाची माहिती, नको इतक्या प्रमाणात सांगतो का? इत्यादी प्रश्न हा सिनेमा विचारत राहतो. तरुण मुलगी घरातून अचानक बेपत्ता झाल्याने उडालेली खळबळ आणि प्रचंड अस्वथता, ‘जॉन चो’ या कोरिअन-अमेरिकी अभिनेत्याने उत्तमरीत्या दाखवली आहे. 

डेव्हिड किम नावाचं हे पात्र अतिशय हुशार आहे. तंत्रज्ञानाचा वापर कसा करतात, ते त्याला नेमकं ठाऊक आहे. मुलगी बेपत्ता झाली म्हणून इतर बापांसारखं हातपाय गाळून न बसता, डेव्हिड किम, प्रसंगावधान राखून, फारसा वेळ न घालवता, आवश्यक ते मार्ग निवडतो. त्याच्या हिशोबाने, वैयक्तिक पातळीवर शोध सुरू ठेवतो. माहिती मिळवत राहतो. पर्सनल डिटेक्टिव्हला ती माहिती पुरवत राहतो. या शोधाच्या निमित्तानं, डेव्हिडला आणि पर्यायानं प्रेक्षकांना, टीनएजर मुलांचं जग उलगडत जातं. रोजच्या जगण्यातल्या त्यांच्या समस्या, त्यांचा एकटेपणा, या एकटेपणातून आभासी जगातल्या व्यक्तींशी वाढलेली जवळीक, आभासी जग, त्यातल्या फेक प्रोफाईल, फेक फोटो, इतकंच काय, तर फेक आयडेंटिटी इत्यादी महत्त्वाच्या मुद्यांना हा चित्रपट स्पर्श करतो. 

अनीश छगांती, या अमेरिकन दिग्दर्शकाचा हा पहिला चित्रपट आहे. ‘हरवलेल्या मुलीचा शोध’, हा विषय चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. विषयाला अनुसरून, संपूर्ण वेळ, पूर्ण गांभीर्य राखत हा सिनेमा पुढे सरकतो. तरीही हा शोध घेताना चित्रपट कुठेही रेंगाळत नाही. कंटाळवाणा होत नाही. रंजकता, औत्सुक्य राखून ठेवतो. कधी एखाद्या सस्पेन्स थ्रिलरचा अनुभव देतो, तर कधी उदास, अंतर्मुखही करतो. एक तास ४० मिनिटांचा हा सिनेमा कमालीचा वेगवान आणि पाहताना गुंगवून ठेवणारा आहे. फोन, लॅपटॉप, आयपॅड्सचे स्क्रीन, काही वेबसाईट्सचे इंटरफेस, त्यावरून दिसणारे आभासी जगातल्या व्यक्तींचे चेहरे, तर कधी प्रत्यक्ष जग आणि त्यातल्या व्यक्ती यांमध्ये कॅमेरा आत-बाहेर करत राहतो. 

आपलं सध्याचं जग, तंत्रज्ञानाने इतकं काही वेढलं गेलं आहे, की कधी कधी प्रत्यक्ष जग, आभासी जग, यातल्या व्यक्ती आणि त्यांचे आपल्याशी असलेले खरे अथवा खोटे नातेसंबंध, यात संभ्रम निर्माण होतो. प्रत्यक्ष जग आणि आभासी जगा यांत आत-बाहेर करण्याचा अभिनव प्रयोग ‘सर्चिंग’ चित्रपटाचा कॅमेरा करतो आणि मुळातच दमदार असलेल्या पटकथेला एक सशक्त जोड देतो. चित्रपटाचं संकलन, हे एकरेषीय प्रकारचं आहे. पार्श्वसंगीत कथेला साजेसं. उत्तम कथा, तितकीच बांधीव स्वरुपाची पटकथा, छायांकन करताना केलेले अभिनव प्रयोग, उत्कृष्ट पार्श्वसंगीत, प्रमुख कलाकारांचा उत्तम अभिनय आणि तितकंच ताकदीचं दिग्दर्शन, ‘सर्चिंग’ला लाभलं आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत, प्रेक्षकाला मिनिटभरासाठीही जागचं हलू न देणारा हा लक्षवेधी चित्रपट, प्रेक्षकांचं मनोरंजन तर करतोच करतो, पण याचबरोबर, तंत्रज्ञानाने वेढलेल्या आजच्या युगाची काळी बाजूही समर्थपणे दाखवून, अंतर्मुखही करतो. हा चित्रपट आवर्जून पाहा आणि यानिमित्ताने, आपण, आपलं कुटुंब, आपले नातेसंबंध इत्यादी गोष्टींचा, मनोमन धांडोळा घ्यायचा प्रयत्न जरूर करा. 

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Deshpande Shriram About 129 Days ago
सुंदर विश्लेषण. Keep it up
1
0

Select Language
Share Link
 
Search