Next
‘मुकुल माधव’तर्फे शौचालयांसाठी अर्थसहाय्य
प्रेस रिलीज
Tuesday, January 09, 2018 | 03:16 PM
15 0 0
Share this article:

पुणे :  रानावनात भटकंती... आरोग्य, शिक्षण याबाबत अनभिज्ञ... डोंगराळ भागात राहणारे... मुख्य प्रवाहापासून दूर असणारे... इतकी वर्षे उघड्यावरच शौचाला जाणारे पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवही आता ‘टॉयलेट’मध्ये जाणार आहेत.

पुण्यातील फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने मुंबईतील खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने पालघर जिल्ह्यातील सोनाळे या आदिवासी गावात ५० अत्याधुनिक शौचालये बांधली असून, त्यावर सौर दिवेही बसविले आहेत. त्यासाठी सुमारे १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे.

सोनाळे गावात एकूण १२३ घरे असून, त्यातील ५० घरांना पहिल्या टप्प्यात शौचालये बांधून देण्यात आली आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन नुकतेच झाले. या प्रसंगी समाज कल्याण विभाग वाडाचे अध्यक्ष सोन्या पाटील, प्रशासकीय अधिकारी संदीप जाधव, श्री. खोसे, सोनाळे गावच्या सरपंच अरुणा गुरुडे, उपसरपंच पंढरीनाथ मरड, फिनोलेक्सचे बी. आर. मेहता, मुकुल माधव फाउंडेशनचे जितेंद्र जाधव, बबलू मोकळे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रातिनिधीक फोटोमुकुल माधव फाउंडेशनने सोनाळे गाव दत्तक घेतले असून, चार टप्प्यांत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. उर्वरित ७३ शौचालये दुसऱ्या टप्प्यात ग्रामस्थांच्या संमतीनंतर बांधली जातील. तिसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायतीच्या संमतीने सौर पथदिवे बसविले जाणार आहेत, तर चौथ्या टप्प्यात आरोग्याविषयी जागृती कार्यक्रम आणि आरोग्य शिबिरे घेतली जाणार आहेत. यासाठी प्रति शौचालय २४ हजार रुपये आणि सौर दिव्यासाठी ११५० रुपये असा एकूण २५ हजार १५० रुपये खर्च आला आहे. त्यातील दोन हजार रुपये (शौचालयाचे), तर ५० रुपये (सौर दिव्याचे) नागरिकांनी भरले आहेत. उर्वरित खर्च फाऊंडेशनने उचलला आहे.

सोनाळे गावात उभारलेली ही शौचालये पर्यावरणपूरक आहेत. ऊन, पाऊस आणि वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी तसेच प्रायव्हसी मिळेल, अशी रचना आहे. समाजाप्रती आपणही काहीतरी देणे लागतो, ही भावना रुजविण्यासाठी ग्रामस्थांकडून दोन हजार रुपये शौचालयासाठी आणि ५० रुपये सौर दिव्यासाठी वर्गणी घेण्यात आली आहे. त्यातून जमलेली एक लाख दोन हजार पाचशे रुपये इतकी रक्कम शहीद सैनिकांच्या पत्नींसाठी कार्यरत केंद्र सरकारच्या समितीला देण्यात आली आहे.

या प्रकल्पाविषयी फाउंडेशनच्या रितू छाब्रिया म्हणाल्या, ‘सोनाळे या आदिवासी गावाला स्वावलंबी आणि सक्षम बनविण्यासाठी फाउंडेशन काम करीत आहे. उघड्यावरील शौचामुळे होणारे आजार, आरोग्यावरील घातक परिणाम गावकऱ्यांना सांगितले. प्रत्येक घरासाठी स्वतंत्र शौचालय बांधून हागणदारी मुक्त गाव करायचे आहे. मुली आणि महिलांना खासगी आणि सुरक्षित आयुष्याबाबत जागृत करण्यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील आहे. अपुऱ्या आरोग्याच्या सोयीमुळे अनेक आजार उद्भवतात. हीच बाब लक्षात घेऊन आदिवासी पाड्यांमध्ये शौचालय उभारण्याचा प्रयत्न करीत आहोत. भारतातील ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search