Next
परंपरेला वर्तमानाचा संदर्भ लावला, तरच ती टिकते, सशक्त होते : डॉ. प्रभा अत्रे
BOI
Friday, April 20 | 11:55 AM
15 0 0
Share this story

डॉ. प्रभा अत्रे यांचा पुण्यभूषण पुरस्काराने गौरव

पुणे :
‘संगीत शिक्षणाचा साकल्याने विचार होणे गरजेचे आहे. संगीतातील रागसमय यांसारख्या संकल्पना विज्ञानाच्या कसोटीवर तपासणे आवश्यक आहे. कोणत्याही परंपरेला वर्तमानकाळाचा संदर्भ लावता आला पाहिजे, तरच ती परंपरा टिकते, सशक्त बनते. शास्त्र म्हटले की त्यात एकवाक्यता हवी. आजच्या कलाविष्काराला सामावून घेणाऱ्या शास्त्राची आम्हाला गरज आहे, हे लक्षात घेतले पाहिजे,’ असे विचार ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी गुरुवारी (१९ एप्रिल) पुण्यात मांडले. 

पुण्यभूषण फाऊंडेशन (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार डॉ. प्रभा अत्रे यांना बालगंधर्व रंगमंदिरात प्रदान करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा, ख्यातनाम बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ या दिग्गजांच्या हस्ते डॉ. अत्रे यांना गौरविण्यात आले. एक लाख रुपये रोख, बालशिवाजी सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिमा आणि पुण्याच्या ग्रामदेवतांसह असलेले वैशिष्ट्यपूर्ण स्मृतिचिन्ह देऊन डॉ. अत्रे यांचा सन्मान करण्यात आला. 
या वेळी व्यासपीठावर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, अयान अली बंगश, उद्योजक गजेंद्र पवार आणि पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. 

या पुरस्काराबरोबरच सहा स्वातंत्र्यसैनिकांना, कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या सैनिकांना आणि वीरपत्नींना भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये रघुनाथ गंगाराम लकेश्री, फुरबू रिंडॉल, संदीप बाजीराव उकिरडे, श्रीमती विनिता अशोक कामटे (दिवंगत अशोक कामटे यांच्या वीरपत्नी), दीनदयाळ वर्मा, प्रल्हाद कृष्णराव रेभे यांचा समावेश होता.

पुण्यभूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात सहा स्वातंत्र्यसैनिक, कर्तव्य बजावताना जखमी झालेले सैनिक आणि वीरपत्नी यांचाही गौरव करण्यात आला.

‘पुरस्काराचे यंदाचे तिसावे वर्ष आहे. पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने यंदाच्या मान्यवरांची निवड केली,’ अशी माहिती डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविकात दिली. तसेच ‘ग्लोबल पुलोत्सव’ या आगामी उपक्रमाची माहितीही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरजा आपटे यांनी केले. सुरेश धर्मावत (काका) यांनी आभार मानले. दगडूशेठ हलवाई गणपती मंडळातर्फे महेश सूर्यवंशी यांनीही गणेशमूर्ती देऊन डॉ. प्रभा अत्रे यांचा सन्मान केला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना डॉ. अत्रे यांनी संगीत क्षेत्रात आवश्यक असलेल्या बदलांबाबत स्वतःचे विचार मांडले, तसेच कृतज्ञताही व्यक्त केली. ‘संगीताने, श्रोत्यांनी मला ओळख दिली. पूर्णत्वाकडे जाणाऱ्या रस्त्यावर साथ देणाऱ्या सर्वांची कृतज्ञ आहे. मी प्रस्तुतीकरणाचा वेगळा विचार केला. पुणेकरांना अभिमान वाटेल असे काही करायचे आहे. माझे गुरू सुरेश बाबू माने, हिराबाई बडोदेकर, किराणा घराणे यांचीही मी ऋणी आहे. पुण्यात गुरुकुल उभारण्याची इच्छा आहे,’ अशी भावना डॉ. अत्रे यांनी व्यक्त केली.

उस्ताद अमजद अली खाँ म्हणाले, ‘सर्व देशवासीयांना प्रभा अत्रे यांनी आपल्या गायकीने आनंद दिला आहे. किराणा घराण्यातील प्रत्येकाने स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवले आहे. ख्याल-ठुमरी अशा दोन्ही प्रकारांवर प्रभा अत्रे यांचे प्रभुत्व आहे. संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी एकत्र येऊन संगीत क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्याची भारतातील ही पहिलीच वेळ आहे.’

‘प्रभा अत्रे यांच्याशी माझा खूप जुना परिचय आहे. तेव्हापासून मी त्यांचे अनुसरण करीत आलो आहे. अत्रे या गुणी कलाकार आहेत. आजचा सोहळा पाहून असे वाटले, की हाच खराखुरा सन्मान आहे. मला का नाही मिळाला हा सन्मान? पुढील जन्म महाराष्ट्रात व्हावा, इथल्या मातीत संगीताचा सुगंध आहे,’ अशा शब्दांत पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी आपल्या भावना मांडल्या.

पं. शिवकुमार शर्मा म्हणाले, ‘मी आणि प्रभा अत्रे यांनी जम्मू रेडिओवर एकत्र गायन केले आहे. एका बिंदूपासून सुरुवात करून प्रभा अत्रे आता समुद्र बनल्या आहेत. नाव झाल्यावर अनेक कलाकारांचे वर्तन बदलते; पण डॉ. प्रभा अत्रे बदलल्या नाहीत. त्या अद्भुत गायिका आहेतच; पण चिंतनशील तज्ज्ञ आहेत. त्यांच्या वयाच्या शतकपूर्तीचाही असाच दिमाखदार सोहळा व्हावा.’

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. विनय सहस्रबुद्धे म्हणाले, ‘अत्रे घराण्याचा बहुआयामी, बंडखोर असण्याशी संबंध आहे, असे प्रभाताईंकडे पाहून वाटले. संगीताचा व्यामिश्र विचार प्रभाताई मांडतात. मैफली गाजवतात. संगीताचे सर्व प्रकार त्यांनी गायले. संगीताने त्यांचे मन विशाल बनले आहे. परंपरेशी इमान राखून त्यांनी नवता अंगीकारली. साधनेचा उपयोजनाशी संबंध प्रभाताईंनी जोडला. घराण्याचा वृथा अभिमान न बाळगता एकत्र येऊन संगीत विचार केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली. संगीत अकादमीच्या माध्यमातून त्यांनी आणखी कार्य करावे.’

(पुण्यभूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याची झलक दर्शविणारा, तसेच डॉ. अत्रे यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link