Next
देस-परदेस... प्रदर्शन मांडणीचा अस्सल नमुना
BOI
Thursday, November 29, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

नव्या संकल्पना, शक्यता लक्षात घेऊन प्रदर्शन मांडणे आणि एका प्रकारे एकात्म अनुभव देणे ही एक डिझाइन शाखा गेल्या दोन दशकांत निर्माण झाली आहे. भारतात गेल्या काही वर्षांत या प्रकारे प्रदर्शन मांडणी होताना दिसू लागली आहे. त्याचे उदाहरण म्हणजे मुंबईत झालेले ‘देस-परदेस’ हे प्रदर्शन. ‘स्मरणचित्रे’ सदरात आज त्या प्रदर्शनाबद्दलच्या लेखाचा पहिला भाग...
......
मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, ब्रिटिश म्युझियम, नवी दिल्लीचे नॅशनल म्युझियम इत्यादींच्या सहकार्यातून आणि गेट्टी फाउंडेशन व टाटा ट्रस्ट यांच्या सौजन्याने अनेक तज्ज्ञांच्या सहकार्याने ‘देस-परदेस’ हे भव्य प्रदर्शन २०१७-१८मध्ये मुंबईत साकारण्यात आले होते. एखादे चित्रप्रदर्शन किती आकर्षक असावे, याचे ते प्रदर्शन म्हणजे उत्तम उदाहरण होते. काळाचा अनुभव कसा द्यावा, याचे हे उदाहरण होय. प्रागैतिहासिक काळापासून अत्याधुनिक काळापर्यंतच्या कलात्मक वस्तू अथवा कलाकृती एकत्रित मांडलेल्या असूनही, त्या त्या काळातील अनुभव त्या कलाकृतीसह अनुभवण्यासाठी वेगवेगळ्या योजना त्यात केल्या होत्या. या योजना सूचक होत्या. वास्तववादी योजनांपेक्षा या सूचक योजना जास्त प्रभावी होत्या. या प्रचंड काळाचे त्यात नऊ भागांत विभाजन करण्यात आले होते. प्रवेशाच्या दोन्ही बाजूंनी दिव्यांची आकर्षक रचना केलेली. दाराच्या मधोमध पितळखोरा येथे मिळालेली सुप्रसिद्ध यक्षमूर्ती ठेवलेली होती. बाकी परिसर अंधारात आणि मूर्तीवर प्रकाश पार्श्वभूमी करड्या रंगाची. एकूणच प्रदर्शनात रंगसंगती आणि प्रकाशयोजनेवर भर होता. रंगाचा वापर किती संयमाने करता येतो, याचे धडे कोणालाही घेता येतील असा बाज....

प्रवेश केल्या केल्या आपण एखाद्या गूढ गुहेत गेल्याचा भास व्हावा, असे वातावरण. समोर प्रागैतिहासिक काळातील दोन दगडी हत्यारे हवेत तरंगत असल्याचा भास होणारी मांडणी. एक हत्यार भारतातील आणि एक टांझानियामधील. जगात मानवाने कला, कौशल्य आणि तंत्र-विज्ञान याचा विकास एकाच पद्धतीने, परंतु दोन भिन्न भौगोलिक ठिकाणी कसा केला, याचा अंदाज घेता यावा, साम्य-भेद काही विशेष कष्ट न घेता सहज मनात यावेत, अशी मांडणी. आजूबाजूला लहान आवाजात कुजबुज सुरू. लोक आपापल्या पातळीवर विश्लेषण करत होते. मानवी उत्क्रांतीचा पुढचा टप्पा म्हणजे भांडी. वळी पद्धतीची आणि चाकावरची अशा दोन्ही पद्धतींनी तयार केलेली भांडी. वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणची, तिथल्या-तिथल्या मातीची; पण एक प्रकारच्या स्थानिक आकार गरजेप्रमाणे लाभलेला. वैविध्यपूर्ण आकार... चीनची भांडी, इराणी भांडी, इजिप्तची भांडी, आफ्रिकेतील भांडी आणि कुठली कुठली.. बुडाची आणि बिनबुडाचीही. डिझाइनच्या सगळ्या घटकांचा पुरेपूर वापर केलेला. काहींवर रंगवलेले, काहींना कोरलेले, काहींवर रेघोट्या... खूप काळजीपूर्वक जमवलेली ही भांडी करड्या पार्श्वभूमीवर मांडली होती. पुढे इजिप्त, मेसोपोटेमियातील शिल्पाकृती, त्या-त्या काळातील प्रतिनिधित्व करणाऱ्या. इजिप्तच्या चित्रांशी आपला परिचय असतोच. परिचय नसतो तो आत्म्याच्या घराचा. दोन मजली घरच... भाजलेल्या मातीचे भातुकलीत असते तशा प्रमाणातील घर... इजिप्तच्या संस्कृतीत अशा घरांची (मॉडेलची) निर्मिती आत्म्याच्या घराच्या रूपात होत असे. त्याबरोबरच सिंधू संस्कृतीमधील अपरिचित वस्तूही त्यात मांडल्या होत्या. एक अगदी लहानसा बैल होता.... दगडी. दगडाचे वेगवेगळ्या आकाराचे लयदार रंग नैसर्गिकच होते.. त्याचा लहानसा बैल केलेला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याच्या शिंगांच्या जागी सोन्याची तार ओवण्याची सोय आणि दोन्ही बाजूला त्या तारेतून होणारा शिंगांचा आकार. हा लहानसा बैल मांडताना अगदी एकटा ठेवलेला होता. भरपूर मोठ्या जागेत, मोठ्या पेटीत हा लहानसा बैल सर्व बाजूंनी पाहता येईल आणि त्या दगडाचे पारदर्शक असण्याचे सौंदर्य राहावे आणि पाहताना त्याचे प्रकाशात असणे, याची काळजी घेतलेली होती. लहान मुलांना त्या लहान शिल्पाचे खूप आकर्षण असल्याचे जाणवत होते. त्याच्या जवळच दोन वैशिष्ट्यपूर्ण अंगठ्या मांडल्या होत्या. धातूच्या चपट्या, लांबट तुकड्याच्या, सहज नक्षीत रूपांतर होण्याच्या गुणधर्माचा खूप सुंदर मिलाफ या अंगठ्यांमध्ये होता. सर्वार्थाने या अंगठ्या म्हणजे उपयुक्तता आणि सौंदर्य याचा मिलाफ होत्या. सोप्या आणि सरळ पद्धतीचे डिझाइन या अंगठ्यांमध्ये होते. सिंधू संस्कृतीच्या कालखंडाला त्या समकालीन होत्या. हा ठेवा सर्वस्वी नवा होता... सामान्य प्रेक्षकांसाठीदेखील....ग्रीक, रोमन आणि भारतीय ऐतिहासिकदृष्ट्या एकाच कालखंडातील तीन शीर्षाची शिल्पे एकत्र मांडलेली होती. एक संगमरवरातील, एक धातू ओतकामाचे आणि एक तांबड्या वालुकाश्मातील. सहज तुलना करावी... प्रत्येक ठिकाणचा भिन्न कलाविषयक दृष्टिकोन... विभिन्न केशभूषा-शिरोभूषा. त्यापुढील दालनात स्तंभशीर्षे ठेवलेली... त्यांना पाहायला जाताना छापील स्वरूपात खांबांच्या पूर्णाकृती प्रतिमा मांडलेल्या होत्या. जणू आपण भाजे किंवा कार्ले येथील चैत्य गुंफांमध्ये प्रवेश करीत आहोत, असा एकूण माहौल तयार होत होता. पुन्हा दोन विभिन्न, परंतु एकमेकांशी संबंधित संस्कृतींमधील खांबांचे वरचे भाग एकाशेजारी एक मांडलेले. त्या स्तंभशीर्षावरून खांबाच्या आणि मूळ इमारतीच्या भव्यतेची कल्पना यावी. गडद पार्श्वभूमीवर अमरावती येथील स्तूपाच्या अवशेषांपैकी भगवान बुद्धांचा मुकुट डोक्यावरून वाहून नेणाऱ्या व्यक्ती असलेले शिल्प होते. तेथे शिरोभूषणे मांडलेली होती. एका अर्धवर्तुळाकार दालनामध्ये फिकट हिरव्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्वरूपाची शिल्पे मांडलेली होती. हा फिकट निळसर हिरवा रंग काही तरी वेगळेपण ठसवत होता. त्या दालनाचे नाव होते ‘दिव्यत्वाचे चित्रण.’ त्यामध्ये इंडोनेशियातील गणेश, स्तंभावरील चक्र, बाहुबलीची धातूची मूर्ती, इसा मसीहची गोव्यातील लाकडी प्रतिमा, जमैकामधील तायनो देवतेची लाकडी मूर्ती, कुतुबमिनारावरील सुलेखनाची कुरणातील शब्दांची पाटी, हवाई बेटांवरील युद्धदेवता, मेक्सिकोमधील डूआस्टेक देवी... एकाच वेळी पाहा. लोकांना देव कसा दिसतो? त्याचे कलेत अंकन कसे होते? काही देवता मानव रूपात, काही प्रतीकात्मक, तर काही शब्द रूपात दर्शविलेल्या. पुन्हा तुलना करायला वाव आणि एकत्र पाहण्याची संधी...

हिंदी महासागरातील व्यापारामुळे अनेक वस्तूंची ये-जा झाली. जीवन जगण्यासाठीच्या अनेक उपभोग्य वस्तूंचे आदान-प्रदान झाले. माणसाने आपल्या मातृभूमीपासून भिन्न भूमीच्या शोधात व्यापार आणि आक्रमणे केली. त्यातून विकास होत गेला. यंत्र-अवजारांचा वापर मानवी जीवनात येऊ लागला होता. ग्रह-ताऱ्यांचे स्थान दर्शविणारी पितळी यंत्रे, त्याबरोबरच कोल्हापूर येथे सापडलेला पॅसीडॉनचा पुतळा, जो रोमन संस्कृतीचे येथील अस्तित्व दर्शविणारा होता. इजिप्तमधील फुस्तात येथील भारतीय कापसाचे व भारतात छपाई केलेले वस्त्र या दालनात मांडले होते. द्युरर या चित्रकाराने प्रत्यक्ष न पाहता वर्णनावरून केलेला गेंडा ही खूप प्रसिद्ध चित्रकृती आहे. पोताचा खूप उत्तम वापर यात द्युररने केला आहे. 

या देस-परदेस नावाच्या नऊ भागांच्या प्रदर्शनात मानवाची सुरुवातीची कला, पहिलीवहिली शहरे, साम्राज्ये, राज्य आणि धर्म, दिव्यत्वाचे चित्रण आणि हिंदी महासागरातील व्यापार ही दालने महत्त्वाची होतीच. परंतु पुढील दालनांमधील कलाकृती जास्त महत्त्वाच्या होत जातात. 

हिंदी महासागरातून बोटीने व्यापार झाला. एका मांडणीत जमिनीवर ठळक काळ्या रेषांनी जहाजाचे प्लान स्वरूपातील चित्रण केलेले होते. त्यात जहाजाच्या अस्तित्वाचा भास होत होता. व्यापार असण्याच्या ऐतिहासिक सत्याचे ते मांडणी शिल्प होते. (क्रमश:)

(या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna Gramopadhye About 188 Days ago
Documentary can be shown everywhere It will be money well spent .
0
0

Select Language
Share Link
 
Search