Next
वाहन खरेदीच्या निर्णयावर डिजिटल माध्यमांचा प्रभाव
ऑनलाइन माहिती घेण्याचे वाढते प्रमाण
BOI
Wednesday, January 30, 2019 | 05:45 PM
15 0 0
Share this story


नवी दिल्ली : भारतातील वाहन खरेदीची संस्कृती वेगाने बदलत असून, सुमारे ९० टक्के ग्राहकांच्या वाहन खरेदीच्या निर्णयावर डिजिटल माध्यमांचा प्रभाव पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुगल आणि बाजारपेठेचा अभ्यास करणारी संस्था कँटर टीएनएस यांनी संयुक्तपणे केलेल्या एका अभ्यासात हा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. 

भारतातील लोकांची वाहन खरेदीची प्रक्रिया, त्यादरम्यान करण्यात येणारे संशोधन या सर्वांचा अभ्यास करण्यात आला. यासाठी भारतातील चार हजार नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. त्यावर आधारित ‘ड्राईव्ह टू डिसाईड २०१८’ हा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला. त्यात हे निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत. 

या अहवालानुसार, ९० टक्के शोध, ८० टक्के व्हिडिओ आणि ५६ टक्के डीलर्सच्या वेबसाइटस् हे वाहन खरेदीतील महत्त्वाचे घटक आहेत. वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकाच्या निर्णयावर या सर्व घटकांचा मोठा प्रभाव असतो. गेल्या दोन वर्षात वाहन खरेदीपूर्वी ऑनलाइन शोध घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. त्यातही ज्या ब्रँडची कार घ्यायची आहे त्याबाबतची माहिती घेण्याचे प्रमाण अधिक आहे. दुसऱ्या ब्रँडकडे वळण्याचे प्रमाण २०१६ मध्ये ११ टक्के होते, ते आता २०१८ मध्ये सात टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. व्हिडिओ या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. केवळ वेगवेगळ्या वाहनांचा शोध घेण्यासाठी नव्हे, तर वेगवेगळ्या दृष्टीकोनातून वाहनाचा अभ्यास करण्यासाठी व्हिडिओची मदत घेतली जाते. सल्लागाराची भूमिकाच जणू हे व्हिडिओ पार पाडतात. इतके त्यांचे महत्त्व वाढलेले आहे. 

‘वाहन उत्पादक, वितरक शोधण्यासाठी, तसेच कार किंवा अन्य वाहनाची फीचर्स, कार्यक्षमता याबाबतच्या आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ग्राहक व्हिडिओंचा आधार घेतात,’ असे गुगल इंडियाच्या विक्री विभागाचे भारतातील संचालक विकास अग्निहोत्री यांनी सांगितले. 

गेल्या दोन वर्षात ग्राहकांचे ऑनलाइन व्हिडिओ वापरण्याचे प्रमाण जवळपास दुप्पट झाले आहे. २०१६ मध्ये हे प्रमाण ४३ टक्के होते ते आता ८० टक्के झाले आहे. कार खरेदी करताना ऑनलाइन व्हिडिओद्वारे संशोधन करणाऱ्या ८७ टक्के ग्राहकांपैकी ५२ टक्के ग्राहकांनी त्या माहितीच्या आधारे वितरकांना भेट दिली. ४५ टक्के ग्राहकांनी टेस्ट ड्राईव्ह निश्चित केली. ४० टक्के ग्राहकांनी किंमतीची चौकशी, २७ टक्के लोकांनी अर्थसाहाय्याविषयी, ४१ टक्के लोकांनी देखभाल योजनांविषयी, ३७ टक्के लोकांनी प्रमोशन ऑफर्सबाबत, तर ३२ टक्के लोकांनी इतर लोकांची मते, शिफारसी याची माहिती घेतली, असे या अहवालात म्हटले आहे. 

‘ज्या वेगाने भारतीय इंटरनेटचा वापर करत आहेत ते पाहता वाहन उत्पादकदेखील ऑनलाइन माध्यमाचा अधिकाधिक प्रभावी वापर करण्यावर भर देत आहेत,’ असेही अग्निहोत्री यांनी नमूद केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link