Next
गंगाईकोंडा चोलापुरम
BOI
Wednesday, June 13, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

गंगाईकोंडा चोलापुरम
गंगेचे पाणी तमिळनाडूत नेऊन बांधलेले मंदिर म्हणून गंगाईकोंडा चोलापुरम येथील छोटा बृहदीश्वर मंदिर ओळखले जाते. तमिळनाडूतील अरियालूर जिल्ह्यात असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणाला फेरफटका मारू या... ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात...
......
गंगाईकोंडा चोलापुरमगेल्या दोन-तीन लेखांमध्ये आपण तमिळनाडूतील मराठ्यांशी संबंधित माहिती घेतली. त्यातील तंजावरचे मंदिर चोला राजांनी बांधले. या चोला राजवटीचा देदीप्यमान इतिहास थोडक्यात जाणून घेऊ. तिसऱ्या शतकातील सापडलेल्या तमिळी शिलालेखावरून मौर्य काळातही चोला राजवट दक्षिणेत अस्तित्वात होती, असे दिसून येते. इ. स. पूर्व ३००पासून ते इ. स. १३०० पर्यंत साधारण १६०० वर्षे या घराण्याची दक्षिण भारतात अनिर्बंध सत्ता होती. इ. स. ९००पर्यंत कावेरीच्या सुपीक प्रदेशावर त्यांची सत्ता होती. त्यानंतर त्यांच्या राजवटीचा तुंगभद्रेपर्यंत विस्तार झाला. दहाव्या ते तेराव्या शतकापर्यंत चोला राजे खूपच प्रबळ झाले. लष्कर, आरमार, संपत्ती व संस्कृती यामध्ये ते श्रेष्ठ ठरले होते. चोला राजांनी समुद्रावरही वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यांच्या आरमारात युद्धनौकांचा ताफा असे. इ. स. १३००नंतर पंड्या राजवटीचा उदय झाला आणि चोला राजवटीचा ऱ्हास होत गेला.

इ. स. १०००मध्ये राजराजे चोला याने राज्यविस्तार करून संपूर्ण पूर्व किनारपट्टी काबीज केली होती. त्याचा मुलगा राजेंद्र चोला पहिला याने पाटलीपुत्र येथील पाला राजवटीला हरविले होते. तसेच मालदीव, सिलोन, मलेशिया ते बाली बेटांपर्यंत धडक मारली होती.

पाला राजवटीवरील विजयाप्रीत्यर्थ त्याने छोटा बृहदीश्वर या शिवमंदिराची स्थापन केली. या मंदिराची उभारणी करताना राजाने गंगा नदीपर्यंत असलेल्या आपलेल्या मांडलिक राजांकडून गंगेचे पाणी मागविले आणि मंदिराची उभारणी केली, अशी आख्यायिका सांगितली जाते. ही गोष्ट अशक्यप्राय वाटत नाही. जयपूरच्या म्युझियममध्ये चांदीचा प्रचंड हंडा आहे. राजा इंग्लंडला जाताना पिण्यासाठी गंगेचे पाणी त्या हंड्यातून घेऊन गेला होता. त्यामुळे या मंदिराच्या उभारणीसाठीही समुद्रमार्गे पाणी आणले गेले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. गंगेच्या प्रदेशावरील विजयाचे प्रतीक म्हणून हे मंदिर उभारले गेले. त्यामुळे या गावालाही गंगाईकोंडा चोलापुरम हे नाव पडले.

इ. स. १०३५मध्ये हे मंदिर बांधून पूर्ण झाले. हे मंदिर शिवशंकराचे असले, तरी श्री विष्णू, दुर्गा, हरिहर व अर्धनारीश्वर यांच्याही मूर्ती येथे आहेत. प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना असणारी जय आणि विजय यांची शिल्पे पाहूनच आत काय असेल, याची कल्पना येते. दारावरील महिरपीचे नक्षीकाम अप्रतिम आहे. येथील शिवलिंग चार मीटर उंचीचे असून, ते आशियातील मोठे शिवलिंग समजले जाते. मंदिर प्रांगण ३४० फूट लांब आहे. त्यातील १०० फूट मंदिर संकुलात नंदी मंडप, अलंकार मंडप, महामंडप, मुखमंडप आणि अर्धा मंडप अशी रचना आहे. नऊ मजली शिखराची उंची १८० फूट आहे. यातील काही भाग इ. स. १४००नंतरच्या राजांनी बांधला आहे. ताम्रपट, तसेच भिंतीवरील शिलालेखांतून चोला राजवटीसंबंधी माहिती मिळते. तसेच चालुक्यांचाही यावर असलेला प्रभाव दिसून येतो.

चोला राजे कलाप्रेमी होते. त्यांच्या साम्राज्यविस्ताराने त्यांना विपुल धनही प्राप्त झाले होते. बांधकामाबरोबरच त्यांनी शिल्पकलेला उत्तेजन दिले. राजदरबारांमध्ये नृत्य, गायन व नाट्य यांना आश्रय होता. चोला बांधकाम शैलीचा ठसा त्यांनी दक्षिण भारतात उमटविला.


अवशेषरूपात सापडलेल्या किल्ल्याची तटबंदी उत्तर-दक्षिण सहा हजार फूट आणि पूर्व-पश्चिम साडेचार हजार फूट आहे, राजेंद्र चोलाचा पुत्र कुलोतुंग याने गावाभोवती तटबंदी बांधली. १३व्या शतकाच्या अखेरीस पंड्या राजांनी चोला राजवट संपुष्टात आणली. त्यानंतर हा भाग विजयनगरच्या आधिपत्याखाली गेला. या दोन्ही राजांनी मंदिराला भरपूर देणग्या दिल्या. किल्ल्यात पूर्वी १७०० फूट लांब, १३०० फूट रुंद राजप्रासाद होता. किल्ल्याच्या बाहेर उत्तरपूर्व बाजूला बृहदीश्वर मंदिर आहे. जवळच राजेंद्र चोला याना बांधलेला सिंहतीर्थ नावाचा तलाव आहे.

म्युझियम : येथील म्युझियममध्ये चिनी मातीची भांडी, लोखंडी पकड, बांगड्या, दगडापासून केलेले सुशोभित दागिने, शस्त्रास्त्रे, पाषाणातील शिल्पे, नाणी, पर्णलेख अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात.

आजूबाजूची पर्यटनस्थळे :

एलाकुरुचीएलाकुरुची (Elakuruchi) : गंगाईकोंडा चोलापुरमपासून ५९ किलोमीटरवर एलाकुरुची हे ठिकाण असून, फादर कॉन्स्टेंटाइन जोसेफ बेस्ची यांनी इ. स. १७११मध्ये येथील चर्चची स्थापना केली. १९९९मध्ये याची छोट्या बॅसिलिक वर्गात नोंद करण्यात आली.

जयमकोंडा चोलापुरम : गंगाईकोंडा चोलापुरमपासून हे ठिकाण १०.५ किलोमीटरवर असून, येथे २५ ऐतिहासिक मंदिरे आहेत. या मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी - चोला घराण्यातील एक राजा येथील जंगलात शिकारीसाठी गेला असताना त्याच्या अगोदर तिथे दुसरे कोणी तरी शिकारीसाठी आलेले दिसले. राजाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो उत्तर दिशेला बेपत्ता झाला. राजाने एक बाण सोडला. तो मुंगीच्या वारुळावर आदळला. तेथून रक्त येऊ लागले. तेथे खोदले असता मोठे शिवलिंग सापडले. नंतर तेथेच शिवमंदिर बांधण्यात आले.
येथे तांबूस कोळशाचे (Lignite deposits) मोठे साठे सापडले असून, त्यावर आधारित औष्णिक केंद्रही उभारण्यात येत आहे.

जयमकोंडा चोलापुरमअरियालूर : हे जिल्ह्याचे ठिकाण असून, कालियापेरुमल मंदिर हे गावातील आकर्षण आहे. या जिल्ह्यात सिमेंट उद्योग मोठ्या प्रमाणावर आहे.

या लेखातील माहिती व फोटोंसाठी सातारा येथील डॉ. सौ. फडके व डॉ. फडके यांचे चिरंजीव नरेंद्र यांचे खूप साह्य झाले. त्यांनी काढलेले फोटोच या लेखात वापरलेले आहेत. गंगाईकोंडा चोलापुरम हे ठिकाण चेन्नईपासून २७६ किलोमीटरवर आहे. जवळचा विमानतळ त्रिचीला असून, त्याचे अंतर १२० किलोमीटर आहे. जवळचे रेल्वे स्टेशन अरियालूर येथे, ५० किलोमीटरवर आहे. तंजावर, त्रिचनापल्ली, जिंजी, मदुराई या ठिकाणी नागपूर, पुणे, मुंबईपासून रेल्वेने जाणे शक्य आहे. जाण्या-येण्याचा प्रवास चार दिवस आणि फिरण्याचे पाच दिवस अशी नऊ ते १० दिवसांची सहल छान होईल. विमानाने प्रवास करायचा झाल्यास, ही ठिकाणे पाच-सहा दिवसांत फिरणे शक्य आहे. गंगाईकोंडा, अरियालूर येथे राहण्याची उत्तम सोय आहे. येथे जाण्यासाठी साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंतचा कालावधी योग्य आहे.

- माधव विद्वांस
ई-मेल :
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

गंगाईकोंडा चोलापुरम

(गंगाईकोंडा चोलापुरम तसेच काही आसपासच्या ठिकाणांची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Mohan kulkarni About
छान माहिती, फोटो उत्तमच!! येथे एकदा जाऊन यावे असे वाटले!😊😊
1
0
वसंत लांडगे About
सविस्तर आणि चित्र पूर्ण माहितीसाठी धन्यवाद.त्यामानाने दक्षिणेकडील शिल्प खूप सुरक्षित दिसते.मूर्तिभंजन कमी दिसते.
0
0

Select Language
Share Link
 
Search