Next
‘राज्यातील सर्व शाळा होणार डिजिटल’
BOI
Wednesday, May 24, 2017 | 10:00 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘शालेय शिक्षण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील शाळा डिजिटल करण्यात येत आहेत. डिसेंबर २०१८पर्यंत राज्यातील सर्व शाळा डिजिटल होतील. त्यातून विद्यार्थ्यांना या अभियानांतर्गत आनंददायी, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. 

‘यश आणि त्यातून विकास साधण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील शाळा डिजिटल करण्यासह विद्यार्थ्यांचा ‘लर्निंग आउटकम’ १०० टक्के करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांतील शैक्षणिक प्रगती पाहता महाराष्ट्राने शिक्षण क्षेत्रात १८व्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आज खासगी शाळांमधून जवळपास १५ हजार विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांत प्रवेश घेतला आहे. याचा अर्थ या शाळांमधील शिक्षण आणि प्रयोगशील शिक्षकांचे हे यश आहे. विशेष म्हणजे शहरांपेक्षा ग्रामीण भागात शाळा डिजिटल होण्याचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील ४४ हजार शाळा डिजिटल झाल्या आहेत,’ अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

‘अलीकडे वेगवेगळ्या खासगी शाळांमध्ये भरमसाठ शैक्षणिक शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारी दूर करण्यासाठी शुल्क नियामक प्राधिकरण काम करत असून, त्यासाठी नव्याने डॉ. पळशीकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे,’ असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांबद्दलही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपूर्ती योजनेमुळे समाजातील सर्वच विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळेल. याबरोबरच जुन्या योजनांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. अल्पसंख्याक, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध महामंडळांमार्फत दिले जाणारे शैक्षणिक कर्ज, नामांकित शाळांमध्ये प्रवेश, विद्यार्थ्यांसाठी ‘स्वयम्’सारख्या विविध योजना महत्त्वपूर्ण ठरतील.’
 
प्रातिनिधिक फोटो‘टेकसॅव्ही’ शिक्षकांचे कौतुक
विद्यार्थ्यांना घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या ५० हजार शिक्षकांनी स्वतःला ‘टेकसॅव्ही’ घोषित केले आहे. या शिक्षकांनी वेगवेगळी ॲप्स तयार करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण डिजिटल शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे.

‘वाचन-लेखन महत्त्वाचे’
‘आज डिजिटायझेशन, हायस्पीड टेक्नॉलॉजी यांचा शिक्षणात वापर केला जात असला, तरी शिक्षणात लेखन-वाचनदेखील तितकेच महत्त्वपूर्ण आहे. आज काहीही संशोधन करायचे असले, तरी गुगलचा वापर करण्यापेक्षा वाचन वाढवून स्वतःच्या नोट्स काढा,’ असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. तसेच पारंपरिक ज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्याचे आवाहनही त्यांनी केले.

(मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण संवाद पाहण्यासाठी https://youtu.be/Wc80lkCubi0 या लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search