Next
नगर जिल्ह्यातली पहिली ग्लोबल क्लासरूम सुरु
प्रेस रिलीज
Saturday, September 16, 2017 | 03:36 PM
15 0 0
Share this article:

शिर्डी/पुणे : ‘सातशे कोटी लोकसंख्या असलेल्या दुनियेत माणसाला माणसाकडून माणूस बनण्यासाठीच शिकायचे आहे. त्यासाठी जगभरातील माणसांचा एकमेकांशी सुसंवाद होणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन पुण्यातील संगणकतज्ञ संतोष तळघट्टी व्यक्त केले.

शिर्डी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सुरू  करण्यात आलेल्या ग्लोबल क्लासरूमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नगर जिल्ह्यातील ही पहिली ग्लोबल क्लासरूम असून यामुळे या शाळेचे विद्यार्थी जगाशी मुक्तसंवाद साधू शकणार आहेत.

या प्रसंगी शाळा विकास समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. जे. के. गोंदकर, केंद्रप्रमुख सौ. दातीर, विस्तार अधिकारी श्री. गौते, नगरसेवक सुजित गोंदकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आरिफ कादरी, मुख्याध्यापक शैलजा वाघमारे, उपमुख्याध्यापक श्री. बैलम आदी उपस्थित होते.

संतोष तळघट्टी म्हणाले, ‘कोणतीही गोष्ट शिकताना ती तात्काळ अवगत होत नाही. त्यासाठी मोठा प्रयत्न करावा लागतो. संगणकाची क्रांती जगभरात झाल्याने दुरदुरच्या गोष्टी आपणास सहज उपलब्ध होऊ लागल्या. ग्लोबल क्लासरूममध्ये विद्यार्थ्यांना जगातील विविध वस्तू, विषय, माणसे तसेच नैसर्गिक गोष्टींचा अभ्यास करायला मिळणार आहे. ई-लर्निग मिडीया नेटवर्क ऑफ प्रोफेशनल्स या संस्थेमार्फत देशात दहा हजार ग्लोबल कार्यशाळा घेण्यात येत आहे. नगर जिल्ह्यातील ही पहिली ग्लोबल कार्यशाळा साईबाबांच्या आशीर्वादाने शिर्डी येथे सुरू केली आहे.’

तळघट्टी पुढे म्हणाले, ‘सहा महिन्यांपूर्वी शिर्डीला आलो होतो. त्यावेळी या शाळेला भेट दिली होती. वीजबिल थकल्याने येथे वीज नव्हती. तसेच संगणक कक्ष अनेक दिवसांपासून बंद होता. ही परिस्थिती पाहिल्यानंतर हळूहळू स्थानिकांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने येथे काम सुरू केले. साईबाबांच्या आशीर्वादाने आज ही शाळा जिल्ह्यातील पहिली स्मार्ट शाळा झाली आहे. सर्व संगणक अद्ययावत झाले आहेत. विद्यार्थ्यांना आता जगाशी संपर्क साधता येईल, याचा फार आनंद वाटतो आहे.’

केंद्रप्रमुख दातीर म्हणाल्या, ‘शिर्डीतील शाळा जिल्ह्यातील पहिल्या नंबरची शाळा असून या शाळेची स्थापना १८८१ साली साईबाबांच्या हयातीत झाली आहे. या शाळेत ५७ खोल्या आहेत. एकूण पटावरची संख्या ८०२ असून २६ शिक्षक आहे. ग्लोबल क्लासरूमसाठी या शाळेची पहिली निवड होत असल्याने मनस्वी आनंद झाला आहे.’

या वेळी मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिमेवरील जवान, क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्यांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली. ऑनलाईन बोलण्याची प्रात्याक्षिके करण्यात आली. त्यामध्ये जर्मनीतील श्रीमती आना यांच्याशी थेट विद्यार्थ्यांनी ऑनलाईन संवाद साधला.

प्रास्ताविक श्री. वाघमारे यांनी केले. आभार श्री. अहिरे यांनी मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search