Next
‘त्याग, सेवा, मानवता भावाबरोबर ‘वृक्ष भाव’ वाढवा’
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
प्रेस रिलीज
Saturday, June 08, 2019 | 12:10 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘सर्व धर्मांत वृक्ष पूजनीय असून, पर्यावरणात ‘नारायण’ आहे ही शिकवण प्रत्येक धर्मांतून मिळते. त्याग भाव, सेवा भाव, मानवता भाव यांबरोबर धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी समाजात ‘वृक्ष भाव’ रुजवावा,’ असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सात जून २०१९ रोजी केले.

सह्याद्री अतिथीगृहात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या निमित्ताने वनमंत्र्यांनी समाजातील सर्व घटकांची बैठक घेऊन त्यांना वृक्ष लागवडीच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रारंभी त्यांनी विविध धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीला बुराणी फाउंडेशन, ईशा फाउंडेशन, बाबुलनाथ मंदिर, महालक्ष्मी मंदिर, अनिरूद्ध अकादमी, पतंजली, ब्रह्मकुमारी आश्रम, आर्ट ऑफ लिव्हिंग आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, ‘आपण आपापल्या क्षेत्रांतील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहात, आपल्या शब्दाला मान सन्मान आहे. त्याचा उपयोग लोकांच्या मनात वृक्ष लावण्याची भावना निर्माण करण्यासाठी करावा. अनेकांकडे वृक्ष लागवडीसाठी जागा नसते; परंतु पर्यावरणाचे सेनापती बनून ते वृक्ष लागवडीचा संदेश देऊ शकतात. समाज माध्यमांचा उपयोग करून वृक्ष लागवडीस प्रोत्साहित करू शकतात. ‘सुरज ना बन पाये तो, बन के दीपक जलता चल’ ही भावना मनात ठेऊन वृक्ष लागवडीचा दीप प्रज्वलित करावा.’

‘१९२६ या वन विभागाच्या हेल्पलाइनवर फोन करून वन, वन्य जीव संरक्षण आणि संवर्धनात सहभागी होऊ शकतात. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या उक्तीप्रमाणे आपल्या लाखो अनुयायांशी संवाद साधून, चर्चा करून वृक्ष लागवडीचा उपक्रम विस्तारित करू शकतात. ‘देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून’ असे आपण म्हणतो. वृक्षात देव आहे अस आपण मानतो, मग या देवकार्यात सहभागी होणे आपले कर्तव्य आहे, असे प्रत्येकाला वाटले. महादेवाला नीलकंठ असेदेखील म्हटले जाते कारण त्यांनी विष प्राशन केले. वृक्षही तेच काम करतात वातावरणातील कार्बनडायऑक्साइड शोषून घेऊन ते आपल्या जगण्यासाठी प्राणवायू देतात,’ असे त्यांनी सांगितले.

वृक्ष लागवड कार्यक्रमात पारदर्शकता महत्त्वाची आहे. या कामात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून लावलेल्या प्रत्येक रोपांचा लेखाजोखा ठेवला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात विभागात वृक्ष लागवडीच्या कामासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ते स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींना या कामात मदत करतील. शेतकऱ्यांना आपण फलोत्पादन क्षेत्राकडे नेत असून, ॲग्रो आणि ऑरगॅनिक फार्मिंगला शासन प्रेरणा देत आहे. बांबू, रेशीम आणि फलोत्पादन कामातून लोकांना वनापासून धनापर्यंत नेले जात आहे. वृक्षारोपण कामात आपण स्थानिक १५६ प्रजातीची रोपे लावली जाणार असल्याची माहिती देऊन आर्ट ऑफ लिव्हिंगसारख्या संस्थांनी १०० गावे दत्तक घेऊन ती हरित करण्याची अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.  

वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी प्रास्ताविक केले. बैठकीत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने सादरीकरण करून त्याबद्दलची माहिती दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 130 Days ago
Step in the right direction . This is not a matte of playing politics . Famine affects all .
0
0

Select Language
Share Link
 
Search