Next
संग्रहालयांच्या जगात...
BOI
Thursday, May 18, 2017 | 04:40 PM
15 0 0
Share this article:


आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आहे. त्या निमित्ताने संग्रहालये, त्यांची वैशिष्ट्ये आणि संग्रहालय दिन आदींबद्दलची ही माहिती...
.............

आज १८ मे, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. प्रत्येक देशाला आणि त्यातील प्रत्येक प्रांताला आपला असा एक स्वतंत्र ऐतिहासिक वारसा आहे, प्राचीन संस्कृती आहे. या प्राचीन संस्कृतीची ओळख आणि आपल्या सांस्कृतिक वारशाच्या अस्तित्वाची जाणीव नागरिकांना व्हावी, इतिहास, संस्कृती, रूढी-परंपरा ज्ञात व्हाव्यात आणि इतिहासकालीन वस्तूंचा ठेवा जतन व्हावा या उद्देशाने संग्रहालये उभारली जाऊ लागली. जगभरात असलेल्या या विविध प्रकारच्या संग्रहालयांची संकल्पना, संग्रहित केलेल्या ठेव्याची माहिती, इतिहासातील घडामोडींची माहिती मिळावी या उद्देशाने आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषदेने (इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ म्युझियम) १८ मे १९७७पासून दर वर्षी १८ मे हा जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा करण्यास आरंभ केला.

लंडनमधील मादाम तुसाँ या पहिल्या वॅक्स म्युझियममधील अमिताभ बच्चन यांचा मेणाचा पुतळा
ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा जतन करण्याचे, त्याचा संग्रह करण्याचे आलय (घर) म्हणजे संग्रहालय..आणि याच संकल्पनेच्या आधारावर आज जगभरात विविध प्रकारची संग्रहालये पाहायला मिळतात. आपापल्या प्रांताचा सांस्कृतिक ठेवा जतन करणे हे संग्रहालय उभारण्यामागचे विशेष उद्दिष्ट असते. पुरातन चलनातील नाणी, भांडी, शिल्पे, हत्यारे, पुरातन वाडे, किल्ले, पुरातन चित्रे आदी वास्तू आणि वस्तू यांचे जतन करण्यास सुरुवात झाली. बदलत्या काळानुसार या संग्रहालयातील वस्तू जतन करण्याच्या संकल्पनेतही बदल होत गेले. कालांतराने बऱ्याच ठिकाणी वॅक्स म्युझियमची निर्मिती केली गेली. विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचे मेणाचे पुतळे बनवून त्यांचा संग्रह या वॅक्स म्युझियममध्ये करण्यात येऊ लागला. या पार्श्वभूमीवर लंडनमध्ये जगातील पहिले वॅक्स म्युझियम मादाम तुसाँ यांच्या नावाने सुरू करण्यात आले. या संग्रहालयात आंतराराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेल्या व्यक्तींचे पुतळे साकारण्यात आले आहेत. जगभरातील अनेक संग्रहालयांचा पर्यटनस्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

उपयुक्तता 

कलात्मक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, औद्योगिक अशा विविध विषयांशी संबंधित वस्तूंचे शास्त्रशुद्ध, शिस्तबद्ध आणि नियमानुसार संग्रह व संवर्धन करणारी संस्था, असेही खरे तर संग्रहालयांचे वर्णन  करता येईल. कोणत्याही प्रकारचा फायदा मिळविण्याची अपेक्षा न करता जमवलेल्या वस्तूंची योग्य प्रकारे मांडणी करणे, आकर्षक पद्धतीने त्यांचे प्रदर्शन करणे, त्यांची नियमितपणे काळजी घेणे, त्यांचे जतन व संरक्षण करणे, अशी कामे या संस्था करतात. सर्वसामान्य लोकांना, विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना, संशोधकांना संग्रहालयातील वस्तूंच्या अवलोकनातून मार्गदर्शन व्हावे; त्यांच्यात राष्ट्रीय अस्मितेची भावना जागृत व्हावी यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी बहुविध उद्दिष्टे लक्षात घेऊन संग्रहालयांची स्थापना करण्यात आली.

संग्रहालये ही मुख्यत्वे राष्ट्रीय वारसा जतन करणारी असतात. म्हणून आक्रमणकर्त्यांनी  नेहमी संग्रहालयांना नष्ट करण्याचे प्रयत्न प्रथम केले. आपल्या देशातील मौल्यवान वस्तूंचा ठेवा सुरक्षित ठेवणे, आपल्या काळातील सांस्कृतिक आदर्श, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे, हे प्रत्येक पिढीचे कर्तव्य आहे, ही जाणीव जिवंत ठेवण्याचे काम संग्रहालये करत आहेत. आपल्या पूर्वजांची कृतिशीलता, सौंदर्यदृष्टी, पराकम यांची जाणीवही करून देण्याचे काम संग्रहालये करताना दिसतात.

सांस्कृतिक वारसा जतनाचे उद्दिष्ट 

आपल्या प्रांताचा सांस्कृतिक वारसा सांभाळणे हे संग्रहालयांचे एक महत्त्वाचे व प्रमुख उद्दिष्ट आहे. देशाची घटना व कायदे लक्षात घेऊन सर्वप्रथम वारसा स्पष्ट करणाऱ्या वस्तूंची यादी निश्चित करणे अनिवार्य ठरते. या यादीतील वस्तूंच्या निर्देशनाने देशाची, राज्याची ठळक वैशिष्ट्ये कोणती ते निश्चित होते. देशादेशांतील संस्कृतींमधील वेगळेपण लक्षात येते. देशातील समाजाची तत्त्वज्ञानावरील निष्ठा आणि धारणा यांतून निर्माण झालेली श्रद्धास्थाने, जीवन जगण्याच्या पद्धती, वस्त्रप्रावरणे, राहण्याची घरे व त्यांची व्यवस्था, जेवणखाण्याच्या पद्धती, विवाहविधी, बालसंगोपन, स्त्रीसंरक्षण, धर्मविषयक कल्पना, धार्मिक संस्थांच्या प्रतिमा, साधने, साहित्य, कला, मनोरंजनाची साधने, प्रवासाच्या पद्धती, महान पुरुष व त्यांचे आचारविचार, पूजाअर्चा अशा अनेकविध  गोष्टींतून समाजाची ओळख होत असते व इतर समाजगटांपासूनचे त्याचे वेगळेपण स्पष्ट होते. 

आधुनिक संग्रहालयांमध्ये वस्तूंची विविधता विस्तारलेली आहे. प्रदर्शित करावयाच्या  वस्तूंचे सौंदर्य, सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व प्रेक्षकांच्या लक्षात झटपट आणून देणे, ही वाढती गरज निर्माण झाली आहे. याच दृष्टिकोनाला आंतरशास्त्रीय  दृष्टिकोन असेही म्हटले गेले आहे. या सर्व उद्दिष्टांच्या विविधतेमधून ‘संग्रहालयातील वस्तूंचे प्रदर्शन ’ हेच एक शास्त्र निर्माण झाले आहे.

संग्रहालयांचे काही महत्त्वाचे प्रकार 

काही काळापूर्वी म्हणजेच साधारणतः सतराव्या शतकापूर्वी जगातील संग्रहालये कलात्मक वस्तूंचा संग्रह करत असत. संग्रहालयांचे महत्त्व लक्षात आल्यावर नंतरच्या तीनशे वर्षांच्या कालखंडात विविध प्रकारची संग्रहालये स्थापन करण्यात आली. 

कला संग्रहालये, 
इतिहासविषयक संग्रहालये आणि 
विज्ञान व तंत्रविद्या संग्रहालये 

असे संग्रहालयांचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. याशिवाय इतर काही सर्वसामान्य संग्रहालये असून, त्यामध्ये अनेक विषयांची सामग्री प्रदर्शनार्थ मांडली जाते. कला संग्रहालये चित्रे, शिल्पे आणि अन्य कलावस्तू यांचे संवर्धन, संरक्षण व प्रदर्शन करतात; तर इतिहासविषयक संग्रहालये भूतकाळातील जीवन आणि घटना यांसंबंधीचे पुरावे, प्राचीन हत्यारे, वस्तू, पुरातत्त्वीय अवशेष इत्यादींचे संवर्धन-प्रदर्शन करतात. विज्ञान व तंत्रविद्याविषयक संग्रहालयांतून निसर्गविज्ञान व तंत्रविद्येशी संबंधित सामग्री प्रदर्शित केलेली असते. अशा संग्रहालयांचा उल्लेख म्युझियम्स ऑफ नॅचरल हिस्ट्री असाही केला जातो.  त्यांत प्राणी, वनस्पती, जीवाश्म, खडकांचे नमुने आणि निसर्गाशी संबंधित अन्य  सामग्री असते. याशिवाय काही एकाच विषयाला वाहिलेली किंवा फक्त मुलांसाठी अशी संग्रहालये आहेत. त्यांत इंग्लंडमधील नॅशनल रेल्वे म्युझियम, स्कॉटलंडमधील म्युझियम ऑफ चाइल्डहूड, एडिंबरोमधील कलेक्शन ऑफ ओल्ड टॉइज वगैरे प्रसिद्घ आहेत. अशा विविध प्रकारांमुळे संग्रहालये आता पूरक शिक्षण केंद्रे बनली असून, त्यांच्यामुळे राष्ट्रीय आणि सांस्कृतिक वारसा स्पष्ट करणे, हे उद्दिष्ट साध्य झाले. काही भव्य संग्रहालये बहु-उद्देशीय स्वरूपाची असतात.

कलावस्तू संग्रहालये : प्राचीन काळापासून सुंदर, मौल्यवान, घाटदार आणि प्रमाणबद्घ आकर्षक वस्तूंचा, चित्रांचा संगह करण्याची  मानवी प्रवृत्ती दिसून येते. संग्रहालयांची सुरुवात या प्रकारच्या संग्रहातूनच झाली. एकोणिसाव्या शतकानंतर अशा संग्रहांना काही संकेत जोडले गेले  व त्यामुळे त्यांची दर्जात्मक आणि संख्यात्मक वाढ होऊ लागली.  जगातील अस्तित्वात असलेल्या संग्रहालयांतील ८० टक्के संस्था या प्रकारात मोडतात. या वस्तूंच्या शास्त्रीय मांडणीतून समाजाची जीवनदृष्टी, सौंदर्याची ओढ, सांस्कृतिक पातळी यांचा बोध होतो. अशा समाजाचे सांस्कृतिक वेगळेपण पटकन लक्षात येते व त्यांची ओळख स्पष्ट होते. संग्रहातील वस्तूंची मांडणी चोखंदळपणे केली, तर त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट होते.

मुंबईतील भाऊ दाजी लाड संग्रहालय
१८७० साली अमेरिकेत बोस्टन म्युझियम ऑफ फाइन आर्टस् आणि मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट (न्यूयॉर्क) ही भव्य कलावस्तू संग्रहालये निर्माण झाली. फिलाडेल्फिया म्युझियम ऑफ आर्ट (१८७१) व ब्रुकलिन म्युझियम (१८९३) ही अशीच भव्य संग्रहालये नंतरच्या काळात स्थापन झाली. 

ऐतिहासिक संग्रहालये : संग्रहालयांच्या प्रगतीत महत्त्वाचा टप्पा  ऐतिहासिक संग्रहालये स्थापन झाल्यामुळे गाठला गेला. कलावस्तू जमविणे ही माणसाची सहज प्रवृत्ती असते; पण ऐतिहासिक संग्रहालये निश्चित धोरण ठरवून निर्माण झाली. ऐतिहासिक वस्तू जमवून त्या प्रदर्शित करणे, हे केवळ एकच उद्दिष्ट येथे नव्हते. या वस्तूंच्या प्रदर्शनातून  इतिहास जिवंत स्वरूपात प्रेक्षकांना दाखवणे अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात श्री छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार ही भावनात्मक वस्तू  आहे. ती इतर तलवारींपेक्षा वेगळी असणारच; पण या तलवारीच्या निमित्ताने इतिहासातील राष्ट्रधर्माची जाणीव लोकांना अनुभवता आली, तर या तलवारीच्या प्रदर्शनाचा हेतू साध्य झाला असे वाटेल.

मुंबईतील प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय
अमेरिकेत १७७६ साली पहिले ऐतिहासिक संग्रहालय स्थापन झाले. फिलाडेल्फिया या शहरात यूगेर द्यू सिमितीएर (१७३९-९४) या इंग्रज व्यक्तीने ते स्थापन केले. या संग्रहालयाला कालौघात अनेक चढउतार अनुभवावे लागले व त्याचाच एक इतिहास तयार झाला.

विज्ञान आणि औद्योगिक संग्रहालये : अठराव्या शतकापासून विज्ञानाची प्रगती झपाट्याने होत गेली. युरोपीय देशांतून अनेक विद्यापीठे आणि प्रयोगशाळा यांमधून विज्ञान या ज्ञानशाखेचा अभ्यास वाढला. विज्ञानाचे शोध नंतर औद्योगिक क्षेत्रात वापरले गेले व कारखानदारी वाढत गेली. यातून जीवनोपयोगी नवीन वस्तूंची निर्मिती वाढली व लोकजीवन समृद्घ होत गेले. विज्ञानाच्या प्रगतीचा वेग वाढावा, कारखानदारीमुळे आलेली संपन्नता आणखी वाढावी, यांसाठी विज्ञान आणि औद्योगिक संग्रहालये स्थापन होऊ लागली. त्या काळी कलात्मक वस्तूंची व ऐतिहासिक संग्रहालये होतीच. त्यांत या नवीन प्रकारच्या संग्रहालयांची भर पडली. इटलीतील फाएन्झा या शहरात सिरॅमिक टाइल्सचे (फरश्यांचे) एक भव्य संग्रहालय उभारले. हे पहिलेच आगळेवेगळे संग्रहालय ‘कंपनी  संग्रहालय’ या नावाने ओळखले जाऊ लागले. अमेरिकेत न्यूयॉर्क राज्यात कॉर्निग या गावी ‘कॉर्निगवेअर’ हे काचसामानाचे संग्रहालय निर्माण झाले. जगात आता लोह, पोलाद, कोरीव वस्तू , फर्निचर, शस्त्रास्त्रे, विमान, रेल्वे, टपाल तिकिटे अशी वस्तुगणिक संग्रहालये निर्माण झाली आहेत. 

लंडनमधील एक विज्ञानविषयक संग्रहालय
वेगळी संग्रहालये

लोककला, संदेशवहन, जलवाहतुकीचा इतिहास वगैरे विषयांवरील आणि संग्रहाच्या ऐतिहासिक वा भौगोलिक स्रोतांनुसार  वेगळी असणारी खास संग्रहालयेही असतात. वस्तू प्रेक्षकांपर्यंत नेऊन त्यांना संग्रहालयांमध्ये रुची उत्पन्न करणे  व सहभागी करून घेणे यांकरिता संग्रहालये फिरती प्रदर्शने आयोजित  करतात. उदा. विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्नॉलॉजिकल म्युझुयम (बेंगळुरू) आणि म्युझियम ऑफ सायन्स अँड इंडस्ट्री (कोलकाता) ही  संग्रहालये काही वस्तू व सामग्री वाहनांवरून दूरवरच्या खेड्यांपर्यंत नेतात आणि तेथे प्रतिकृती दाखवून व लोकांना प्रयोगात सहभागी करून घेऊन लोकशिक्षण करतात. रशियात नदीमार्गे जहाजांवरील फिरती प्रदर्शने दूरवर नेली जातात. उघड्या संग्रहालयांमध्ये सर्व गामीण इमारती अथवा ऐतिहासिक किंवा धार्मिक स्मारके व जवळचा परिसरही येतो. काही संग्रहालये आपले कार्यक्रम शाळांपर्यंत नेतात.

यंदाच्या संग्रहालय दिनाची संकल्पना

संग्रहालये आणि स्पर्धात्मक इतिहास (म्युझियम अँड काँटेस्टेड हिस्ट्रीज : सेइंग द अनस्पीकेबल इन म्युझियम्स) अशी यंदाच्या म्हणजेच जागतिक संग्रहालय दिनाची संकल्पना आहे. ही संकल्पना विशेषतः अशा संग्रहालयांसाठी आहे, जी सामाजिक भावनेतून कार्य करत आहेत. सामाजिक संतुलन राखण्यात, देशात शांतता, सुव्यवस्था राखण्यात आपला वाटा उचलणाऱ्या संग्रहालयांच्या अनुषंगाने ही संकल्पना ठरवण्यात आली आहे. याशिवाय आपल्या इतिहासात अशा प्रकारच्या सामाजिक जाणिवेला वाहिलेल्या घटना आणि वस्तूंवर आधारित असलेली संग्रहालये यंदाच्या या दिनाचे विशेष आकर्षण असणार आहेत.

(संग्रहालय दिनानिमित्ताने महाराष्ट्र राज्य, देश आणि जगभरातील महत्त्वाच्या संग्रहालयांची माहिती देणारे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख येथे वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search