Next
चिदंबरमचे नटराज मंदिर
BOI
Wednesday, June 27, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

चिदंबरम मंदिर
गेल्या काही भागांप्रमाणेच ‘करू या देशाटन’च्या आजच्या भागातही आपण तमिळनाडूतच सैर करणार आहोत. आजचे ठिकाण आहे मंदिरांची नगरी म्हणून ओळखले जाणारे चिदंबरम. येथील नटराज मंदिर म्हणजे एक सुंदर स्थापत्य कलाकृती आहे. त्याबद्दलची माहिती घेऊ या.
........
चिदंबरमचे नटराज मंदिरनटेश्वराला अर्पित चिदंबरम मंदिर म्हणजे चोला राजांच्या कारकीर्दीतील आणखी एक सुंदर स्थापत्य कलाकृती. चोला राजे युद्धात तरबेज होते, प्रशासनात कठोर होते, तसेच कलासक्तही होते. त्यांचे कलाप्रेम आणि भक्तिभावातूनच तमिळनाडूत अनेक भव्य मंदिरे उभी राहिली. त्यात भारतीय संस्कृती, स्थापत्य, कला यांचा संगम दिसून येतो. मंदिरांची नगरी म्हणून ओळखले जाणारे चिदंबरम हे तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील ठिकाण पूर्वी कलेचे माहेरघरच होते.

चिदंबरम येथील नटराज मंदिर म्हणजे उत्तम कलेचा, स्थापत्य शास्त्राचा नमुना आहे. चिदंबरम मंदिर पाच पवित्र शिवमंदिरापैकी (पंचमहाभुते) एक असून, ते आकाशाचे प्रतिनिधित्व करते. इतर चार मंदिरे अशी - थिरुवनाईकवलचे जम्बुकेश्वर (जल), कांचीचे एकांबरेश्वर (पृथ्वी), तिरुवन्नमलईचे अरुणाचलेश्वर (अग्नी) आणि तिरुपतीजवळील श्रीकालहस्ती (वायू).

चिदंबरमचा अर्थ पाहू या. चित म्हणजे चेतना, अंबर म्हणजे आकाश. दुसऱ्या सिद्धान्ताप्रमाणे हे नाव चित्राम्बलमपासून बनले आहे. चित्रा/चिथु म्हणजे ‘देवाचे नृत्य किंवा क्रीडा’ आणि अम्बलमचा अर्थ आहे मंच.

चिदंबरमची कथा भगवान शिवाच्या थिलाईवनामध्ये भ्रमण करण्याच्या कथेपासून सुरू होते. थिलाई हे वृक्षाचे नाव आहे. मंदिरातील काही चित्रांमध्ये थिलाईची झाडे चित्रित केलेली दिसतात. ही चित्रे दुसऱ्या शतकातील असावीत. या जंगलात साधूंचा एक समूह राहत होता. या साधूंचा तंत्र-मंत्र व जादूटोण्यावर विश्वास होता. भगवान भिक्षुकाच्या रूपात या जंगलात फिरत होते. मोहिनी रूपातील विष्णू त्यांच्याबरोबर सावलीसारखी जात होते. ऋषिगण व त्यांच्या बायका त्यांच्याकडे आकर्षित होतात. हे पाहून ऋषी क्रोधित होतात. ते जादूने नाग उत्पन्न करतात. भिक्षुक रूपातील भगवान सर्प उचलतात व अलंकाराप्रमाणे गळ्यात घालतात. ते पाहून चिडलेले ऋषी वाघ उत्पन्न करतात. भगवान त्याची कातडी काढून कमरेला गुंडाळतात. ते पूर्ण हतबल झाल्यावर शक्तिशाली राक्षस मुयालकनाची प्रार्थना करतात. तो दैत्य अज्ञान व गर्वाचे प्रतीक होता. शिव हसत त्याच्या पाठीवर चढतात आणि त्याला हलणे मुश्कील करतात आणि पाठीवरच आनंद तांडव करत मूळ रूपात प्रकट होतात. सर्व साधूंना देव व दैत्य यातील फरक लक्षात येतो आणि ते आपला जादूटोणा सोडून देतात.

मंदिराची वैशिष्ट्ये : पेरुमटक्कनच्या पारंपरिक खानदानातील वास्तुनिर्मितीकाराकडून या मंदिराची उभारणी झाली. पल्लव, चोल राजांनी या मंदिराचा अनेक वेळा जीर्णोद्धार केला. ४० एकर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रावर गेली एक हजार वर्षे हे मंदिर संकुल दिमाखात उभे आहे. शैव आणि वैष्णव अशा दोन्ही पंथांचे, अर्थात भगवान शिव (नटराज) व भगवान विष्णू (गोविंदराज पेरुमल) यांना समर्पित असलेले हे मंदिर आहे. भारतातील हे एकमेव असे शिवमंदिर आहे, की जेथे गाभाऱ्यात शिवलिंगाऐवजी महादेव भरतनाट्यम् नृत्यातील मुद्रेमध्ये दिसतात. नटराजाचे ब्रह्मांडीय नृत्य विश्वाच्या गतीचे प्रतीक आहे.

भरतनाट्यम् नृत्याच्या १०८ मुद्रामंदिराला एकूण नऊ दरवाजे आहेत. त्यात चार दिशांना सात मजली उंच गोपुरे आहेत. पूर्व गोपुरावर भरतनाट्यम् नृत्याच्या १०८ मुद्रा आहेत. हे गोपुर पल्लव राजा कोपेरुन्सिंगन याने १२४३ ते १२७९ या काळात पूर्ण केले. पश्चिम गोपुर जादववर्मन सुंदर पांड्यन याने १२५१ ते १२६८ या काळात पूर्ण केले. उत्तर गोपुर विजयनगरसम्राट राजा कृष्णदेवराय याने १५०९ ते १५२९ दरम्यान पूर्ण केले. दक्षिण गोपुर प्रथम राजा पंड्या याने बनविले. त्यावर पंड्या राजवंशाचे ‘मत्स्य’ हे प्रतीक दिसून येते. पल्लव राजा कोपेरुन्सिंगन याने इ. स. १२००मध्ये त्याची पुनर्निर्मिती केली.

मंदिरात पाच मुख्य मंडप आहेत. पवित्र गाभाऱ्यात भगवान नटराज व त्याची सहचरी शिवाग्मासुंदरी विराजमान आहे. कनकसभा मंडप गाभाऱ्याच्या समोर असून, तेथे दैनिक संस्कार होतात. नृत्य मंडप मंदिर ध्वजखांबाच्या दक्षिणेला असून, असे मानले जाते, की शिवाने येथे देवी कालीबरोबर नृत्य केले होते. सभामंडप हा एक हजार स्तंभ असलेला मंडप कमळ अथवा सहस्रराम नावाच्या योगिक चक्राचे प्रतीक समजला जातो. देवसभा मंडपात भगवान गणेश (विघ्नहर्ता), भगवान सोमास्कंद, देवाची सहचरी शिवनंदा नायकी, भगवान मुरुगा, भगवान चंडिकेश्वर या पाच मूर्ती विराजमान आहेत.

आनंद तांडव मुद्रा : शिवाची आनंद तांडव मुद्रा ही एक प्रसिद्ध मुद्रा असून, त्यातून पुढील अर्थ ध्वनित होतात.
- नटराजाच्या पायाखालील राक्षस हा अज्ञानाचे प्रतीक आहे.
- हातातील अग्नी वाईट गोष्टींचे निर्दालन करण्याचे प्रतीक आहे.
- त्यांचा उचललेला हात सर्व जिवांचे उद्धरण करण्यासाठी आहे.
- हातातील डमरू जीवन उत्पत्तीचे प्रतीक आहे.

मंदिरामध्ये पाच परिक्रमा पथ आहेत. मंदिराचे छत २१ हजार ६०० सुवर्ण कौलांनी शाकारलेले आहे. चितसभेच्या वरील शिखरावर तांब्याचे नऊ कलश आहेत. गर्भागृह मानवी शरीरातील हृदयाप्रमाणे थोडेसे डावीकडे आहे. अर्धमंडपातील सहा खांब सहा शास्त्रांचे प्रतीक आहेत. अर्ध मंडपाच्या बाजूकडील मंडपात १८ खांब असून, ते १८ पुराणांचे प्रतीक आहेत. कनक सभेतून चितसभेत जाताना पाच पायऱ्या आहेत. त्या पंचाक्षरी मंत्रांचे प्रतीक आहेत. चित सभेतील छत चार खांबांवर आधारलेले असून, ते चार वेदांचे प्रतीक आहेत.

चिदंबरमच्या आसपास : समुद्रकिनाऱ्याला लागून कुय्या तीर्थ आहे. चिदंबरमच्या दक्षिणेला एक मैलावर पुलिमादु हे ठिकाण आहे. चिदंबरमच्या पश्चिमेला व्याघ्रपादतीर्थ आहे. चिदंबरम मंदिराच्या पश्चिमेला अनंथारेश्वर मंदिराच्या समोर अनंततीर्थम आहे. अनंततीर्थमच्या पश्चिमेला नागसेरी नावाचे एक सरोवर आहे. चिदंबरमच्या उत्तरेला शिवपिरियाई नावाचे एक सरोवर आहे.

पिच्छावरमपिच्छावरम : या समुद्रकिनाऱ्यावर धूप थांबविणाऱ्या वनस्पतींची म्हणजेच खारफुटी जंगले (Mangrove forests) आहेत. अतिशय मनोहर असे दृश्य येथे दिसते. अशी जंगले असलेले हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे ठिकाण आहे. अनेक स्थलांतरित पक्ष्यांचे हे आवडते ठिकाण आहे. तसेच १७७ प्रकारचे पक्षी येथे आढळतात. ही झाडी ११०० हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेली असून, चिदंबरमपासून २९ किलोमीटरवर आहे.

विरुधाचलम/वृद्धाचलम : तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातीलच हे एक पवित्र ठिकाण आहे. दोन ऑगस्ट १६७७ रोजी शिवाजी महाराज विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले होते. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली होती. येथील मंदिरही चोला राजांनी बांधले. हे मंदिर पाच भव्य गोपुरे असलेले आहे. प्रसिद्ध कोलांजीआपार मंदिरही या मंदिरापासून तीन किलोमीटरवर आहे. हे ठिकाण चेन्नई शहराच्या २४० किलोमीटर दक्षिणेला, तर तिरुचिरापल्लीच्या १२० किलोमीटर ईशान्येला आहे.
 
विरुधाचलम/वृद्धाचलमचिदंबरम हे रेल्वेने जोडलेले ठिकाण आहे. चेन्नईपासून चिदंबरम २३१ किलोमीटरवर आहे. जवळचा विमानतळ पुदुच्चेरी येथे असून, तो ६६ किलोमीटरवर आहे. चिदंबरम येथे राहण्याची उत्तम सोय आहे. कुड्डालोर जिल्ह्यात काजूचे उत्पादन घेतले जाते. येथे जाण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा उत्तम कालावधी आहे.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)


पिच्छावरम

( चिदंबरमचे नटराज मंदिर तसेच काही आसपासच्या ठिकाणांची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
ameya vaze About
बेस्ट
1
0
Hemant Uddhav sahasrabuddhe About
मस्त लिहिलेय।
1
0

Select Language
Share Link
 
Search