Next
‘पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे’
वीरमाता, वीरपत्नींचे उद्गार
BOI
Monday, March 11, 2019 | 03:41 PM
15 0 0
Share this article:

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभप्रसंगी राजेश दामले, वीरमाता अनुराधा गोरे, सुमेधा चिथडे, वीरपत्नी अश्विनी पाटील, (निवृत्त)एअर मार्शल भूषण गोखले, समीर बेलवलकर आदी.

पुणे : ‘भारताची तिन्ही सैन्यदले सक्षम असून, त्यांच्यावर विश्वास ठेवा, ते योग्य तो निर्णय घेतील. समाजाने नाही ते प्रश्न विचारून त्यांना अडचणीत आणू नये;तसेच पाकिस्तानला एकदा धडा शिकवलाच पाहिजे;पाकिस्तानवर भारताने दबाव कायम ठेवला पाहिजे,’ असे उद्गार सैन्यदलासाठी काम करणाऱ्या महिलांनी काढले. 

जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर, बेलवलकर हाउसिंगतर्फे वीरमाता अनुराधा गोरे, सुमेधा चिथडे आणि वीरपत्नी अश्विनी पाटील या रणरागिणींचा एअर मार्शल(निवृत्त)भूषण गोखले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

त्यानंतर राजेश दामले यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये या रणरागिणींनी आपली सडेतोड मते व्यक्त केली. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या. रोटरी क्लब ऑफ पुणे, लोकमान्यनगरच्या अध्यक्षा वासंती मुळे, बेलवलकर हाउसिंगचे संचालक समीर बेलवलकर या वेळी उपस्थित होते.

आपल्या तरुण मुलाला वीरमरण आल्यानंतर वीरमाता अनुराधा गोरे यांनी वीरमाता आणि वीरपत्नींच्या पुनर्वसनाच्या कामात स्वतःला झोकून दिले आहे, तर सुमेधा चिथडे या सियाचीनमध्ये सैनिकांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा म्हणून आपल्या ‘सिर्फ’ या संस्थेच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारत आहेत. सुमेधा चिथडे यांचा एकुलता एक मुलगा सैन्यदलात अधिकारी आहे. गेली वीस वर्षे सुमेधा चिथडे स्वकमाईतून सैन्यदलातील परिवारासाठी कार्य करत आहेत. वीरपत्नी अश्विनी पाटील यांनी आपल्या पतीला वीरमरण आल्यानंतर त्यांना मिळालेल्या आर्थिक मदतीतून निपाणी येथे मुलांसाठी शाळा सुरू केली आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून एम. ए पर्यंत शिक्षणदेखील घेतले. 

पुलवामा हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या भारत आणि पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाबाबत बोलताना अनुराधा गोरे म्हणाल्या, ‘ भारत आणि पाकिस्तान दरम्यान नक्की काहीतरी होईल असे वाटते. भारताने पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे;तसेच पाकिस्तानवर दबाव कायम ठेवला पाहिजे. काश्मीरमध्ये साखर, मीठ असे काहीच तयार होत नाही. फुटीरतावाद्यांना धडा शिकवण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशा वस्तू पाठवणेच बंद केले पाहिजे.’

सुमेधा चिथडे म्हणाल्या, ‘आपली तीनही सैन्यदले सक्षम आहेत. त्यांच्यावर आपण सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे. नको ते प्रश्न विचारून त्यांना अडचणीत आणू नये.’ 

अश्विनी पाटील म्हणाल्या, ‘सैनिकांचा विचार केला पाहिजे. उंदराने एकदा कुरतडले आणि त्याकडे दुर्लक्ष केले तर तो सारखाच कुरतडत राहतो. त्यामुळे त्याचा बिमोड केलाच पाहिजे. तसा पाकिस्तानचा एकदा सोक्षमोक्ष लावला पाहिजे.’

भूषण गोखले म्हणाले, ‘भारताने पहिल्यांदा पाकिस्तानात आत शिरून बालाकोट येथे हल्ला केला. दहशतवादाचे जिथे प्रशिक्षण दिले जात होते, तिथेच हा हल्ला करण्यात आला. या हल्यात कितीजण ठार झाले याचा आकडा मागितला जात आहे. परंतु, शत्रूराष्ट्राला संदेश मिळणे महत्वाचे असतो. तो पाकिस्तानला मिळाला आहे. आपल्या सक्षम नेतृत्वाने आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मुत्सदेगिरीने पाकिस्तानवर दबाव निर्माण केला. अजूनही बालाकोट आणि इतर ठिकाणी मीडियाला जाऊ दिले जात नाही. पाकिस्तान कोंडीत सापडला आहे. यापूर्वी पाकिस्तान नागरिकांना त्रास नको म्हणून भारत हल्ले करत नव्हता मात्र, आता सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्तान विरोधात सर्व तऱ्हेचे बाण सोडले आहेत. पाकिस्तानची लोकसंख्या वाढत आहे. तिथल्या जमीनीतील कोरडेपणाही वाढत आहे. त्यामुळे पाकिस्तानला जाणारे पाणी पंजाब व हरियाणाकडे वळवले पाहिजे.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search