Next
‘सह्याद्री हॉस्पिटल्स’तर्फे मुलांच्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी विशेष कक्ष
BOI
Tuesday, October 02, 2018 | 04:23 PM
15 0 0
Share this article:

सह्याद्री हॉस्पिटलमधील लहान मुलांच्या असाध्य आजारांवरील उपचार कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी सुरेश चोखाणी, डॉ. चारूदत्त आपटे, ओमप्रकाश शेटे व डॉ. सुनिल राव.

पुणे  : लहान मुलांना होणाऱ्या अनेक असाध्य आजारांवरील सर्वोत्तम उपचार गरीब मुलांनाही उपलब्ध व्हावेत, या हेतूने ‘सह्याद्री हॉस्पिटल्स’तर्फे नगर रोडवरील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक विशेष उपचार कक्ष  सुरू करण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष व रोटरी इंटरनॅशनलच्या सहयोगाने ‘मिशन मुस्कान’च्या अधिपत्याअंतर्गत ‘मिशन प्रेरणा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, या उपक्रमाअंतर्गत सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पेडियाट्रिक टर्शरी केअर युनिट सुरू करण्यात आले आहे. याद्वारे लहान मुलांमधील ह्रदयविकार, फिटस्, रक्ताचे विकार, यकृताचे विकार या व अशा अनेक गंभीर आजारांवर सर्वसमावेशक उपचार उपलब्ध होतील. मिशन प्रेरणाचे औपचारिक उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे, सह्याद्री हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. चारूदत्त आपटे, मिशन मुस्कानचे प्रकल्प प्रमुख व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१चे सचिव सुरेश चोखाणी, मिशन मुस्कानचे पुण्यातील समन्वयक सुदिन आपटे, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे समन्वयक राजेश सोनार व सह्याद्री हॉस्पिटल्सचे मुख्य कामकाज अधिकारी डॉ. सुनिल राव यांच्या उपस्थितीत झाले.

या वेळी बोलताना ओमप्रकाश शेटे म्हणाले, ‘कुठलीही सामान्य व्यक्ती पैसे किंवा उपचाराअभावी मृत्युमुखी पडू नये यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. एकीकडे उद्योग व इतर क्षेत्रात महाराष्ट्र प्रगती करत असताना आरोग्याच्या बाबतीतदेखील आपण प्रगती केली पाहिजे. संकल्प चांगला असेल, तर कामात कधीही अपयश येत नाही.मिशन मुस्कान व मिशन प्रेरणा हे फक्त प्रकल्प नसून, चळवळ आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे.

यासंदर्भात माहिती देताना सह्याद्री हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. चारूदत्त आपटे म्हणाले, ‘काही वर्षांपूर्वी ‘सह्याद्री हॉस्पिटल्स’ने पुढे येऊन सरकारची गरिबांसाठी असलेली आरोग्य योजना स्विकारत उपचार सुरू केले होते. आजवर चार हजारहून अधिक रूग्णांवर याअंतर्गत हदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तीन हजार प्रौढ व्यक्तींवर हदय शस्त्रक्रिया, ५०० बालकांवर हदय शस्त्रक्रिया व ५००बालकांवर कार्डियाक डिव्हाईस क्लोजर्स करण्यात आले आहेत. ‘सह्याद्री समुहा’तर्फे २००३ मध्ये ‘संवेदना’ ही स्वयंसेवी संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेतर्फे विविध आजार असलेल्या गरजू व वंचित रूग्णांवर उपचार केले जातात. मिशन प्रेरणाच्या माध्यमातून सह्याद्री नगर रोड ही लहान मुलांमधील हदयविकाराच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे. मिशन प्रेरणा अंतर्गत रोटरी इंटरनॅशनलच्या मिशन मुस्कान व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य कक्षाच्या मदतीने आर्थिकदृष्ट्या गरजू मुलांना ‘सह्याद्री हॉस्पिटल्स’तर्फे सहकार्य केले जाईल. गुंतागुंतीच्या हदयशस्त्रक्रिया, एपिलेप्सी शस्त्रक्रिया, यकृत प्रत्यारोपण,  बोन मॅरो प्रत्यारोपण हे उपचार अशा बालकांसाठी उपलब्ध करून दिले जातील.

या वेळी बोलताना सह्याद्री हॉस्पिटल्सचे मुख्य कामकाज अधिकारी डॉ. सुनिल राव म्हणाले, ‘नगर रोड येथील या अद्ययावत केंद्राद्वारे लहान मुलांमधील हदयशस्त्रक्रिया,एपिलेप्सी शस्त्रक्रिया, हेमॅटॉलॉजीसंबंधी उपचार, यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातील. या अद्ययावत युनिटमध्ये १३० बेडस, लेव्हल थ्री केअर एनआयसीयू व समर्पित निओनॅटल अॅम्ब्युलन्सचा समावेश आहे. त्याशिवाय येथे बालहदयरोग तज्ज्ञ, शल्यविशारद, प्रत्यारोपण तज्ज्ञ, एपिलेप्सी तज्ज्ञ, प्रशिक्षित पारिचारिका व कर्मचारी अशी समर्पित टीम आहे.

सह्याद्री हॉस्पिटल्सचे बालहदयरोग तज्ज्ञ डॉ. पंकज सुगावकर म्हणाले, ‘बालकांमधील हदयविकाराचे प्रमाण तेवढेच असले, तरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या अशा बालकांचे प्रमाण वाढत चालले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वाढलेले निदानाचे प्रमाण, तंत्रज्ञानात सुधारणा, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धतता यामुळे कमीत कमी वयात अशा विकारांचे निदान आता शक्य झाले आहे. तरीही महाराष्ट्रात इतरत्र पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी मुंबई व पुण्याला येण्याचे प्रमाण जास्त आहे. या क्षेत्रातील एक प्रवर्तक म्हणून एक समर्पित युनिट असावे असे आमचे ध्येय होते आणि त्यामुळेच मिशन प्रेरणा हाती घेण्यात आले. या समर्पित युनिटमुळे मराठवाड्यासह राज्यातील दहा ते बारा जिल्ह्यातील रूग्णांना फायदा होणार आहे. हे एक मिशन व ध्येय असल्यामुळे यांत फक्त आमची एकच संस्था नव्हे तर बालकांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, बालकल्याण संस्था, राज्यसरकार या सर्वांना एकत्र घेऊन गरजू बालकांना सर्वोत्कृष्ट उपचार देण्याचे आमचे उद्दिष्ट असेल. या समर्पित युनिटमुळे आमची क्षमता वाढणार आहे.’

‘मिशन प्रेरणा’साठी असलेल्या वैद्यकीय टीममध्ये बालहदयरोग तज्ज्ञ डॉ. पंकज सुगावकर, हृदय शल्यविशारद डॉ. राजेश कौशिक, डॉ. संदीप तडस , डॉ. मनोज दुराईराज व डॉ. महेंद्र बाफना, हृदय भूलतज्ज्ञ डॉ. शंतनू शास्त्री, हेमॅटोलॉजिस्ट डॉ. शशिकांत आपटे व डॉ. एस. कन्नन, पेडिऍट्रिक सर्जन डॉ. प्रणव जाधव, निओनॅटोलॉजिस्ट डॉ. प्रदीप सुर्यवंशी व डॉ. जलील मुजावर, एपिलेप्सी सर्जन डॉ. अमित धाकोजी, यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. बिपीन विभूते, तसेच अन्य तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search