Next
पालमपेठचे वैभव
BOI
Wednesday, December 27, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this story

रामप्पा मंदिर
‘करू या देशाटन’
या सदरात सध्या आपण तेलंगण राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेत आहोत. आजच्या भागात सैर करू या पालमपेठच्या रामप्पा मंदिराची आणि त्याच्या जवळपासच्या पर्यटनस्थळांची...

..................
दख्खनमधील मध्ययुगीन मंदिरांच्या मालेतील चमकता तारा असे ज्या मंदिराचे वर्णन केले जाते, ते मंदिर म्हणजे तेलंगण राज्यातील पालमपेठ येथील रामप्पा मंदिर. ज्या कलाकाराने या मंदिराचे बांधकाम केले, त्याचे नाव रामप्पा असे होते. त्यावरून या मंदिराला रामप्पा किंवा रामलिंगेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. कलाकाराच्या नावाने ओळखले जाणारे हे देशातील कदाचित एकमेव मंदिर असावे.

१२व्या शतकात काकतीय राजा गणपती देवा याने हे सुंदर मंदिर रामप्पा नावाच्या शिल्पकाराकडून बांधून घेतले. हे मंदिर वारंगळ शहरापासून ७० किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर बांधायला ४० वर्षे लागली, असे म्हणतात. या मंदिराच्या बांधकामासाठी वापरलेल्या दगडावर वैज्ञानिकांनी संशोधन केले असता, असे दिसून आले की हा दगड हलका आहे आणि त्याचे तुकडे पाण्यात टाकल्यावर तरंगतात. मंदिराची वरची बाजूही तरंगत्या विटांच्या साह्याने झाकलेली आहे. हे मंदिर सहा फूट उंचीच्या, ताऱ्याच्या आकाराच्या चौथऱ्यावर उभारलेले असून, ते अत्यंत सुबक व प्रमाणबद्ध आहे. शिल्पकाम खूप घोटलेले (पॉलिश्ड) आहे. त्यामुळे शिल्पे अतिशय सुंदर दिसतात. शंकराच्या मंदिरात प्रवेश करताना प्रथम नंदीदर्शन हवेच.

या मंदिरातील सालंकृत नंदी म्हणजे शिल्पकलेचा खजिनाच आहे. त्या नंदीला इतके साखळ्यांनी इतके सुंदररीत्या मढविले आहे, की महिलांनाही त्याचा हेवा वाटेल. नंदीच्या गळ्यातील घंटा तुटून पडली आहे, असे शिल्पकाराने दाखविले आहे.


मंदिरातील स्तंभ अतिशय सुंदर
असून, कलाकुसरीने मढविलेले आहेत. आडव्या तुळयांवरील शिल्पकला पाहता मान दुखते, पण दृष्टी सुखावते. गोलाकार छतावर सुंदर नक्षीकाम आहे. शंकर-पार्वती विवाह सोहळाही तेथे कोरला आहे. पाहताना असे वाटते, की आपल्या हातात या वेळी अक्षता हव्यात. समुद्रमंथन, शिवतांडवनृत्य, मुनींचा तपस्याभंग करणाऱ्या मदनिका, अमृतवाटप, त्रिपुरासुर व नरकासुराचा वध असे अनेक देखावे येथे पाहायला मिळतात. त्यातील नखे, हार, आभूषणे, मुद्रा पाहिल्या, तर अलीकडच्या फॅशनला काहीच अर्थ नाही असे वाटते. डाव्या बाजूला नृत्यमंडप असून, भूकंपात त्याच्या आतील भागाची थोडी पडझड झाली आहे. तरीही समोरच एखादी सुंदर नर्तिका नृत्य करीत आहे असल्याचे दृश्य माझ्या डोळ्यासमोर आले. आपल्या बरोबर एखादी बॅटरी ठेवली, तर ही शिल्पे नीट पाहता येतील. मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर रामप्पा तलाव आहे. काकतीय राजांनी शेतीसाठी हा तलाव बांधला होता. आता तेथे बोट क्लब आहे.

रामप्पा तलावपाखल तलाव व अभयारण्य
वारंगळपासून ६० किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात असलेला हा तलाव काकतीय राजा गणपतिदेवा याने शेतीला पाणी मिळावे म्हणून इसवी सन १२१३च्या सुमारास बांधला. दिल्लीच्या सुलतानांनी तो आक्रमणात नष्ट केला होता. बरीच वर्षे दुर्लक्षित असलेला तलाव १९२२मध्ये दुरुस्त करण्यात आला. त्याच्या तीरावरच पाखलचे अभयारण्य ८३९ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे. तेथे वाघ, हरणे, बिबटे, रानमांजरे आणि अनेक प्रकारचे पक्षी आढळतात. तलावाचे काठावर मगरीही दिसतात. नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत स्थलांतरित पक्षीही तेथे पाहायला मिळतात.

घानपूर मंदिर समूहघानपूर मंदिर समूह
पालमपेठच्या पूर्वेला घानपूर येथे सुमारे २०-२२ मंदिरांचा समूह आहे. त्याला ‘कोटा गुल्लू’ या नावानेही ओळखले जाते. आतापर्यंत दुर्लक्षित असलेला हा ठेवा आता लोकांपुढे येत आहे. या समूहात रामप्पा मंदिराशी साम्य असणारी मंदिरे आहेत आणि ती भग्नावस्थेत असली, तरी त्यांचे सौंदर्य अजिबात कमी झालेले नाही. काकतीय राजा गणपती देवा याच्या राजवटीत ही मंदिरे बांधून पूर्ण झाली. अनेक मदनिका, गजकेसरी, हयग्रीव यांची तेथे असलेली शिल्पे लक्ष वेधून घेतात. खडकातील विस्मयकारक शिल्पे व छतावरील नक्षीकाम थक्क करणारे आहे. पालमपेठपासून सुमारे अर्ध्या तासात तेथे जाता येते. वारंगळच्या जवळपास घानपूर नावाची दोन ठिकाणे आहेत. त्यापैकी एक घानपूर रेल्वे स्टेशन असून, दुसरे पालपेठजवळील घानपूर आहे. तेच हे पर्यटनस्थळ आहे.

एतुरनगरम् अभयारण्यएतुरनगरम् अभयारण्य
वारंगळपासून ११०किलोमीटर अंतरावर हे घनदाट जंगलात हे अभयारण्य १९५३मध्ये अस्तित्वात आले. त्याचे क्षेत्रफळ ८०६ चौरस किलोमीटर असू, ते डोंगराच्या चढ-उतारावर वसलेले आहे. यामध्ये गवे, वाघ, विविध प्रकारची हरणे, बिबटे, माकडे, मगरी, विविध प्रकारचे साप, नाग, अजगर पाहायला मिळतात. तेथेच नक्षलवादीही मुक्कामाला असल्याने सावधानचा बाळगावी लागते.

लक्ष्मी नरसिंहस्वामी मंदिरहेमचला लक्ष्मी नरसिंहस्वामी मंदिर

गोदावरीच्या दक्षिण तीरावर मल्लूर घाटात मांगपेठजवळ हे रमणीय तीर्थक्षेत्र आहे. १० फूट उंचीचा नरसिंह आणि ६० फूट उंचीचा ध्वजस्तंभ येथे आहे. हे ठिकाणी मानगीपेठपासून चार किलोमीटर अंतरावर जंगलात असून, ते वारंगळपासून १३० किलोमीटर अंतरावर आहे. अगस्ती ऋषींनी हेमचला हे नाव दिले, अशी स्थानिक कथा आहे. रावणाने हा परिसर शूर्पणखेला भेट दिला होता, असेही सांगितले जाते.

कसे जाता येईल?
मुंबई-कोणार्क एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी दररोज असून, ती पुणे-सोलापूर-हैदराबाद-वारंगळमार्गे जाते. शक्यतो हैदराबाद सहलीबरोबर पालमपेठ-वारंगळ-हैदराबाद-नागार्जुनसागर-श्रीशैल्य अशी आठ दिवसांची सहल करावी. मी ही सहल सातारा-पुणे-सेवाग्राम-वारंगळ-हैदराबाद-श्रीशैल्य-नागार्जुनसागर-हम्पी-हुबळीमार्गे परतीचा प्रवास अशी रेल्वेच्या वर्तुळाकार प्रवास योजनेखाली केली होती. (ही योजना खूप छान असून, त्यामुळे खर्चात सुमारे ३० टक्के बचत होते. त्याबाबत पुढे कधी तरी या सदरातून लिहीन.) आठवड्यातून एकदा पुणे-काझीपेठ अशी रेल्वेही चालू झाली आहे. काझीपेठ व वारंगळ ही जुळी शहरे आहेत. दिल्लीवरून चेन्नईला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या येथे थांबतात. विमानाने जायचे असल्यास जवळचा विमानतळ हैदराबाद आहे. राहण्यासाठी वारंगळ, काझीपेठ, तसेच पालमपेठ येथे चांगली हॉटेल्स आहेत.
(पुढच्या भागात पाहू या एकशीलानगरीबद्दल...)

- माधव विद्वांस

ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

पाखल तलाव व अभयारण्य (फोटो : तेलंगण टुरिझम)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ramesh Atre About 274 Days ago
अपरिचित ठिकाणांची त्यांच्या वैशिष्ट्यासह माहिती. उत्तम फोटो.
0
0
अविनाश अशिरगडे. About
सुरेख नी उपयुक्त माहिती....
1
0
Shreyas Joshi About
सुंदर माहिती👌👌
1
0
Chandrakantsalvi267 About
Pakhal talav Ramappa mandir ghanpur ( kota gullu) flutu r nagar abhayaranya cha sarve mahiti far surekh span sangitali ahe madhavji
0
1
Prakash kapadnis About
Superb . सुंदर माहीती
1
0

Select Language
Share Link