Next
टेनिसमधली नवी आशा : सालसा
BOI
Friday, January 19, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

सालसा आहेरसचिनमुळे लहान मुले क्रिकेट खेळू लागली, साईना नेहवालमुळे मुली बॅडमिंटनमध्ये हातपाय मारायला लागल्या, त्याच धर्तीवर सानिया मिर्झाकडे बघत सालसासारख्या असंख्य मुली टेनिसकडे वळत आहेत आणि याच मुलींमधून देशाला सानिया मिर्झाची वारसदार सापडेल. ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदरात आजचा लेख टेनिसपटू सालसा आहेरबद्दल...
...................
सानिया मिर्झादेशातील एक सानिया मिर्झा यशस्वी होते आणि तिच्याकडून प्रेरणा घेत देशातील कित्येक मुली टेनिसमध्ये कारकीर्द घडविण्यासाठी सज्ज होतात. पुण्याची मानांकित खेळाडू सालसा आहेर ही त्यापैकीच एक; मात्र तिच्या कामगिरीवर नजर टाकली, तर हे रसायन काहीसे निराळेच वाटते. येत्या काही वर्षांत भारताचे टेनिसमधील नवे आशास्थान म्हणून सालसा नावारूपाला आलेली पाहायला मिळेल.

वयाच्या सहाव्या वर्षीच रोहिणी लोखंडे यांच्याकडे ती टेनिसचे प्राथमिक धडे गिरवू लागली. सुरुवातीच्या काळात तिच्या खेळावरून, ही हौशी खेळाडू या खेळात खरोखरच गंभीर आहे हे जाणवल्याने तिच्या पालकांनी पुण्याच्या टेनिसचे माहेरघर असलेल्या डेक्कन जिमखाना क्लबमध्ये राष्ट्रीय विजेता खेळाडू व प्रशिक्षक संदीप कीर्तने यांच्याकडे तिला नेले. तिथे सालसावर व्यावसायिक टेनिसचे पैलू पडायला सुरुवात झाली. सध्या ती डेक्कनवरच केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. सिम्बायोसिस शाळेत दहाव्या इयत्तेत शिकणारी सालसा गत वर्षी फेड स्पर्धेतील निवडीमुळे परीक्षा देऊ शकली नाही. यंदा मात्र ती दहावीच्या परीक्षेची तयारी करत आहे.

कारकिर्दीच्या सुरुवातीला ती पहिलीच स्पर्धा कोल्हापूरमध्ये खेळली आणि अभिमानास्पद कामगिरी करत तिने ही स्पर्धा जिंकलीदेखील. यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलेच नाही. ज्युनिअर गटात यशाची कित्येक शिखरे ती आता पादाक्रांत करत आहे. पुरुषांची जशी डेव्हिस करंडक स्पर्धा असते, त्याच धर्तीवर महिलांसाठी फेड कप स्पर्धा असते. मागील वर्षी मार्च महिन्यात ही स्पर्धा झाली; मात्र सालसाला दोन सामन्यांत विजय मिळाला तर दोन सामने गमवावे लागले. तिला झालेली दुखापत भारताला महागात पडली. देशाचा या स्पर्धेत बारावा क्रमांक आला. आता तिचे जागतिक क्रमवारीतील स्थान ३०४वे आहे. भारतीय क्रमवारीत ती दुसऱ्या क्रमांकावर होती. आता सहाव्या क्रमांकावर आहे. अर्थात याचे कारण तिची कामगिरी खालावल्याचे नसून, तिने भारतातील स्पर्धा खेळणे कमी केले आहे. एआयटीए व डब्ल्यूटीए स्पर्धांवर तिने जास्त लक्ष केंद्रित केले आहे. ती सध्या परदेशातदेखील खेळते आहे. एशियन बी वन स्पर्धेत पात्रता फेरीत एक सामना गमावूनही ती लॉटरी पद्धतीतून पुन्हा एकदा स्पर्धेसाठी पात्र ठरली. सिंगापूरमधील स्पर्धेतही सोळा वर्षांखालील स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत गेली. तिची अशीच घोडदौड तिला तिचे उज्ज्वल भवितव्य घडवायला मदत करेल.

ऑक्टोबर २०१५मध्ये चौदा वर्षांखालील गटात एकेरी आणि दुहेरीत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते; मात्र ही कसर तिने पुढच्याच वर्षी भरून काढून, सोळा वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. यंदा सालसाने एकेरीची दोन तर दुहेरीचे एक विजेतेपद मिळवले आहे. यंदाच्या कामगिरीकडे पाहता, येत्या काळात ती ज्युनिअर ग्रॅंड स्लॅम नक्कीच खेळेल असा विश्वास वाटतो. यंदा तिने एकेरीची १९ तर दुहेरीची दहा विजेतेपद मिळवली आहेत. आजवरच्या कारकीर्दीत तिने एकेरीची सत्तावीस, तर दुहेरीची अठरा विजेतेपदे प्राप्त केली आहेत.

लक्ष्य या संस्थेची मदत सालसाला मिळते. शिवाय महाराष्ट्र लॉन टेनिस संघटनादेखील सर्वतोपरी मदत करते. संघटनेचे सचिव सुंदर अय्यर यांच्या सहकार्याने संघटनेची व्हिजन प्लेअर म्हणून सालसाचा समावेश झालेला असल्याने तिच्या स्पर्धांसाठी संघटना पूर्ण तयारीने सहकार्य करते. डब्लूटीए फ्युचर्स स्टार स्पर्धेत २४ खेळाडूंमध्ये तिची निवड झाली होती त्यात चौथ्या संघाचे नेतृत्व तिने केले. तिथे विजेतेपद मिळाले नसले, तरी अनुभव खूप मोठा मिळाला. दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या ग्रेड चार स्पर्धेत तिने उपविजेतेपद मिळवत आपण फॉर्ममध्ये येत असल्याची चुणूक दाखवली आहे.

पुण्यात यंदा डेव्हिस करंडक स्पर्धा बालेवाडीत आयोजित करण्यात आली होती. त्यात लिअँडर पेससह देशाचे सर्व मानांकित खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेने खऱ्या अर्थाने पुण्यात टेनिस संस्कृती रुजवली. सालसा आहेरसारख्या खेळाडूंनादेखील अशा स्पर्धा प्रेरणा देत असतात. थायलंडच्या आयटीएफ स्पर्धेत तिने जे उपविजेतेपद मिळवले होते, ते तिच्या कारकिर्दीचा कळसाध्याय ठरले आहे. सालसाला पालकांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि म्हणूनच ती कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करू शकत आहे. भारतासारख्या देशात दहावी आणि बारावीच्या परीक्षा आल्या की पालकवर्ग आपल्या मुलांचे खेळ बंद करतात व अभ्यास एके अभ्यास करायला भाग पाडतात. याच कारणाने आपल्याकडे ‘ड्रॉपआउट’चे प्रमाण खूप  जास्त आहे. परीक्षेचे दडपण घेत खेळाडू खेळाकडे पूर्ण दुर्लक्ष करतात व त्यात निघून जाणारे एक वर्ष त्यांच्या कारकिर्दीला फुलस्टॉप देणारे ठरते. असे अनेक खेळाडू गुणवत्ता असुनही खेळापासून दूर गेलेले पहायला मिळतात. नशीबाने सालसाला असे पालक मिळाले आहेत, की ज्यांचा तिच्या खेळावर, तिच्या गुणवत्तेवर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच फेड स्पर्धेसाठी त्यांनी तिला दहावीच्या परीक्षेलाही मागे ठेवण्यासाठी पाठिंबा दिला. हाच विश्वास एका सामान्य खेळाडूला महान खेळाडू बनवतो.

सचिनमुळे जशी लहान मुले क्रिकेट खेळू लागली, साईना नेहवालमुळे मुली बॅडमिंटनमध्ये हातपाय मारायला लागल्या, त्याच धर्तीवर सानिया मिर्झाकडे बघत सालसासारख्या असंख्य मुली टेनिसकडे वळत आहेत आणि याच मुलींमधून देशाला सानिया मिर्झाची वारसदार सापडेल. सध्या तरी सालसा ज्युनिअर ग्रँड स्लॅम खेळताना दिसावी म्हणजे टेनिस क्षेत्राला पुण्यातील एक स्टार खेळाडू मिळेल आणि मग प्रायेजकही या खेळाडूंकडे येतील. आता लक्ष्य, एमएसएलटीए यांच्याव्यतिरिक्त योनेक्स ही कंपनीही सालसाला सहकार्य करत आहे. एकदा जागतिक स्तरावर सालसाचा प्रवेश झाला, की तिच्यापुढे प्रायोजकांची रांग लागेल आणि त्याच वेळी ती पुण्याच्याच नव्हे, तर देशाच्या टेनिसचे नवे आशास्थान बनलेली असेल.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Rashmi Mudshingikar About
Salsa rocks !!!!! Excellent wright up👍 !!! She is very positive on court and plays fantastic tennis !!!! Good job girl !!!! 👏👏👏
1
0
Dhananjay Hiremath About
Nice article and she is definitely inspiration for our kids young generation.
1
0
Parag Aher About
Excellent write up.... ,👍 Salsa's current world rank is 235 & she plays at Kedar Shah sir's Bounce academy....
3
0

Select Language
Share Link
 
Search