Next
‘अनुग्रह’मधून तंजावूरच्या नृत्य परंपरेचे विलोभनीय दर्शन
नृत्यगुरु डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांना १० शिष्यांची नृत्यवंदना
BOI
Wednesday, July 17, 2019 | 03:49 PM
15 0 0
Share this article:


पुणे : कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त १६ जुलैला आयोजित करण्यात आलेल्या ‘अनुग्रह’ या नृत्य कार्यक्रमात ‘तंजावूर नृत्य प्रबंध’ ही विशेष नृत्य संकल्पना ‘सादर करण्यात आली. कर्नाटकच्या तंजावूर राजघराण्याच्या मराठी नृत्य परंपरेचे विलोभनीय दर्शन या कार्यक्रमातून घडले. 

ज्येष्ठ नृत्यगुरु डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांच्या १० शिष्यांनी नृत्य सादर करून त्यांना गुरुवंदना दिली. याच वेळी डॉ. सुचेता यांनी ‘गुरु’ संकल्पनेवर नृत्य सादर करून शिष्यांवर ‘अनुग्रह’ केला. तंजावूर राजघराण्याचे १४ वे वंशज आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रतापसिंहराजे भोसले यांनी डॉ. सुचेता यांचा सत्कार केला. ‘अनुग्रह’चे हे सहावे वर्ष होते.


डॉ. सुचेता यांची कन्या, शिष्या आणि ‘कलावर्धिनी’च्या सचिव अरुंधती पटवर्धन यांनी स्वागत केले. या कार्यक्रमात अंजली बागुल, धनश्री आपटे, केतकी शेणोलीकर, तेजश्री अडीगे, केतकी नेवपुरकर, शिल्पा देशमुख, लालन देसाई, सायली काणे, अरुंधती पटवर्धन या शिष्यांनी सहभाग घेतला. वैभवी जोगळेकर यांनी निरुपण केले. शिवप्रसाद (गायन), श्रीराम (मृदंग), बालसुब्रमण्यम् (व्हायोलिन) यांनी साथसंगत केली. 

डॉ. चापेकर यांच्या ‘गुरु’ संकल्पनेवरील नृत्याने उपस्थितांची वाहवा मिळवली. व्यंकोजीराजे, शहाजीराजे, सरफोजीराजे यांनी तंजावरच्या प्रांतात कलांना, परंपरांना प्रोत्साहन दिले. रसिक, कलाविज्ञ, नाटककार अशी या घराण्याची ख्याती आहे. या घराण्याने नृत्य संगीताची नवनिर्मिती केली. त्याचे विलोभनीय दर्शन या कार्यक्रमात घडले. ‘तांडवनृत्य करी गजानन’ यासह शहाजीराजांच्या रचनांवर नृत्य रचना सादर करण्यात आल्या. सरफोजी महाराज यांच्या रचनाही दाद मिळवून गेल्या. सरफोजी राजांचा तिल्लानाही सादर करण्यात आला.


‘डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांनी तंजावूर नृत्य परंपरा पुढे आणण्यासाठी, त्याचे दस्तावेजीकरण करण्यासाठी १९६०पासून प्रयत्न केले ते महत्त्वपूर्ण आहेत. ‘तंजावूर नृत्य प्रबंध’ हा अतिशय उत्तम कार्यक्रम असून, त्यांनी तंजावूरला येऊन संगीत महाल पॅलेसमध्ये तो सादर करावा,’ अशी इच्छा प्रतापसिंहराजे यांनी व्यक्त केली.

‘जीव-शिवाचे अद्वैत मानणाऱ्या तंजावूर राजघराण्याने कला-परंपरा जपण्याचे अलौकिक सांस्कृतिक कार्य केले आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून ज्ञानाची कवाडे गुरु उघडतो. गुरु-शिष्य परंपरा ही देशाचे भूषण असून, ती पुढे नेली पाहिजे,’ असे डॉ. चापेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search