Next
त्रिभाषा सूत्राचा श्रेष्ठ मंत्र
BOI
Monday, July 10, 2017 | 06:45 AM
15 1 0
Share this article:

‘शिक्षणाच्या बाबतीत सर्व राज्यांमध्ये त्रिभाषा सूत्र स्वीकारायला हवे आणि विद्यार्थ्यांना संस्कृत शिकण्याची संधीही उपलब्ध करून द्यायला हवी. हिंदी ही संपर्क भाषा आहे, इंग्लिशला आपल्या व्यवस्थेपासून दूर ठेवता येत नाही आणि प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेतूनच प्रभावीपणे देता येते,’ असे ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या राज्यांत सध्या भाषांवरून सुरू झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर नायर यांनी दिलेला मंत्र खरेच श्रेष्ठ आहे. तसेच, भारतीय भाषा आणि लिप्या यांमध्ये असलेला सारखेपणा अनेक ठिकाणी सिद्ध झालेला आहे. विविधतेतील ही एकरूपता विसरली जाता कामा नये.
.............
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, असे म्हणायची एक पद्धत आहे. खासकरून विविधतेत एकता ही भारताची शान आहे, हा समज आपण करून घेतला आहे. त्यामुळे या विविधताच ठळक दिसायला पाहिजेत, असा काहीसा ग्रह झालेला दिसतो. त्यामुळे ही विविधता मुळात एकतेचीच विविध रूपे आहेत, हे आपण चक्क विसरून जातो. ‘एकोऽहं बहु स्यात’ हा आपला मंत्र असल्याचेही भान राहत नाही. म्हणूनच देशाच्या दोन टोकांना असलेल्या दोन राज्यांमध्ये एकाच मुद्द्यावरून आग पेटलेली आहे. त्यात औचित्याची आहुती पडत आहे. परंतु सुदैवाने शहाणपणाचे स्वर अद्याप शाबूत आहेत त्यामुळे आशेचा दीप अजून तेवतोय, हे म्हणायला वाव राहतो.

आधी पूर्वेकडील राज्याबद्दल बोलू. पश्चिम बंगालच्या सरकारने राज्यात बंगाली भाषेची सक्ती केली आहे. या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांना बंगाली भाषा शिकवावी लागणार आहे. राज्याचे शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी यांनी मे महिन्यात ही घोषणा केली होती. ‘यापुढे सर्व विद्यार्थ्यांना शाळांमध्ये बंगाली शिकणे सक्तीचे असेल. आयसीएसई, सीबीएसई किंवा अन्य बोर्डांशी संलग्न शाळांनाही पहिलीपासून बंगाली हा पर्यायी विषय ठेवावा लागेल. विद्यार्थ्यांना ही दुसरी किंवा तिसरी भाषा म्हणून निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे,’ असे ते म्हणाले होते. तेव्हापासून दार्जिलिंग भागात हिंसाचार उसळला आहे आणि किमान दोघांचा जीव गेला आहे. तेथील लोकांची गोरखालँडची मागणी जुनीच आहे. त्यांना आता आपल्या नेपाळी भाषेच्या अस्तित्वावर ही टाच आणल्याचे वाटत आहे. त्यामुळे बिमल गुरुंग यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभे राहिले आहे.

दुसरीकडे कर्नाटकात हिंदीविरोधी आंदोलन पेटले आहे. बेंगळुरू येथे मेट्रो रेल्वेचे उद्घाटन झाल्यानंतर तेथे भाषायुद्ध सुरू झाले आहे. नेहमीप्रमाणे ‘कन्नड रक्षण वेदिके’ नावाची संघटना यात अग्रभागी आहे. या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून हिंदी फलकांना आधी काळे फासले. त्यांच्या विरोधामुळे बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीएमआरसीएल) आपल्या हिंदी फलकावर आवरण घालून ते झाकले होते. केवळ मेट्रो स्थानकेच नव्हे, तर मॉलमध्येही हिंदी फलक लावायचे नाहीत, असे सांगण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. हिंदी फलकांच्या बाबतीत त्यांची सरशी झाल्यानंतर आंदोलनाचे हे लोण इंग्रजीकडे वळले. गुरुवारी त्यांनी शहरातील एका मॉलमधील रेस्टॉरंटच्या फलकाला काळे फासले. कारण काय, तर ‘उद्योग आणि व्यवसाय कर्नाटकाची जमीन व वीज वापरतात. परंतु त्यांना कन्नड भाषा वापरण्याची किंवा कन्नडिगांना नोकऱ्या द्यायची इच्छा नाही. म्हणून आम्ही हे केले,’ असे या संघटनेचे प्रवीण शेट्टी म्हणतात.

‘नम्म मेट्रो हिंदी बेडा’ (आमच्या मेट्रोत हिंदी नको) असे या आंदोलनाचे नाव आहे. खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. बेंगळुरूतील या आंदोलनाचा विषय कर्नाटकात आलेले केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासमोरही काढण्यात आला होता. त्या वेळी ते म्हणाले, की हिंदी राष्ट्रभाषा आहे. हिंदीशिवाय भारतात प्रगती करणे शक्य नाही. त्याच वेळेस भारताची पारपत्रे (पासपोर्ट) इंग्रजीसोबतच हिंदीतही मिळतील, अशी घोषणा सुषमा स्वराज यांनी केली. त्यामुळे हिंदीविरोध आणखी टोकाचा बनला. 

आपल्या राज्य मराठी विकास संस्थेसारखी कर्नाटकात कन्नड विकास प्राधिकरण (केडीए) नावाची संस्था आहे. या ‘केडीए’ने ‘बीएमआरसीएल’ला कारणे दाखवा नोटीसही पाठवली होती. अन् येथे वावदूकपणा संपून शहाणपण सुरू होते. हे आंदोलन कितीही वाढवले, तरी बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) त्रिभाषा सूत्रावर कायम राहील आणि हिंदी पाट्या काढणार नाही, असे ‘बीएमआरसीएल’ने स्पष्ट केले आहे. ‘केडीए’च्या कारणे दाखवा नोटिशीला ‘बीएमआरसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप सिंह खरोला यांनी उत्तर दिले आहे. ‘त्रिभाषा सूत्रानुसार मेट्रोमध्ये हिंदी फलक वापरणे अपरिहार्य आहे,’ असे खरोला यांनी म्हटले आहे.

जी. माधवन नायर...मात्र या बाबतीत खरा श्रेष्ठ मंत्र दिला तो जी. माधवन नायर यांनी. नायर हे कोणी साधी असामी नव्हेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) ते माजी अध्यक्ष आहेत. ‘शिक्षणाच्या बाबतीत सर्व राज्यांमध्ये त्रिभाषा सूत्र स्वीकारायला हवे आणि विद्यार्थ्यांना संस्कृत शिकण्याची संधीही उपलब्ध करून द्यायला हवी,’ असे ते म्हणाले. ‘हिंदी ही संपर्क भाषा आहे, इंग्लिशला आपल्या व्यवस्थेपासून दूर ठेवता येत नाही आणि प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेतूनच प्रभावीपणे देता येते,’ असे ते म्हणाले. संस्कृत ही सर्वांत शास्त्रीय भाषांपैकी एक आहे. ही भाषा शिकण्याने व्यक्तीच्या विश्लेषण कौशल्यात सुधारणा होईल, असेही त्यांचे म्हणणे आहे.

नायर म्हणतात ते खरे आहे. हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा नाही. परंतु घटनेत या भाषेला सरकारी भाषेचा दर्जा आहे. हिंदी ही इंग्रजीच्या बरोबरीने सरकारी भाषा आहे. पुढच्या १५ वर्षांमध्ये इंग्रजी हटविण्यात येईल, असे घटनेच्या निर्मितीवेळी सांगण्यात आले होते; मात्र तमिळनाडूत १९६५ साली झालेल्या आंदोलनानंतर ती मुदत वाढवण्यात आली आणि आता तर या तरतुदीची आठवणही कोणाला नाही. त्रिभाषा सूत्र लागू करण्यात आलेली मुख्य अडचण म्हणजे हिंदी भाषक राज्यांकडून झालेली आगळीक. गैर-हिंदी भाषक राज्यांनी या तीन भाषा शिकविण्यास सुरुवात केली; मात्र या राज्यांनी अन्य भाषा शिकविल्या नाहीत. मराठी, तमीळ, कन्नड इत्यादी भाषांना त्यांनी सन्मान दिला असता तर आज ही वेळ आली नसती. 

आज कर्नाटकात पाट्यांवरून वातावरण पेटले आहे. परंतु मुळात कन्नड आणि हिंदीत फरक किती आहे? राममनोहर लोहिया यांनी म्हटले आहे, की देवनागरीतील ‘क’ आडवा केला, की कन्नड लिपीतला ‘क’ बनतो आणि हे १०० टक्के खरे आहे. केवळ कन्नडच कशाला, तेलुगू, तमीळ आणि मल्याळम् या अन्य दाक्षिणात्य भाषांच्या बाबतीतही हे खरे आहे. बंगाली व गुजराती लिप्याही देवनागरी लिप्यांचीच वेगळी अलंकरणे आहेत. ‘भारतीय प्राचीन लिपीमाला’ हा गौरीशंकर ओझा यांचा ग्रंथ सर्व भारतीय लिप्यांची एकरूपता दाखवतो. देवनागरीसकट सर्व लिप्या ब्राह्मी लिपीतून आलेल्या आहेत, असे त्यांनी सिद्ध केलेले आहे. विश्वनाथ दिनकर नरवणे यांच्या ‘भारतीय व्यवहार कोश’ या ग्रंथात सगळ्या भारतीय भाषांतील शब्द व वाक्ये आहेत. या भाषा आणि त्यांचा शब्दसंग्रह किती एकसारखा आहे, हे या ग्रंथावर एक नजर टाकली तरी दिसून येते; पण त्याकडे पाहणाऱ्यांचीच वानवा झाली आहे. यालाच बहुधा ‘योजकस्तत्र दुर्लभः’ म्हणत असावेत!

- देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search