Next
बालशिक्षणाच्या अध्वर्यू ताराबाई मोडक
BOI
Sunday, October 14, 2018 | 08:00 AM
15 0 0
Share this story

ताराबाई मोडक - जन्म : १९ एप्रिल १८९२, मृत्यू : ३१ ऑगस्ट १९७३भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ आणि ज्यांच्या अभ्यासपूर्ण कार्यामुळे भारतात शिशुविहार सुरू झाले, ती कर्तृत्ववान स्त्री म्हणजे ताराबाई मोडक. ‘नवरत्ने’ मालिकेत आज ताराबाईंच्या कामाबद्दल...
..........
स्वतःच्या आयुष्यात-प्रपंचात स्थिरस्थावर होण्यासाठी चाललेली कसरत आणि तरीही विचार, वेळ आणि श्रम यातला मोठा वाटा समाजोपयोगी गोष्टीसाठी वापरण्याची वृत्ती फार क्वचित दिसते. अर्थात त्यातूनच मग अनंत काळ आपला ठसा मागे ठेवून जाणारे काम उभे राहते. ‘ताराबाई मोडक’ हे त्याचेच एक उदाहरण. अनुताई वाघ हे नाव तसे बऱ्याच जणांना माहिती आहे. त्याची कारणे अनेक असली, तरी ज्या कामासाठी आपण अनुताईंचे नाव ऐकले/वाचले आहे, त्याची जननी आहेत ‘ताराबाई मोडक.’ 

भारताच्या शिक्षणपद्धतीत ‘बालवाडी’ ही संकल्पनाच नव्हती, यावर विश्वासच बसत नाही. ताराबाईंच्या कामामुळे ती संकल्पना अस्तित्वात आली. आयुष्य किंवा नशीब माणसाला त्याच्या कर्मभूमीत खेचून नेते हेच खरे आणि त्याच्या सत्कर्मामुळे समाजात मोठेच बदल घडून येतात. अजाणवयात आधी वडील आणि मग आईचा मृत्यू बघितलेल्या ताराबाईंनी समोर आलेल्या सर्व अडचणींवर मात करून आपले शिक्षण आणि छंद कशातही खंड पडू दिला नाही. 

विद्यालयीन-महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत पूर्ण करून लग्नानंतर त्या अमरावती येथे स्थायिक झाल्या. श्री. मोडकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यामुळे अमरावती सोडायला लागल्यावर, आपल्या एका वर्षाच्या कन्येला घेऊन त्या थेट गुजरातमध्ये राजकोटला गेल्या. तिथे आपली प्राचार्यपदाची नोकरी सांभाळून त्या व्यवस्थापनकौशल्य, तसेच मानसशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत होत्या. हे करता करताच त्यांना गिजुभाई बधेका यांच्या शैक्षणिक प्रयोगांबद्दल माहिती मिळाली. आपली प्राचार्यपदाची नोकरी सोडून त्या गिजुभाईंच्या सहायक म्हणून राजकोटहून भावनगरला रहायला गेल्या. त्याचे एक कारण म्हणजे त्यांच्या प्राचार्यपदाच्या नोकरीमुळे मुलीची होत असलेली आबाळ आणि दुसरे म्हणजे जे काही काम करण्याचे अनेक वर्षे त्यांच्या मनात घोळत होते, तसेच काहीसे एकदम समोर आले होते. 

गिजुभाई त्या वेळी बालशिक्षणावर काम करत होते. भारतात तेव्हा मुलांचे शालेय शिक्षण सहाव्या वर्षापासून सुरू व्हायचे. चौथ्या वर्षी शालेय शिक्षण सुरू व्हावे, असा गिजुभाई आणि त्यांच्या बरोबरीने काम करणाऱ्या ताराबाईंचा आग्रह होता. एवढा मोठा बदल घडवून आणणे सोपे तर नक्कीच नव्हते; पण आपल्या म्हणण्याला अधिक पाठबळ मिळण्यासाठी त्यांनी चार ते सहा या वयोगटासाठी आवश्यक तो अभ्यासक्रम किंवा दिनक्रम जास्तीत जास्त शास्त्रोक्त पद्धतीने लोकांसमोर मांडायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी इटालियन बालशिक्षण अभ्यासक मारिया माँटेसरी यांचे तत्त्वज्ञान अभ्यासायला सुरुवात केली. मारिया माँटेसरी यांनी १९०७ साली इटलीतील रोम शहरात पहिली शाळा सुरू केली होती. तिथे मुलांचे नैसर्गिक कल बघून अत्यंत मोकळ्या वातावरणात त्यांचे शिक्षण होत होते. रोमपाठोपाठ अमेरिकेत न्यूयॉर्कलाही याच धर्तीवर शाळा सुरू झाली होती. त्यामुळे हे तत्त्वज्ञान यशस्वी होणार, यात शंका नव्हती; पण भारतीय मानसिकता आणि राहणीमानाच्या अनुषंगाने गिजुभाई आणि ताराबाईंना त्यात अनेक बारीकसारीक बदल करावे लागले. १९२६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली. आणि भारतात ‘माँटेसरी’ शाळांना सुरुवात झाली. 

नऊ वर्षे भावनगरला राहून असंख्य वेगवेगळे प्रयोग आणि या शिक्षणपद्धतीचा विविध अंगांनी अभ्यास करून आवश्यक ते ज्ञान घेऊन ताराबाई मुंबईला आल्या आणि पुन्हा नव्याने रुजण्यासाठी सरसावल्या. १९३६ साली मुंबईत दादरला त्यांनी ‘शिशुविहार’ सुरू केलेच; पण त्याच्या जोडीने, शिक्षक प्रशिक्षण, पालक प्रबोधन, सरकारी साह्य या सगळ्याच विषयांवर त्यांनी काम सुरू केले. त्यासाठी बाल-अध्यापक वर्ग सुरू केले. शहरांपाठोपाठ हेच वर्ग, हेच काम खेडेगावात पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी त्यांचे हे बालशिक्षणाचे काम अगदी आदिवासी पाड्यांपर्यंत, आवश्यक ते बदल करत, त्या त्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेत यशस्वीपणे पोहोचवले. हरिजनवाडा, कुरणशाळा, घंटाशाळा अशा अनेक ठिकाणी ताराबाईंचे काम उभे राहिले. 

पुढे त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवली. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांच्या कामाची सगळ्यात मोठी पावती म्हणजे त्यांचे रुजलेले काम ही असली, तरी लौकिकार्थाने त्यांचा गौरव झाला तो केंद्र सरकारतर्फे ‘पद्मभूषण’ सन्मान मिळाल्यावर.

आज गावोगावीच काय, अगदी गल्लोगल्ली ‘माँटेसरी’ दिसतात. पालक मुलांना चौथ्या नव्हे, तर दुसऱ्या वर्षापासूनच शाळेत पाठवतात; पण दुर्दैव हे, की ताराबाईंच्या मनातील बालशिक्षण मात्र फारसे कुठेही दिसत नाही.

- आरती आवटी
ई-मेल : aratiawati@gmail.com

(‘नवरत्ने’ मालिकेतील सर्व लेख https://goo.gl/T9ihBw या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link