Next
गजानन महाराजांच्या पालखीचे माचणूरच्या सिद्धेश्वर नगरीत स्वागत
BOI
Tuesday, July 09, 2019 | 11:07 AM
15 0 0
Share this article:सोलापूर :
संत गजानन महाराजांच्या पालखीचे माचणूर (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथे आठ जुलैला आगमन झाले. प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्नील रावडे, प्रभारी गटविकास अधिकारी संतोष राऊत, सरपंच मनोज पुजारी, सुनील पाटील, विजयसिंह पाटील, अस्लम चौधरी, राजीव बाबर, अतुल पाटील, इलियास चौधरी, गाव कामगार तलाठी पी. जी. पुजारी यांनी पालखीचे स्वागत केले. 

विठू माऊलीचा जयघोष करत संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा सिद्धेश्वर नगरीत दाखल झाला. या वेळी माचणूर, ब्रह्मपुरी, बेगमपूर अर्धनारी परिसरातील ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सिद्धेश्वर मंदिर परिसरात पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची पंगत बसली. सुनील नांदे यांनी भोजनाची व्यवस्था केली होती. पालखीचा मुक्काम संपवून मंगळवारी (नऊ जुलै) सकाळी हा पालखी सोहळा संत दामाजी नगरीकडे (मंगळवेढा) मार्गस्थ झाला. दरम्यान, ब्रह्मपुरी येथे दामाजी कारखान्याचे माजी अध्यक्ष चरणूकाका पाटील यांच्याकडून वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली. टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन होऊन पालखीतील वारकऱ्यांनी विठू माऊलीचा ध्यास घेतला आहे. शिस्तबद्ध पद्धतीने हरिनामाचा गजर करीत निघालेले ६५० वारकरी पाहून भाविक भारावून गेले होते. या परिसरातील बेगमपूर, माचणूर, अर्धनारी, रहाटेवाडी, ब्रह्मपुरी भागातील भक्तांनी पालखी मार्गावर विविध ठिकाणी, तसेच चौकाचौकात स्वागत केले. मंगळवारी हा सोहळा मंगळवेढा शहरातील नगरपालिका शाळेच्या मैदानावर मुक्कामी असणार आहे. पालखी सोहळ्याच्या समोरील बाजूस तीन अश्व, बँडपथक, तसेच सोबत नऊ वाहने आहेत. शेगाव ते पंढरपूर असा हा ७५० किलोमीटरचा प्रवास ही पालखी करते. या पालखीचे यंदा ५२वे वर्ष आहे. बुधवारी (१० जुलै) सकाळी सहा वाजता पालखी सोहळा मंगळवेढा शहरातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार असून, ११ जुलै रोजी पालखी सोहळा पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search