Next
तिवरे धरणग्रस्तांसाठी किफायतशीर, मजबूत फेरोसिमेंट घरांबद्दल जिल्हाधिकारी सकारात्मक
फेरोसिमेंट सोसायटीच्या प्रस्तावावर झाली चर्चा
अनिकेत कोनकर
Thursday, July 11, 2019 | 04:34 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या साह्याने घरे बांधण्याचा प्रस्ताव पुण्याच्या ‘फेरोसिमेंट सोसायटी ऑफ इंडिया’ने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना पाठवला होता. त्याबद्दल त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या तंत्रज्ञानाच्या साह्याने आधार केंद्राची इमारत उभारण्याचे आदेश त्यांनी दिले असून, पुढील आठवड्यापासून त्याचे काम सुरू होणार आहे. 

फेरोसिमेंट सोसायटीच्या ‘गव्हर्निंग कौन्सिल’चे सदस्य आणि फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या साह्याने विविध प्रकारची बांधकामे करणाऱ्या नांदेडच्या ‘सायुज्य ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड’चे तांत्रिक मार्गदर्शक दीपक कान्हेरे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.फेरोसिमेंट तंत्रज्ञानात केवळ लोखंडी सळ्या, जाळ्या आणि सिमेंट यांचा विशिष्ट पद्धतीने वापर केला जातो. या पद्धतीने बांधलेली घरे मजबूत, तसेच भूकंपरोधक असतात. या पद्धतीने कमी वेळात म्हणजे साधारण एका महिन्यात एक घर उभे राहू शकते. तसेच या पद्धतीने घरांच्या बांधणीला येणारा खर्च अन्य पद्धतींच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे खर्च, लागणारा वेळ आणि मजबुती या सर्वच बाबतींत ही घरे उजवी ठरतात. धरणग्रस्तांसाठी १५ फूट बाय २० फूट म्हणजेच ३०० चौरस फूट आकाराची घरे प्रत्येकी सुमारे तीन लाख रुपयांत उभारून देण्याचा प्रस्ताव ‘फेरोसिमेंट सोसायटी ऑफ इंडिया’ने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना सहा जुलै रोजी पाठवला होता. या घरांमध्ये एक बैठकीची खोली आणि स्वयंपाकघर असेल. तसेच संडास, बाथरूमही घरातच असेल. त्याशिवाय, घराच्या पायामध्ये सुमारे १० हजार लिटर पावसाचे पाणी साठवण्याची (रेन वॉटर हार्वेस्टिंग) सोयही असेल.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी हा प्रस्ताव वाचून त्यांना बैठकीसाठी बोलावले. त्यानुसार, ११ जुलै रोजी बैठक झाली. या बैठकीला ‘फेरोसिमेंट सोसायटी ऑफ इंडिया’चे सचिव पद्मनाभ लेले, सोसायटीचे माजी सचिव आणि राज्याच्या जलसंपदा विभागाचे माजी कार्यकारी अभियंता गिरीश सांगळे, दीपक कान्हेरे आणि ‘सायुज्य ऊर्जा’चे व्यवस्थापकीय संचालक श्यामाप्रसाद पाळेकर उपस्थित होते. रत्नागिरीच्या जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश देशमुख हेही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी चव्हाण यांना या तंत्रज्ञानाच्या घराचे छोटे प्रारूप दाखविण्यात आले. वेगवेगळ्या ठिकाणी या पद्धतीने झालेल्या बांधकामांबद्दल माहिती देण्यात आली. या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेतल्यावर पुनर्वसनासाठी अशा प्रकारची घरे बांधण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवली. तसेच, फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या साह्याने बांधलेले घर कसे असते, कसे बांधले जाते, याचा नेमका अंदाज येण्यासाठी तातडीने प्रारूप इमारत बांधण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. 

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आधार केंद्राची इमारत उभारायची आहे. ती इमारत या तंत्रज्ञानाच्या साह्याने उभारण्याचे आदेश जिल्हाधिकारी चव्हाण यांनी या बैठकीत दिले. या इमारतीचे काम येत्या सोमवारपासूनच (१५ जुलै) सुरू केले जाणार आहे. 

फेरोसिमेंट तंत्रज्ञान नवे नसून, १८५०पासून भारतात वापरले जाते; मात्र ते उपयुक्त असूनही त्याचा प्रसार झाला नाही. म्हणूनच फेरोसिमेंट सोसायटी ऑफ इंडिया ही २००८ साली सुरू झालेली स्वयंसेवी संघटना या किफायतशीर तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी काम करते. नांदेडच्या सायुज्य ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या साह्याने घरे, बंधारे, बायोगॅसचे मोठाले डोम, पाणी साठवण्याच्या टाक्या आदी विविध प्रकारची बांधकामे केली आहेत. मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानचे उल्हास परांजपे यांनी या पद्धतीने पाण्याच्या टाक्या बांधण्याची चळवळ गेल्या काही वर्षांपासून चालवली आहे. तिवरे धरणग्रस्तांसाठी या पद्धतीने घरे बांधण्यासाठी मंजुरी मिळाली, तर त्यांना मजबूत घरे मिळतीलच; शिवाय या तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेचा प्रसार होण्यासही हातभार लागू शकतो. 

(अधिक माहिती आणि घराचे प्रारूप पाहण्यासाठी पाहा सोबतचा व्हिडिओ.)हेही जरूर वाचा...

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search