Next
कर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका
प्राची गावस्कर
Thursday, October 11, 2018 | 09:45 AM
15 1 0
Share this article:

मुंबईतील सीमा परदेशी-खंडाळे या एक सामान्य, कर्तव्यदक्ष गृहिणी; पण मुलाने विचारलेल्या एका प्रश्नामुळे त्यांची स्त्री-शक्ती जागृत झाली आणि त्या समाजसेविका, उद्योजक झाल्या. प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्या तयार करण्यासाठी त्या २०१५ पासून कार्यरत असून, या माध्यमातून त्यांनी भुसावळमधील महिलांना कामही मिळवून दिले. पर्यावरण, आरोग्याला हानिकारक असलेल्या सॅनिटरी पॅड्सला पर्याय म्हणून मेन्स्ट्रुअल कपच्या वापराबद्दल महिलांमध्ये जागृती करताना त्यांनी स्वतःच तयार केलेले ‘ऋतू कप’ माफक किमतीत उपलब्ध केले आहेत. नवरात्रौत्सवाच्या औचित्याने ‘तुजऐसी नाही’ या मालिकेत आज सीमा परदेशी-खंडाळे यांची गोष्ट...
.....
सीमा परदेशी-खंडाळे ही मुंबईत अंधेरी पूर्व येथे राहणारी, पदवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर लग्न करून संसारात, मुलाबाळांमध्ये रमलेली एक कर्तव्यदक्ष गृहिणी. मुलाने विचारलेल्या एका प्रश्नाने त्यांच्यातील स्त्री शक्तीला जागे केले आणि त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख घडवली. आज त्यांनी अशय सोशल ग्रुप ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली असून, त्याद्वारे त्या पर्यावरण संवर्धन, महिला आरोग्य याविषयी उपक्रम राबवत असतात. त्यांचे सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे ‘ऋतू कप’ची निर्मिती. 

महिलांमध्ये मेन्स्ट्रुअल कपबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच तो किफायतशीर किमतीत सहजपणे उपलब्ध व्हावा, यासाठी त्यांनी स्वतः या कपचे डिझाइन करून उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. जास्तीत जास्त महिलांना हे अत्यंत किफायतशीर, पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी साधन वापरण्यास उद्युक्त करण्यासाठी त्या प्रयत्न  करत आहेत. एका सर्वसामान्य गृहिणीचा जबाबदार समाजसेविका, उद्योजक अशा रूपात झालेला कायापालट स्त्री-शक्तीचे महत्त्व अधोरेखित करतो. 
 
अशी झाली सुरुवात... 
सीमा यांना त्यांच्या मुलाने एकदा त्यांच्या गृहिणी म्हणूनच स्वतःला मर्यादित ठेवण्याबद्दल विचारले. त्या वेळी त्यांना  वाटले, की मी फक्त गृहिणी असले, तरी मी स्वतः माझे वेगळे विश्व नक्कीच उभारू शकते. त्यांना पर्यावरण संवर्धन, समाजकार्य याची आवड होती. त्यामुळे त्यांनी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून एमएसडब्ल्यू (समाजसेवा विषयातील पदविका) पूर्ण केले आणि आपल्या आवडीच्या कामाचा श्रीगणेशा केला. 

कापडी पिशव्यांचा प्रसार...
प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमी व्हावा, यासाठी कापडाच्या पिशव्या शिवून घेऊन त्या लोकांना मोफत वाटण्याचा उपक्रम त्यांनी २०१५च्या सुमारास सुरू केला. त्यांना त्यांच्या मित्र-मैत्रिणींचीही साथ मिळाली आणि हा उपक्रम चांगलाच लोकप्रिय झाला. आतापर्यंत साधारण वीस हजार पिशव्या त्यांनी वाटल्या आहेत. यासाठी त्या लोकांकडून जुने कपडे, साड्या गोळा करतात. आता लोकांना हे माहीत झाले असल्याने, ते स्वतः आणून देतात; पण सुरुवातीला त्यांना लोकांना विचारावे लागत असे, त्यांच्याकडे जाऊन कपडे घेऊन यावे लागत. जुने कपडे आल्यावर त्या भुसावळला पाठवतात. तेथे चार महिला त्यापासून पिशव्या शिवण्याचे काम करतात. शिलाईचा सगळा खर्च सीमा स्वतः उचलतात. तेथील महिलांना काम मिळावे, हा त्यामागचा उद्देश आहे. तसेच मुंबईपेक्षा शिलाई खर्च कमी असल्याने अधिक पिशव्या शिवून होतात. यामुळे त्या भुसावळला कपडे पाठवणे, पिशव्या आणणे हा खटाटोप आनंदाने करतात. 

‘मेन्स्ट्रुअल कप’च्या कामाची सुरुवात...
कापडी पिशव्यांचे काम सुरू असतानाच २०१६च्या सुमारास ‘मेन्स्ट्रुअल कप’बाबतचा एक लेख त्यांच्या वाचनात आला. पर्यावरणाची होणारी हानी, प्रदूषण कमी करण्यासाठी आपण खारीचा वाटा तरी उचलू शकतो असे वाटल्याने त्यांनी मेन्स्ट्रुअल कपच्या वापराबद्दल महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे ठरवले. ‘आधी केले, मग सांगितले’ अशी वृत्ती असल्याने त्यांनी स्वतः आधी हा कप वापरून पाहिला. त्याचे फायदे, उपयोग पटल्यानंतर अन्य महिलांना, महाविद्यालयातील मुलींना त्यांनी याबाबत सांगायला सुरुवात केली. यासाठी त्या कार्यशाळा घ्यायला लागल्या. हे करत असतानाच त्यांच्या लक्षात आले, की याची किंमत आणि ऑनलाइन उपलब्धता ही याच्या प्रसारातील एक महत्त्वाची अडचण आहे. त्यावर उपाय म्हणून त्यांनी स्वतःच या कपचे डिझाइन केले. त्यांच्याच ओळखीचे एक जण सिलिकॉन मटेरियलपासून बनणाऱ्या वस्तूंच्या निर्मिती उद्योगात असल्याने त्यांनी किफायतशीर किमतीत या कपचे उत्पादन करून देण्याची तयारी दाखवली आणि ‘ऋतू कप’चे उत्पादन सुरू झाले. अवघ्या ५५५ रुपयांमध्ये अत्यंत उत्तम दर्जाचा हा कप सहज उपलब्ध होऊ लागला. त्याचबरोबर पर्यावरणपूरक कापडी सॅनिटरी पॅड्सची निर्मितीही त्यांनी सुरू केली.
 
सर्वच बाबतींत कप फायदेशीर...
आज सीमाताई ठिकठिकाणी जाऊन मेन्स्ट्रुअल कपच्या वापराबद्दल जागरूकता निर्माण करतात. हा कप एकदा घेतल्यानंतर पाच ते दहा वर्षे आरामात वापरता येतो. यामुळे महिलांना अगदी बिनदिक्कत पोहणे, व्यायाम, योगासने करता येतात. पावसातही मनसोक्त भिजता येते. एका वेळी हा कप, जास्त स्त्राव असेल तर चार ते पाच तास आणि कमी असेल तर सात ते आठ तास वापरता येतो. कपड्यांना डाग पडणे, वारंवार सॅनिटरी पॅड बदलावे लागणे, वावरताना अवघडलेपण येणे अशा सगळ्या त्रासातून यामुळे सुटका होते. शिवाय खर्चही एकदाच करावा लागतो. याची स्वच्छता करणेही अगदी सोपे आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही याचे घातक परिणाम नाहीत. सॅनिटरी पॅड्सच्या वापरामुळे निर्माण होणारा प्रचंड कचरा, अस्वच्छता, पर्यावरणाचे होणारे अपरिमित नुकसान आपण कपच्या वापरामुळे सहज टाळू शकतो. आपल्या एका कृतीने आपण निसर्गाच्या, पृथ्वीच्या रक्षणासाठी हातभार लावू शकतो, या सगळ्या बाबी त्या महिलांना समजावतात. त्यांना हा कप वापरण्यासाठी प्रोत्साहन देतात. प्रेरणा देतात. 

सीमा परदेशी-खंडाळे आणि कुटूंबीय
आज त्यांच्या या कामाची दखल सामाजानेही घेतली आहे. लोकमत सखी पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांची मुलेही आपल्या कर्तबगार आईबद्दल अभिमानाने जगाला सांगतात. सीमाताई त्यांच्या या कर्तबगारीचे श्रेय त्यांचा मुलगा, ज्याच्या शब्दामुळे त्या स्वतःचे काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याच्या जिद्दीला पेटल्या आणि पती, ज्यांनी त्यांना निर्णयक्षमतेची जाणीव करून देऊन निर्णयस्वातंत्र्य व खंबीर पाठिंबा दिला, या दोघांना देतात. 

सीमा परदेशी-खंडाळे यांच्या कामाला अनेक शुभेच्छा!

संपर्क : सीमा परदेशी-खंडाळे
मोबाइल : ९९३०० २५८०७

(सीमा परदेशी-खंडाळे यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


(‘तुजऐसी नाही’ या मालिकेतील सर्व लेख https://goo.gl/idhJdV या लिंकवर उपलब्ध आहेत. मेन्स्ट्रुअल कपबद्दल जागृती करणाऱ्या सानिया भालेरावबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा आणि तसेच कार्य करणाऱ्या अश्विनी चौमालबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. सॅनिटरी पॅड्सची घरच्या घरी विल्हेवाट लावणारे यंत्र विकसित केलेल्या दोन मुलींची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search