Next
रमणीय रत्नागिरी जिल्हा – भाग एक
BOI
Saturday, May 18, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:‘करू या देशाटन’
या सदराच्या गेल्या दोन भागांत आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा धावता आढावा घेतला. आजपासून पाहू या रत्नागिरी जिल्हा. सुरुवात रत्नागिरी शहरापासून...
..........
रत्नागिरी या नावातच सर्व काही आहे. जणू पाचूंची भूमी. या भूमीला इतिहासाचा वारसा आहे. रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किलोमीटर लांबीचा शुभ्र, रूपेरी वाळूचा, फेसाळणाऱ्या लाटा अंगावर घेणारा सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. हिरवाईत सामावलेला निसर्ग, लाल मातीतील शिवारे, किल्ले, सागर किनारे, धबधबे यांसह आध्यात्मिक व धार्मिक ठिकाणे बघण्यासाठी पर्यटक रत्नागिरीत गर्दी करत असतात. 

आंबा, काजू, फणस यांच्याबरोबर खवय्यांसाठी मासे, मोदक, पन्हे, कोकम, सोलकढी यांचीही रेलचेल आहे. लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, केशवसुत, ना. गोपालकृष्ण गोखले अशी कित्येक रत्ने या जिल्ह्याने दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर येथेच स्थानबद्ध होते. अशी यादी खूप मोठी आहे. 

येथे आढळणारी सागरी जीवसृष्टी विविधतेने समृद्ध आहे. फेसाळत्या रूपेरी लाटांच्या सान्निध्यात सोनेरी सूर्यास्त पाहण्यासाठी तसेच किनाऱ्यांवर उपलब्ध असणारे विविध वॉटर स्पोर्ट्स व साहसी जलक्रिडा मनसोक्त अनुभवण्यासाठी पर्यटक येथे येत असतात. रत्नागिरीला पुणे-मुंबई-कोल्हापूरपासून आठ ते १०  तासांत जाता येत असल्याने वर्षातून दोन-तीनदा येणारे पर्यटकही भरपूर आहेत. 

रत्नागिरी : पुराणकथेप्रमाणे भगवती देवीने रत्नासुराचा वध केला होता. त्यामुळे त्या देवीला रत्नेश्वरी असे म्हणत. त्यावरून रत्नागिरी हे नाव पडले. काहींच्या मते रतनगिरी या साधूंच्या वास्तव्यामुळे रत्नागिरी हे नाव प्राप्त झाले. कथा काहीही असो, रत्नागिरी हे नाव सर्वार्थाने सार्थ आहे हे नक्की. काही लोकांच्या मते वनवासामध्ये पांडवांनी तेराव्या वर्षी रत्नागिरी परिसरात वास्तव्य केले होते. नंतरच्या काळात येथील राजा वीरव्रत याने कुरुक्षेत्रातील लढाईत कौरवांविरुद्ध पांडवांना मदत केली होती. 

रत्नागिरी परिसरावर १२व्या शतकापर्यंत शिलाहार राजांची सत्ता होती. त्यानंतर बहामनी, आदिलशहा, मराठे व शेवटी ब्रिटिश आले. अरबस्तानातून विजापूरला संपर्क साधण्यासाठी आदिलशाहीत रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक अनेक बंदरे वापरली जायची. बाणकोटपासून राजापूरपर्यंत अशी अनेक बंदरे आहेत. दानशूर भागोजीशेठ कीर, महाराष्ट्राचे (मुंबई प्रांत) पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर, माजी नगरविकासमंत्री पी. जी. खेर, चरित्रकार धनंजय कीर असे दिग्गज या शहरातच जन्मले. रत्नागिरी येथे औद्योगिक वसाहत आहे. आंबा, काजू कोकम यांवर प्रक्रिया करणारे घरगुती व मोठे उद्योगही येथे आहेत. आमसुले, फणसपोळी, आंबापोळी (साटे), हरतऱ्हेची लोणची येथे मिळतात. 

रत्नदुर्ग किल्ला (फोटो : अनिकेत कोनकर)

रत्नदुर्ग किल्ला :
हा किल्ला तिन्ही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे. किल्ल्यावर भगवती देवीचे मंदिर असल्याने त्याला भगवती किल्ला असेही म्हणतात. शिलाहार राजा भोजदेव याने हा किल्ला बांधला. त्यानंतर तो विजापूरचा सरदार पोत्तु चेन्ना रेड्डी याच्या ताब्यात गेला व त्याने थोडी-फार दुरुस्ती केली. इ. स. १६७०मध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांनी किल्ला ताब्यात घेऊन त्याची दुरुस्ती केली. किल्ल्याचे क्षेत्रफळ १२० एकर असून, २७ बुरुज आहेत. किल्ल्यावर भगवती देवीचे देऊळ, तसेच रतनगिरी महाराजांची समाधी आहे. गाडी किल्ल्यावर जाते. (या किल्ल्यावर चित्रीकरण केलेला शिवाजी महाराजांबद्दलचा पोवाडा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

रत्नदुर्गावरून दिसणारा दीपस्तंभ आणि उजव्या बाजूला समुद्र (फोटो : अनिकेत कोनकर)

भगवती देवीचे मंदिर (फोटो : अनिकेत कोनकर)

भगवती मंदिरासमोरील सरखेल कान्होजी आंग्रे यांचा अर्धपुतळाकिल्ल्यावर दीपस्तंभही आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पुत्र सेखोजी आंग्रे यांनी सन १७३१मध्ये भगवती देवीचे मंदिर बांधले. भगवती देवी कोल्हापूरच्या अंबाबाईची बहीण मानली जाते. सन १९४०मध्ये भागोजीशेठ कीर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. येथे ४० फूट लांबीची सागवानाची गलबतावर लागणारी डोलकाठी बघण्यास मिळते. मंदिराजवळ किल्ल्यात भुयारे आहेत. तसेच डिसेंबर २०१७मध्ये या किल्ल्याच्या तळाशी असलेल्या गुहेचा शोधही लागला आहे. येथील समुद्रावरून येणारे वारे अंगावर घेणे एक सुखद अनुभव आहे. (अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)

भगवती बंदर : भगवती देवीच्या नावावरून भगवती बंदर हे नाव देण्यात आले. ब्रिटिशांनी मिऱ्या डोंगराच्या उत्तरेस काळबादेवी उपसागराच्या चिखलदरीतच १८५७मध्ये सैन्य उतरवले होते. तेव्हापासून मिऱ्या बंदराच्या किनारपट्टीवरून पुढे कोल्हापूरकडे आंबा घाटातून जाण्यासाठी रस्ता विकसित होत गेला. नर्मदा सिमेंट (आता एल अँड टी) प्रकल्पामुळे येथे वर्दळ वाढली आहे. भगवती बंदराच्या बाजूस असलेला समुद्र पांढऱ्या रेतीचा आहे. त्यामुळे याला पांढरा समुद्र असे म्हणतात. मांडवी बाजूच्या समुद्राला काळा समुद्र म्हंणतात. 

मिऱ्या बंदर : रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारीची तीन प्रमुख बंदरे आहेत, रत्नागिरीचे मिऱ्या बंदर, दापोली तालुक्यातील हर्णै बंदर आणि राजापूर तालुक्यातील नाटे बंदर. मच्छिमारांकडे आधुनिक बोटी, ट्रॉलर अशा सुविधा असल्याने लांबवर खोल समुद्रात जाऊन मासेमारी चालते. 

थिबा पॅलेस (फोटो : प्रसाद गोखले)

थिबा पॅलेस :
१८८५मध्ये ब्रह्मदेशचा राजा थिबा याला ब्रिटिशांनी कैद करून रत्नागिरी येथे आणून ठेवले. ब्रिटिशांनी त्यांच्या राजबंद्याना आपल्या मुलखाशी संपर्क ठेवता येऊ नये म्हणून  लांब ठेवण्याची नीती वापरली होती. बहादूरशहा जाफरला रंगून येथे, बाजीरावाला ब्रह्मावर्त येथे, साताऱ्याच्या छत्रपतींना वाराणसी येथे असेच कैदेत ठेवले होते. सन १९१०मध्ये नवीन पॅलेस बांधून राजाला येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. १९१६पर्यंत या राजवाड्यात राजा व राणीचे वास्तव्य होते. थिबा राजाला राज्याभिषेकाच्या वेळी त्याच्या बहिणीशीच विवाह करावा लागला होता. या राजवाड्यात एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे. पुरातत्त्व खात्याचे कार्यालयही येथे आहे. या राजवाड्यात थिबाने वापरलेल्या काही गोष्टी अजूनही जतन करून ठेवलेल्या आहेत या संग्रहालयात सहाव्या शतकातील पुतळेही जतन केले आहेत. थिबा राजाच्या मुलीची व नातीची कहाणी हृदयद्रावक आहे. त्याची मुलगी फाया हिने स्थानिक व्यक्तीशी लग्न केले होते. तिला पॅलेस व राजाच्या संपत्तीमधील काहीही मिळाले नाही. त्याच्या नातीला मोलमजुरी करावी लागली व हलाखीतच तिचा अंत झाला. 

थिबा पॉइंटवरील उद्यान

थिबा पॉइंटवरून दिसणारे विहंगम दृश्य. समोर भाट्ये खाडी, त्यावरील पूल आणि पलीकडे रत्नदुर्ग किल्ल्यावरील दीपगृह (फोटो : अनिकेत कोनकर)

थिबा पॉइंट :
थिबा पॅलेसजवळ असलेल्या या ठिकाणाहून भाट्ये खाडी आणि जवळपासच्या ठिकाणांचे सुंदर दृश्य दिसते. थिबा राजा या ठिकाणी बसून मायदेशाची आठवण काढत समुद्र पाहत असायचा. इथून सूर्यास्ताचे विहंगम दृश्य दिसते. येथे आता उद्यान विकसित करण्यात आले असून, जवळच जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांची शासकीय निवासस्थाने आहेत. 

भाट्ये खाडीवरील पुलावरून पूर्व दिशेला टिपलेले छायाचित्र - सूर्योदय (फोटो : अनिकेत कोनकर)

भाट्ये किनारा :
भाट्ये गावातील खाडीच्या जवळ असलेला हा किनारा त्याच नावाने ओळखला जातो. येथे समुद्राला काजळी नदी येऊन मिळते. या ठिकाणी पांढऱ्या रंगाची वाळू आढळते. समुद्रकिनारी सुरूबन आहे. फयान चक्रीवादळात त्याचे मोठे नुकसान झाले. हा किनारा सुमारे दीड किलोमीटर लांबीचा आहे. किनाऱ्याच्या टोकाला झरीविनायकाचं मंदिर आहे. येथील गोमुखातून वाहणाऱ्या झऱ्यापासून तळे तयार झाले आहे. हे तळे बारमाही पाण्याने भरलेले असते. यामुळेच हे गणेश मंदिर झरीविनायक म्हणून ओळखले जाते. 

भाट्ये खाडीवरील पुलावरून पश्चिम दिशेकडे टिपलेले छायाचित्र - सूर्यास्त (फोटो : अनिकेत कोनकर)

मांडवी किनारा :
रत्नागिरी शहराजवळील हा दुसरा समुद्रकिनारा. येथेही कायम गर्दी असते. मांडवी किनाऱ्यावर चमकदार काळी वाळू आहे. म्हणून त्याला काळा समुद्र म्हणतात. 

मांडवी किनारा

भाट्ये किनारा

मत्स्यालय :
रत्नदुर्ग किल्ल्याच्या जवळच मत्स्यालय आहे. तेथे देवमाशाचा सांगाडा आहे. आकर्षक मासे आणि कासवांच्या विविध प्रजातींचे नमुनेही येथील टाक्यांमध्ये पाहायला मिळतात. 

मत्स्यालयात ठेवलेला देवमाशाचा सांगाडा

लोकमान्य टिळक जन्मस्थान :
भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरीत झाला. रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती भागात टिळक आळीत त्यांचे टुमदार कोकणी घर असून, जन्मानंतर टिळकांचे या घरात सुमारे १० वर्षे वास्तव्य होते. त्यांचे घर आता एक स्मारक म्हणून जतन करण्यात आले आहे. स्थानिकांनी ते अतिशय चांगल्या पद्धतीने जपून ठेवले आहे. लोकमान्य टिळक यांच्या मूळ वापरात असलेल्या काही वस्तू, तसेच त्यांचे जुने फोटो, वर्तमानपत्रातील कात्रणे येथे पाहण्यास मिळतात. 

लोकमान्य टिळक जन्मस्थान

पतित पावन मंदिर :
स्वातंत्र्यवीर सावरकरांना दोन मे १९२१ रोजी अंदमानातून सुटल्यानंतर ब्रिटिशांनी काही काळ रत्नागिरीतील तुरुंगात ठेवले होते. त्यांना नंतर रत्नागिरी जिल्हा न सोडण्याच्या, तसेच राजकीय गोष्टींमध्ये भाग न घेण्याच्या अटीवर तुरुंगातून सोडण्यात आले होते. जातीपातीत अडकलेल्या लोकांना एकत्र आणण्याचे सावरकरांनी सुरू केले. जातीयता हा भारताला मिळालेला शाप असून, त्यामुळे एकसंघ भारत निर्माण होऊ शकत नाही, अशी त्यांची धारणा होती. ते विज्ञानवादी होते. कर्मकांडावर त्यांचा विश्वास नव्हता. लोकांची श्रद्धा लक्षात घेऊन पूजेच्या निमित्ताने सहभोजन ही कल्पना त्यांनी राबविली. महात्मा गांधींनीही त्यांची येथे गाठ घेतली होती. त्यांनी पतितपावन मंदिराची उभारणी केली. त्यांचे अनुयायी प्रसिद्ध व्यापारी भागोजीशेठ यांनी या मंदिराचे बांधकाम सन १९३१मध्ये केले. सावरकरांनी अनेक मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यानंतर सर्वांसाठी ‘पतित पावन मंदिर’ सुरू केले आणि सर्वांसाठी सामायिक भोजनालयही सुरू केले. 

पतित पावन मंदिर

सावरकर स्मारक :
पतितपावन मंदिराजवळच सावरकर स्मारकामध्ये १८५७पासूनचे हुतात्मा, क्रांतिकारक यांचे फोटो व माहितीचे दालन आहे. विशेष म्हणजे सावरकरांनी लंडनहून पाठविलेली दोन पिस्तुले, सावरकर वापरत असलेल्या काही वस्तूही येथे पाहण्यास मिळतात. 

विशेष कारागृह

सावरकर विशेष कारागृह :
कारागृहाकडे सर्वसामान्य माणसाची पावले वळत नाहीत. परंतु, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वास्तव्यामुळे रत्नागिरीतील विशेष कारागृहाची वेगळी ओळख बनली आहे. तत्कालीन ब्रिटिश सरकारने १९२१मध्ये सावरकर यांना या कारागृहात ठेवले. १८३४मध्ये ही इमारत दारुगोळ्यासाठी कोठार म्हणून बांधली होती. त्याचा नंतर १८५३पासून कारागृह म्हणून वापर करण्यात येऊ लागला. येथे सावरकरांना दोन वर्षे ठेवण्यात आले होते. पायात दंडा बेडी, अंगावर कुडता आणि ‘पन्नास वर्षे बंदीचा, १९६० साली सुटका’ असे लिहिलेला कथलाचा बिल्ला घालून सावरकर यांना येथे ठेवले होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही कोठडी ‘सावरकरांची कोठडी’ म्हणून कारागृह प्रशासनाकडून जतन करून ठेवण्यात आली आहे. (या कारागृहाबद्दल सविस्तर माहिती देणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

श्री देव भैरी : ही रत्नागिरीची ग्रामदेवता आहे. खालच्या आळीमध्ये हे देऊळ असून साधारण ३०० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले असावे. मंदिर परिसरात जुगाई देवी, तृणबिंदgकेश्वर, जंबुकेश्वर पंचायतन, गणपती, विष्णू, हरतालिका, सूर्यनारायण यांच्या मूर्तीही दिसून येतात. गुजरातमधील काही लोक येथे येऊन राहिले होते. त्यांनी श्री भैरी व विठ्ठल मंदिर बांधले. 

सी व्हॅली क्रॉसिंग

अठरा हातांचा गणपती :
श्री. जोशी यांच्या मालकीच्या खासगी मंदिरातील ही वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती आहे. गणपतीच्या हातांत अठरा शस्त्रे दाखविले आहेत. हे मंदिर फाटक हायस्कूलजवळ आहे. 

सत्यनारायण मंदिर : सत्यनारायणाच्या पूजा घरोघर होतात; पण सत्यनारायण मंदिर कुठेच दिसत नाही. येथील परटवणे भागात श्री समर्थ चंद्रशेखरस्वामी यांनी सन १९१६मध्ये हे मंदिर स्थापन केले. या मंदिरात इतरही अनेक देवतांच्या मूर्ती आहेत. दोन मुखे, तीन पाय व सात हात असलेली ही मूर्ती चुलीचे प्रतीक आहे. या मंदिराजवळच भार्गवरामाचे ३०० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. येथील मूर्ती बैठ्या स्वरूपात आहेत. 

झिपलाइन

काशीविश्वेश्वर मंदिर :
राजिवडा बंदराजवळ हे मंदिर आहे. हे सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे मंदिर असावे. या ठिकाणी पूर्वी जंगल व स्मशान होते. स्थानिक लोकांकडून सांगितल्या जाणाऱ्या कथेप्रमाणे, एक अपरिचित साधुपुरुष येथे येऊन राहिले होते. तेथील पठारावरील एका शिळेवर एक गाय पान्हा सोडीत असे. तेथे साधूमहाराजांच्या सांगण्यावरून खोदाई केली असता पाण्याचे कारंजे उडाले व अधिक खोदाई केली असता शिवलिंग सापडले. तेथेच कोरून सभागृह करण्यात आले व शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. साधूमहाराज नंतर अदृश्य झाले. हेच ठिकाण काशीविश्वेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. येथून भाट्ये खाडीचे सुंदर दृश्य दिसते. 

भाट्ये येथील झरीविनायक

काळबादेवी मंदिर :
मिऱ्या बंदराच्या पुढे काळबादेवी गावामध्ये (पुसाळे) देव रामेश्वर व काळबादेवी ही दोन मंदिरे आहेत. येथे काळ्या पाषाणातील काळबादेवीची मूर्ती आहे. शेजारीच तटबंदी असलेले रामेश्वर मंदिर आहे. येथे पोर्तुगीज घंटा असून, तिचे वजन १५० किलो आहे. ही घंटा सांगलीचे सरदार पटवर्धन यांनी पाठवली आहे. विसाजीपंत लेले यांनी ती उंटावरून येथे आणली. जवळच हसनपीर दर्गा असून, त्याच्या पूजेचा पहिला मान हिंदूंना आहे. येथील किनारा खूपच सुंदर आहे. येथे हंगामामध्ये सीगल पक्षी येतात. 

कसे जाल रत्नागिरीला?
रत्नागिरी कोकण रेल्वेने आणि मुंबई-गोवा महामार्गाने जोडलेले आहे. ताम्हिणी घाट, वरंधा घाट, आंबेनळी घाट (पोलादपूर), कुंभार्ली घाट आणि आंबा घाट अशा वेगवेगळ्या घाटांतून हे शहर मुंबई-पुणे-कोल्हापूरशी जोडलेले आहे. रत्नागिरी हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. जवळचा विमानतळ सध्या कोल्हापूर १२७ किलोमीटर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ लवकरच कार्यान्वित होईल. रत्नागिरीमध्ये राहण्यासाठी भरपूर चांगली हॉटेल्स आहेत. अतिपावसाचे जुलै-ऑगस्ट महिने सोडून पर्यटकांना वर्षभर कधीही येथे जाणे सोयीचे आहे.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

..........
(खालील शीर्षकावर क्लिक करून अधिक माहिती मिळवता येईल. पर्यटकांसाठी रत्नागिरीत असलेल्या विविध साहसी क्रीडाप्रकारांचे सोबत दिलेले व्हिडिओही जरूर पाहा...) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sameet About 121 Days ago
छान
0
0
जयश्री चारेकर About 121 Days ago
मस्त माहिती पून्हा सर्व डोळ्यासमोर आले
0
0

Select Language
Share Link
 
Search