Next
‘दिवाळी स्मरणात राहणारीच असते’
BOI
Wednesday, October 18, 2017 | 05:30 AM
15 0 0
Share this article:


‘दिवाळी, मग ती कुठल्याही काळातली असली, तरी स्मरणात राहणारी आणि वाट पाहायला लावणारी आहे. आताही आम्ही दिवाळीची तितक्याच उत्सुकतेने वाट पाहत असतो. त्या काळात फक्त प्रत्यक्ष भेटीला जास्त महत्त्व होते...’ सांगत आहेत कोकण मराठी साहित्य परिषदेचे रत्नागिरी येथील विश्वस्त अरुण नेरुरकर... ‘आठवणीतली दिवाळी’ या सदरात...
.......
अरुण नेरुरकरआम्ही रत्नागिरी जिल्ह्यातले असलो, तरी सिंधुदुर्ग भागाकडचे आहोत. त्यामुळे आमच्या बालपणातला काही भाग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेला. ती दिवाळी अजूनही माझ्या स्मरणात आहे.

आम्ही सिंधुदुर्गातून रत्नागिरीत आलो, तेव्हा असे लक्षात आले, की इथे फराळाला खूप महत्त्व आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोह्यांना खूप महत्त्व होते. आमची आजी चकल्या, लाडू, करंज्या या प्रकारांपेक्षा पोह्याचे निरनिराळे प्रकार बनवायची. दह्यातले पोहे, गुळाचे पोहे, तिखट पोहे, एक दोन प्रकारच्या उसळी अशा प्रकारचा फराळ तिथे असायचा.

किल्ले वगैरे बनवण्याची विशेष पद्धत नव्हती. परंतु सकाळी अंगण तयार केले जायचे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे उठून सगळ्या नातेवाईकांच्या गोतावळ्यात अभ्यंगस्नान केले जायचे. उटणे, नारळाचा रस काढून ते तेलातून लावले जायचे, किंबहुना घरातील बायकांकडून रगडले जायचे. त्या वेळी मोती साबण वगैरे नसायचे. कारण तो काळ तसा नव्हता; पण साबण नवीन असायचा. त्या वेळी थंडीही कडाक्याची असायची. आता तसा अनुभव येत नाही. आंघोळ झाल्यावर सर्वांचा एक कार्यक्रम असायचा तो म्हणजे कारीट फोडण्याचा. सर्वांत आधी उठून लवकर आटोपून कोण कारीट फोडते, याची जणू स्पर्धाच लागायची. सर्वांत आधी कारीट फोडणारा दिवसभर छाती पुढे काढून मिरवायचा. त्या वेळी फटाक्यांचा जोश तसा कमीच असायचा. इकडे गणपतीला जास्त फटाके असायचे; मात्र दिवाळीत ते कमी मिळायचे म्हणून असलेले फटाके पुरवून पुरवून वापरावे लागायचे.

शहरात आल्यावर मात्र हळूहळू बदल व्हायला लागले. पूर्वी आकाशकंदील कागद आणि काठ्यांपासून घरीच बनवले जायचे. माझ्या मुलांची दिवाळी सुरू झाली, तेव्हापासून एक जाणवायचं, की दिवाळीत आपण या गोष्टी स्वतंत्रपणे करत होतो; मात्र त्याच गोष्टींसाठी या मुलांना घरातल्या मोठ्यांची गरज पडायला लागली. त्यामुळे त्यांना ते जमत नव्हतं आणि आम्हाला ते शिकवता येत नव्हतं आणि मग थोडे फार पैसे असल्यामुळे आकाशकंदील बाहेरून विकत आणले जाऊ लागले. आता सर्वच गोष्टी विकत घेतल्या जातात.

दिवाळी, मग ती कुठल्याही काळातली असली तरी स्मरणात राहणारी आणि वाट पाहायला लावणारी आहे. आताही आम्ही दिवाळीची तितक्याच उत्सुकतेने वाट पाहत असतो. त्या काळात फक्त प्रत्यक्ष भेटीला जास्त महत्त्व होते. आता मात्र प्रत्येकजण कामात अडकल्यामुळे मुळातच वेळ मिळत नाही. त्या वेळी शुभेच्छापत्रांची वाट पाहिली जायची. आता दिवाळीच्या शुभेच्छा फोन आणि तत्सम माध्यमातून दिल्या जातात. फराळदेखील तयार आणण्यावर भर दिला जातो.

मधल्या काळात दिवाळी अंक चाळण्याचा छंद लागला. ‘मौज’, ‘दीपलक्ष्मी’, ‘दीपावली’ हे अंक यायचे. आता त्यांची जागा टीव्हीवरील कार्यक्रमांनी घेतली. हल्ली दिवाळी पहाट ही नवीन संकल्पना राबवली जाते. त्यामुळे बऱ्याचदा बाहेर जावे लागते. इतक्या वर्षांत झालेले हे बदल आम्ही सकारात्मक दृष्टीने स्वीकारले आहेत.

(शब्दांकन-व्हिडिओ : कोमल कुळकर्णी-कळंबटे)

(‘आठवणीतली दिवाळी’ या दिवाळी अंकातले सर्व लेख एकत्रितरीत्या येथे उपलब्ध होतील.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shama Dalal About
Nice article. Reminded us our childhood Diwali days. 👌👌
0
0

Select Language
Share Link
 
Search