Next
पोरबंदरमधल्या दिवाळीची आठवण
BOI
Monday, November 05, 2018 | 12:00 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोकाही कामानिमित्त पोरबंदरला गेलेल्या मनोहर जोगळेकर यांना दिवाळीच्या कालावधीतही तिथेच राहावे लागले होते. त्या वेळच्या आठवणी जागवणारा हा त्यांचा लेख...
........
माझी दिवाळीतली आठवण आहे पोरबंदरमध्ये साजऱ्या केलेल्या दिवाळीची. आज माझं वय आहे ७७ वर्षे. १९९७-९८च्या आसपासची गोष्ट आहे. मी कचेरीच्या कामानिमित्त प्रथम अहमदाबाद अन् तिथून पोरबंदरला गेलो होतो. नरकचतुर्दशीला सायंकाळी माझे काम आटोपले. त्या दिवशी दिवाळीची सुट्टी नसते. त्या कचेरीतल्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घ्यायची, त्यांच्याशी चर्चा करायची आणि निघायचे, असा माझा विचार होता. परंतु त्या प्रमुख अधिकाऱ्यांना त्या दिवशी वेळ नव्हता. ते म्हणाले, आपण बैठक भाऊबीजेच्या दिवशी घेऊ. तोपर्यंत तुम्ही इथेच म्हणजे पोरबंदरला राहा. माझे परतीचे तिकीट काढून द्यायची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. मला हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी मला त्या दोन दिवसांत काहीही कमी पडू दिले नाही.

लक्ष्मीपूजन आपल्यासारखेच तिथेही दणक्यात साजरे होते. परंतु मुंबईसारखी दिवाळीची मजा तिथे आली नाही. कारण कुटुंबापासून दूर अशी ती माझी पहिलीच दिवाळी होती. तिथे त्या हॉटेलच्या गच्चीवर मी जेव्हा जेव्हा जात असे, तेव्हा तेव्हा मला दूरवर मोर बागडताना दिसायचे. बापूंचे ते जन्मगाव मी तेव्हा गल्लीबोळातून फिरून पाहिले. मला सख्खी बहीण नसल्यामुळे भाऊबीजेला मी मानलेल्या बहिणीकडून ओवाळून घेत असे. इथे त्या लोकांनी मानलेल्या बहिणींचीही व्यवस्था केली होती. तिथल्या अनाथाश्रमातील एक बहीण मला हॉटेलमध्ये दुपारच्या जेवणाच्या आधी ओवाळायला आली. मी दिलेली ओवाळणीही ती घेईना. ती म्हणाली, ‘मला ओवाळणी आधीच मिळाली. हा मलाही आश्चर्याचा धक्का होता...’

भाऊबीजेला सायंकाळी तिथले एक एक अधिकारी मीटिंगसाठी हजर होऊ लागले. संध्याकाळी सहा वाजता फिरण्यासाठी बाहेर पडलो. तिथे दोन मुले केपांच्या बंदुकांनी एकमेकांवर गोळीबार करत होती. कशी कुणास ठाऊक, एक ठिणगी दोरीवर सुकत घातलेल्या कपड्यांवर पडली आणि क्षणात कपड्यांनी पेट घेतला. मुलांना तीही गंमतच वाटली. आग पाहून ते नाचू लागले. मी धावलो. ते कपडे खाली काढले. पायाने आग विझवण्याचा प्रयत्न करू लागलो. आग विझवली. लाकडी, कौलारू घर असल्याने खूप मोठा अघटित प्रसंग टळला होता. तेवढ्यात त्यांचे आई-वडीलही आले. त्यांनी माझे आभार मानले. 

बैठक झाली. तिथल्या कार्यालयातील सर्व अधिकारी मला सोडायला रेल्वे स्थानकावर आले होते. प्रथम श्रेणीचा डबा, मस्त थंडी पडलेली. त्यांनी माझ्यासाठी ब्लँकेटची व्यवस्था केली. त्यांनी माझ्या कचेरीला पत्रही दिले. आमच्यामुळे हा नरक चतुर्दशीला बैठक घेऊ शकला नाही. याला भाऊबीजेलाही ‘ऑन ड्युटी’ धरावे. माझ्या कचेरीनेही त्यांचे म्हणणे स्वीकारले. ती दिवाळी माझी ‘ऑन ड्युटी’ असूनही मजेत गेली. कदाचित देवाला माझ्याकडून त्या मुलांना, घराला वाचवायचे असावे, असे उगाचच वाटून गेले. 

संपर्क : मनोहर जोगळेकर, प्रेरणानगर, बोरीवली, मुंबई
मोबाइल : ७०३९७ ८३९८०, ८१०८७ ९२०८८
ई-मेल : mvjoglekar41@gmail.com

(‘आठवणीतली दिवाळी’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी https://goo.gl/riz56x या लिंकवर क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search