पुणे : ‘युवकांनी स्वतःची जबाबदारी व जाणीव ओळखून सामाजिक बांधिलकी जोपासली, तर समाजासोबत स्वतःचीही उन्नती होते. जाणीव युवा फाउंडेशनमधील कार्यकर्त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आणि समाज हिताचे आहे. या चळवळीत अधिकाधिक युवकांनी सहभागी होऊन समाजकार्यासाठी आपले योगदान द्यावे,’ असे प्रतिपादन महा मेट्रोचे सह-महाव्यवस्थापक प्रल्हाद कचरे यांनी व्यक्त केले.
जाणीव युवा फाउंडेशन संस्थेतर्फे वैयक्तिक प्रगती व सामाजिक बांधीलकी जपत यश मिळवलेल्या युवा कार्यकर्त्यांचा गौरव कचरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थी सहायक समितीच्या आपटे वसतिगृहात झालेल्या या सोहळ्याला सिनेअभिनेते विवेक लागू, वंचित विकासचे संस्थापक विलास चाफेकर, संचालिका मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, ‘जाणीव युवा’चे संचालक डॉ. श्रीकांत गबाले उपस्थित होते.
युवकांना मार्गदर्शन करताना कचरे म्हणाले, ‘आज समाजात अनेक वंचित घटक आहेत. त्यांच्यापर्यंत सोयीसुविधा पोहोचविण्याची आवश्यकता आहे. युवकांकडे कौशल्य आणि नवनिर्मितीची ऊर्जा आहे. त्यातून अनेक गोष्टी साध्य करता येऊ शकतात. त्यासाठी युवकांनी आपल्यामध्ये सामाजिक बांधिलकीची भावना जोपासली पाहिजे.’
‘बदलत्या काळाचा अंदाज घेऊन सामाजिक कामात बदल करण्याची गरज आहे; तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर सामाजिक कार्याला व्यापक रूप द्यायला हवे,’ असे मत चाफेकर यांनी मांडले, तर ‘वैयक्तिक प्रगती व सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालून कार्यरत असलेला युवकच समाजाचा विकास साधू शकतो,’ असे अभिनेते लागू म्हणाले.
मयूर गाडेकर यांना उत्तम कार्यकर्ता म्हणून गौरविण्यात आले. डॉ. गबाले यांनी प्रास्ताविक केले. विकी टकले यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती थोरात यांनी आभार मानले.