Next
दिनदर्शिकेतून उलगडले ‘स्मरणरम्य पुणे’
BOI
Monday, December 03, 2018 | 03:06 PM
15 0 0
Share this article:

दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना ज्येष्ठ नेते शरद पवार, मुलाखतकार सुधीर गाडगीळ आणि इतर मान्यवर

पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि ऐतिहासिक शहर असा नावलौकिक असलेल्या पुण्याच्या जुन्या आठवणी जागवणारी ‘स्मरणरम्य पुणे’ ही दिनदर्शिका नुकतीच प्रकाशित झाली आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील पुण्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी, वाड्यांसारख्या वास्तूंचे सौंदर्य टिपणारी, तसेच महात्मा गांधी, इंदिरा गांधी, बॅ. महंमद अली जिना यांच्यासारख्या दिग्गजांच्या पुणे भेटीदरम्यानची छायाचित्रे या दिनदर्शिकेत आहेत.

ही छायाचित्रे पुण्यातील पत्रकार व दुर्मीळ छायाचित्रांचे संग्राहक विवेक सबनीस यांच्या वैयक्तिक संग्रहातील आहेत. ‘स्मरणरम्य पुणे’ आणि ‘पुणे नॉस्टॅल्जिया’ अशा नावांनी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्हीही भाषांमध्ये ही दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. पेपरलीफ प्रकाशन संस्थेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. पहिल्यांदा २०१७मध्ये ही दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर २०१८ आणि आता २०१९ असे हे या दिनदर्शिकेचे तिसरे वर्ष आहे. 

विवेक सबनीसविवेक सबनीस म्हणाले, ‘पुण्याबद्दल जिव्हाळा असलेल्या प्रत्येकाने संग्रही ठेवावी अशीच ही दिनदर्शिका आहे. यातील छायाचित्रे मिळवण्यासाठी खूप धडपड केली आहे. अनेक जुन्या लोकांकडून ती मिळवली आहेत. ही सर्व छायाचित्रे मिळवताना अनेक छायाचित्रकारांशी संवाद साधला. छायाचित्रांची पार्श्वभूमी आणि त्यांचे औचित्य अशी माहितीही त्यांच्याकडून मिळत गेली.’

या दिनदर्शिकेतील प्रत्येक छायाचित्र पुण्याच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय संस्कृतीची ओळख करून देणारे आहे. १९१५मध्ये शनिवारवाड्याच्या प्रांगणात एकत्र आलेले काँग्रेसचे नेते, गोपाळकृष्ण गोखले यांच्या निधनानंतर प्रांतिक परिषदेसाठी एकत्र जमलेला जनसमुदाय, आणीबाणीआधी इंदिरा गांधींनी केलेल्या पुणे दौऱ्यावेळी टिळक रस्त्यावरून जातानाचे त्यांचे छायाचित्र, लक्ष्मी रस्त्यावरील लागू वाडा, लिमये नाट्य चित्र मंदिरात (आत्ताचे विजय टॉकीज) साजरा करण्यात आलेला पहिला स्वातंत्र्यदिन अशा अनेक घटना आणि वास्तूंची छायाचित्रे त्या काळच्या रम्य पुण्याची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाहीत. 

तेव्हाचे पुणे हे शांत, स्वच्छ आणि छोटेसे एक टुमदार शहर होते, हेदेखील या छायाचित्रांवरून स्पष्ट होते. सबनीस यांच्या संग्रहातील छायाचित्रांमधून आतापर्यंत जवळपास ४० छायाचित्रे या दिनदर्शिकांसाठी वापरण्यात आली आहेत. आपण जमवलेल्या दुर्मीळ छायाचित्रांचा यथायोग्य आणि सर्वांसाठी उपयोग होत असल्याने आपल्याला आनंद वाटत असल्याचे सबनीस यांनी म्हटले आहे.     

दिनदर्शिकेसाठी संपर्क : विवेक सबनीस 
मोबाइल : ९३७३० ८५९४८

(दिनदर्शिकेची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search