Next
सेवाधर्मो परम गहनो!!
BOI
Wednesday, December 05, 2018 | 08:00 AM
15 0 0
Share this article:

सुदानमधील अंतर्गत विस्थापितांसाठीच्या छावणीतील महिलांना स्वयंसेवकांतर्फे इंग्रजी भाषेचे धडे दिले जात आहेत. या उपक्रमाला संयुक्त राष्ट्रसंघाचेही साह्य आहे.

आज (पाच डिसेंबर) आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन आहे. जगभरातील स्वयंसेवकांना संघटित करण्याकरिता राष्ट्रसंघातर्फे संयुक्त राष्ट्र स्वयंसेवक कार्यक्रम राबवला जातो. दर वर्षी हजारो स्वयंसेवक या कार्यक्रमाच्या माध्यमातून शांतता आणि विकासात योगदान देण्यासाठी पुढे येतात. ‘स्वयंसेवक समाजात लवचिकता निर्माण करतात,’ ही यंदाच्या स्वयंसेवक दिवसाची संकल्पना आहे. खरे सांगायचे म्हणजे स्वयंसेवा ही मानवी संबंधांची मूळ अभिव्यक्ती आहे. वैयक्तिक पातळीवर, तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या स्वयंसेवकांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख... 
.........
विकिपीडिया, गुटेनबर्ग, अर्काइव्ह डॉट ऑर्ग ही नावे इंटरनेटवर मुशाफिरी करणाऱ्या बहुतेक जणांच्या ओळखीची असतात. या सर्वांचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व स्वयंसेवक आधारित सेवा आहेत. म्हणजे काय? तर या संकेतस्थळांसाठी जवळजवळ सर्व काम त्यांच्या योगदानकर्त्यांच्या मोकळ्या वेळेत केले जाते. कोणत्याही विषयावर वा लेखांवर कार्य करणारे गट किंवा पथके नाहीत. स्वतःच्या इच्छेने काम करू पाहणारेच येथे येतात. आपल्या सोयीनुसार ते विश्रांती घेतात आणि जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हा ते बाहेर पडतात. यात कोणीही योगदान देऊ शकते. ही संकेतस्थळे म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेल्या स्वयंसेवेचा आधुनिक आविष्कार होत.
 
आपल्या महाराष्ट्रात नांदेडला शिखांचा दुसऱ्या क्रमांकाचा पवित्र गुरुद्वारा आहे. या गुरुद्वारात जगभराचे शीख भाविक भेट देतात; मात्र केवळ दर्शनापुरते मर्यादित न राहता हे भाविक गुरुद्वारात सेवाही करतात. इंग्लंड-अमेरिकेत कोट्यधीश व्यावसायिक असलेले शीख येथे लोकांच्या चपला सांभाळतात, गुरुद्वाराची फरशी झाडतात-पुसतात किंवा भाविकांना पंगतीत जेवणही वाढतात. स्वयंसेवक वृत्तीचे हे उत्तम उदाहरण म्हणायला पाहिजे. पंढरीची वारी हेही स्वयंसेवक धर्माचे उदाहरण म्हणायला हरकत नाही, कारण यात प्रत्येक जण आपापल्या इच्छेने सहभागी होतो, त्यातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडतो आणि त्यासाठी मोबदलाही कोणी मागत नाही. 

केरळमधील पूरस्थितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यरोटरी, लायन्स, रेडक्रॉस अशा अनेक संघटना आज जागतिक पातळीवर स्वयंसेवकांच्या संघटना म्हणून ओळखल्या जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही नाव यात घेता येईल. जगातील सर्वांत मोठी सदस्यसंख्या असलेली संघटना म्हणून संघाकडे पाहिले जाते. नैसर्गिक किंवा मानवी आपत्तीच्या काळात संघ स्वयंसेवकांच्या सेवाकार्यामुळे संघ ओळखला जातो. नुकत्याच आलेल्या केरळमधील पुराच्या काळात संघाचे सेवाकार्य संपूर्ण जगाने पाहिले. 

इतके कशाला, महात्मा गांधी व अन्य अनेक क्रांतिकारकांच्या जीवनात आपल्याला एक समान गोष्ट आढळते. ती म्हणजे या सर्वांनी कधी ना कधी आपल्या आयुष्यात स्वयंसेवक म्हणून काम केले होते. महात्मा गांधींनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवातच मुळात बोअर युद्धामध्ये स्वयंसेवक म्हणून केली होती. त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकांचे शुश्रुषा पथक तयार करून दोन्ही बाजूंच्या जखमी सैनिकांची सेवा केली. थोर स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट यांची कथा सांगितली जाते. ते दररोज सकाळी वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन साफसफाईची कामे करत असत. एखाद्या वस्तीमध्ये ते गेले असताना लोक आपल्या घरातला कचरा रस्त्यावर आणून टाकत आणि त्यांना झाडायला सांगत; मात्र त्यांनी कधीही कुरकुर न करता आपले साफसफाईचे व्रत चालू ठेवले. शिवाय प्रौढ साक्षरांना शिकविण्यासाठी स्वयंसेवक म्हणूनही त्यांनी नाव नोंदविले होते. 

अशा अनेक निःस्वार्थी कार्यकर्त्यांच्या, त्यांच्या संस्था व संघटनांच्या कामामुळेच, त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आज आपण आरामदायक आयुष्य जगू शकतो. असे स्वयंसेवक व त्यांच्या संस्थांच्या कष्टांना दाद देण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने पाच डिसेंबर रोजी हा आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस (आयव्हीडी) म्हणून जाहीर केला आहे. या स्वयंसेवकांची मूल्ये सर्वांसमोर आणण्यासाठी आणि त्यांच्या कामाचा प्रचार करण्यासाठी एक संधी म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते. विविध गैर-सरकारी संस्था (एनजीओ), राष्ट्रसंघाच्या संस्था, सरकारी अधिकारी आणि खासगी क्षेत्रातील व्यक्ती यात सहभागी होतात. 

जगभरातील स्वयंसेवकांना संघटित करण्याकरिता राष्ट्रसंघातर्फे संयुक्त राष्ट्र स्वयंसेवक कार्यक्रमही (यूएनव्ही) राबवला जातो. दर वर्षी हजारो स्वयंसेवक या कार्यक्रमाच्या माध्यमातून शांतता आणि विकासात योगदान देण्यासाठी पुढे येतात. आज जगभरातील अत्यंत आव्हानात्मक वातावरणात साडेसहा हजारांहून अधिक स्वयंसेवक संयुक्त राष्ट्रांच्या वेगवेगळ्या संघटनांना सेवा देत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या ऑनलाइन नोंदणीच्या माध्यमातून सेवेद्वारे १२ हजार यूएन स्वयंसेवक वीस हजारांहून अधिक असाइनमेंट (कार्ये) पूर्ण करत आहेत.

राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार, जागतिक पूर्ण-वेळ स्वयंसेवकांची संख्या एक अब्जाहून अधिक आहे. यातील तीस टक्के स्वयंसेवक संस्था, संघटना आणि वेगवेगळ्या गटांद्वारे औपचारिकपणे कार्य करतात, तर ७० टक्के व्यक्ती अनौपचारिकपणे स्वयंसेवा करतात. यातील एकूण ६० टक्के अनौपचारिक स्वयंसेवक या महिला आहेत, हे विशेष. यांपैकी बहुतेक जण आपल्या स्वत:च्या देशात सेवा करतात.  

स्वयंसेवा म्हणजे काय? तर स्वयंसेवा याचा अर्थ स्वेच्छेने इतरांसाठी, संपूर्ण मानवजातीसाठी किंवा अगदी प्राणिमात्रांसाठी काम करणे. या बदल्यात काय मिळते? तर आत्मसन्मानाची जाणीव होणे, हा स्वयंसेवेचा खरा लाभ म्हणायला पाहिजे. स्वयंसेवक या शब्दातच निरपेक्षपणे काम करणे, हा अर्थ गृहीत आहे. त्यामुळे आर्थिक किंवा वस्तूरूपाने लाभ त्यात अपेक्षित नाही. आणखी एक म्हणजे हे स्वयंसेवक जगभरातील सरकारांना अधिक जबाबदार बनवितात. ते सरकार आणि नागरी समाजाबरोबर काम करतात आणि महिला, युवक आणि मागासवर्गीय यांसारख्या वंचित गटांचे प्रतिनिधित्व करतात. आपले जीवन केवळ देण्या-घेण्यावर आधारित असता कामा नये, त्यात केवळ लाभ-तोट्याचे हिशेब असता कामा नयेत, हे स्वयंसेवेचे एक मूलभूत तत्त्व आहे. म्हणूनच ‘सेवाधर्मो परम गहनो योगिनामप्यगम्यः’ (सेवाधर्म अत्यंत गूढ आहे, योग्यांनाही त्याचे रहस्य कळत नाही) असे म्हटले असावे.

‘स्वयंसेवक समाजात लवचिकता निर्माण करतात,’ ही यंदाच्या स्वयंसेवक दिवसाची संकल्पना आहे. खरे सांगायचे म्हणजे स्वयंसेवा ही मानवी संबंधांची मूळ अभिव्यक्ती आहे. भारतीय संदर्भात सांगायचे झाल्यास आपल्या कुटुंबसंस्थेत याचे प्रतिबिंब पडले आहे. एखाद्या संस्थेत जवळीक दाखविण्यासाठी हे एक कुटुंब आहे, असे म्हणायचा जो प्रघात आहे, त्याचे कारण हे आहे. कोणत्याही समाजाच्या संपूर्ण विकासाकरिता नागरिकांनी केलेली स्वयंसेवा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. स्वयंसेवा केल्याने केवळ सामाजिक संसाधने खर्च होण्यापासून वाचतात असे नव्हे, तर त्याहूनही अधिक काही तरी घडते. स्वयंसेवेमुळे समाजाचाच विकास होत नाही, तर तेथे राहणाऱ्या लोकांचाही विकास होतो. जागतिक पातळीवर पाहिले, तर गरिबी निर्मूलन, मूलभूत आरोग्य आणि शिक्षण, पर्यावरण आणि हवामानबदल, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता अशा विविध क्षेत्रांमध्ये स्वयंसेवक गुंतलेले आहेत. 

डॉ. कोटणीससमाजात स्वयंसेवेचे प्रचलन वाढते, तेव्हाच आपल्या समाजात व नागरिकांमध्ये काही मानवीय गुण वाढतात. जो समाज केवळ देण्या-घेण्याच्या आधारावर चालतो, तो केवळ एक यांत्रिक समाज आहे. स्वतःसाठी सगळेच जगतात, मात्र जगण्याचा खरा आनंद दुसऱ्यांसाठी जगणाऱ्यांना मिळतो. याचे एक उदाहरण म्हणून डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्याकडे पाहता येईल. चीन हा काही आपला घनिष्ठ मित्रदेश नाही. परंतु डॉ. कोटणीसांचे नाव काढताच आजही चिनी लोकांच्या डोळ्यात भावनेचा ओलावा दिसतो. दुसऱ्या महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना डॉ. कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. एखाद्या परक्या देशाच्या स्वयंसेवकाने आत्मार्पण करून सेवाधर्म निभावण्याची ही घटना जेवढी नाट्यमय, तेवढीच भावनात्मक!

भारतात निव्वळ स्वयंसेवा अशी नाही. लोक स्वयंसेवा करतात, परंतु ती मुख्यतः धर्माशी जोडलेली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात पाहू जाता भारतात निखळ स्वयंसेवी कार्य खूप कमी होते. अर्थात जिथे बहुतेक लोक स्वतःच्याच जगण्याची लढाई लढण्यात गर्क आहेत, तिथे इतरांसाठी वेळ आणि शक्ती कोण खर्च करणार? तरीही ‘पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा,’ ही आपल्या संतांची शिकवण आहे. म्हणून वर म्हटल्याप्रमाणे कोणी गुरुद्वारात सेवा करते, कोणी तीर्थस्थळांच्या ठिकाणी धर्मशाळा काढून यात्रेकरूंची सोय करते, कोणी अन्नछत्रे काढून त्यांच्या पोटाची सोय लावते. हे जमत नसेल तर कोणी उन्हाळ्यात पाणपोई काढून तृषार्तांचे आशीर्वाद घेतो. जैन धर्मीयांसारखे गट मुक्या प्राण्यांच्या सेवेत आणि गोसेवत गुंतले आहेत. अशा अगणित सेवेकऱ्यांच्या बळावरच आपला योगक्षेम चालला आहे, याचे स्मरण आजच्या दिवसानिमित्ताने व्हायला हरकत नाही.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search