Next
महाराष्ट्रातील निवडक संग्रहालये
BOI
Thursday, May 18, 2017 | 07:00 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटो

पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, इतिहास-संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी, या इतिहासातील नोंदी सुसंगत पद्धतीने मांडण्याची आवश्यकता असते. त्यामुळे संग्रहालयांची भूमिका महत्त्वाची असते. इतिहासातील समाजकारण-राजकारण-संस्कृती समजून घेण्यासाठी संग्राहालयातील शिलालेख, भित्तीलेख, मूर्ती, ताम्रपट, भूर्जपत्रे, हस्तलिखित ग्रंथ, कलात्मक वस्तू, हस्तलिखिते, छायाचित्रे, रेखाचित्रे, ध्वनिमुद्रिका, ऐतिहासिक कागदपत्रे मार्गदर्शक ठरतात. आजच्या जागतिक संग्रहालय दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील निवडक संग्रहालयांचा  घेतलेला हा आढावा...

........................

महाराष्ट्रात सध्या विविध विषयांवरील १३२ संग्रहालये आहेत. यात व्यक्ती, विविध विषय व विविध विचार, कलादालने असे मुख्य प्रकार आहेत. या मध्ये महात्मा गांधीजींविषयीचे जळगाव येथील गांधीतीर्थ, मुंबई येथील मणिभवन, वर्धा-सेवाग्राम येथील संग्रहालय, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे रयत शिक्षण संस्थेचे सातारा येथील संग्रहालय, अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख संग्रहालय, पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कर्वे स्मारक, साधू वासवानी यांचे दर्शन संग्रहालय ही काही व्यक्तिविशेष संग्रहालये आहेत. पुरातत्त्व व इतिहास या विषयावर मुंबई येथील छत्रपती शिवाजी संग्रहालय, भाऊ दाजी लाड संग्रहालय, तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, नागपूर, पैठण, तेर, धुळे येथे ऐतिहासिक संग्रहालये आहेत. चाळीसगाव येथील के. के. मूस पेंटिंग्ज संग्रहालय, अहमदनगर येथील रणगाडा संग्रहालय, अंजनेरी येथील नाणे संग्रहालय, पुणे येथील कात्रज पार्क व पेशवे पार्क, औरंगाबाद येथील सिद्धार्थ गार्डन ही प्राणिसंग्रहालये अशी काही वेगवेगळ्या विषयावरील संग्रहालये प्रसिद्ध आहेत. त्यापैंकी काहींची ही तोंडओळख...

रिझर्व्ह बँकेचे चलनाचे संग्रहालय, मुंबई.
जानेवारी, २००५मध्ये या संग्रहालयाची मुंबई येथे स्थापना झाली. मुंबईतील अमर बिल्डिंग येथे रिझर्व्ह बँकेच्या वतीने या संग्रहालयाची सुरुवात झाली आहे. हे भारतातील चलनांचे पहिलेच संग्रहालय आहे. चलन व्यवहारात कसा बदल झाला, नाणी, नोटांचे बदलते आकार, रंग, तसेच निरनिराळे धातू, मिश्र धातू यांचा या संग्रहात समावेश आहे. इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासून ते आजतागायत चलनात सुरू असलेल्या नोटा आपल्याला येथे पाहता येतात. नाणी, नोटा, धनादेश (चेक्स), हुंडी यांमध्ये निरनिराळ्या धातूंचा, कागदाचा उपयोग चलनात कसा होत गेला, हे येथे पाहता येते. लहान मुलांसाठी माहिती देणारी स्वतंत्र दालने तयार करण्यात आली आहेत. या दालनांमध्ये नाण्यांचा इतिहास, माहिती खेळांमधून सांगितली आहे.
वेबसाइट : http://1b.yt/ecapN

नॅशनल मेरिटाइम म्युझियम, मुंबई
मुंबई येथील नॅशनल मेरिटाइम म्युझियम हे संग्रहालय भारतीय नौदलाने तयार केले आहे. इतर देशातील मॉडेल्स घेऊन त्यावरून मुंबईत बांधण्यात आलेल्या बोटींचे नमुने येथे पाहता येतात. तसेच नौसेना किंवा नौदल याविषयी रस असणाऱ्या पर्यटकांना व अभ्यासकांना हे प्रतिकृतींचे संग्रहालय एक वेगळाच आनंद देते.
वेबसाइट : http://1b.yt/eYNY2

डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम, मुंबई
डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम (व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम) हे संग्रहालय मुंबईतील भायखळा येथे आहे. या संग्रहालयात शस्त्रास्त्रे, चर्मकला, कुंभारकाम, हस्तीदंतावरील कोरीव काम, प्राचीन लिखित दस्तऐवज अशा विविध विषयांवरील माहिती व वस्तूंचा संग्रह आहे. हे मुंबईतील जिजामाता उद्यानात असून, या संग्रहालयातून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या महत्त्वपूर्ण संस्थेची स्थापना (१८८३) झाली आहे.
वेबसाइट : http://1b.yt/e-hTg

दी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई (BNHS)
दी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही सामाजिक संस्था १२५ वर्षांपासून निसर्गरक्षण, संवर्धन यासाठी काम करत आहे. या संस्थेत नैसर्गिक साधन-संपत्तीच्या शाश्वत, सशक्त समतोल विकासासाठी संशोधन व अभ्यास चालतो. १८८३ साली मुंबईतील फोर्ट भागात या संस्थेची सुरुवात झाली. या संस्थेच्या संग्रहालयात असंख्य पक्षी-प्राणी यांची छायाचित्रे, माहिती आहे. तसेच विविध झाडे, फळे, फुले येथे पाहता येतात. निसर्गाचा इतिहास, जैवविविधता या विषयांवरील हे आशिया खंडातील सर्वांत मोठे संग्रहालय आहे. सुमारे २६ हजार पक्षी, २७ हजार ५०० प्राणी व ५० हजार कीटक यांची माहिती आपल्याला येथे मिळते.
वेबसाइट : http://bnhs.org/bnhs/

छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय, मुंबई
प्रिन्स ऑफ वेल्स या नावाने पूर्वी प्रसिद्ध असलेले हे संग्रहालय मुंबईमध्ये फोर्ट या भागात आहे. प्राचीन स्थापत्य, वास्तुशास्त्र, वास्तुकला, पेंटिंग्ज, चित्रकलेचे नमुने इथे जतन करण्यात आले आहेत. मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या परिसरात हे लहानसे संग्रहालय १९२६ साली सुरू झाले. स्पेनमधील रहिवासी हेन्री हेरास यांनी भारतात आल्यावर संस्कृती, परंपरा, पुरातत्त्वशास्त्र या दृष्टीने भारताचा अभ्यास व्हावा या हेतूने ही संस्था सुरू केली. या हेराज इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे. मेसोपोटेमिया संस्कृतीतील काही वस्तू, मातीच्या वस्तू, नाणी, ख्रिश्चन-लाकडी कोरीवकामाचे नमुने, प्राचीन काळातील मातीची भांडी, हस्तिदंतावरील कोरीव काम, गंधर्व, मथुरा, गुप्त-काळातील दस्तऐवज, मेरी- येशू यांच्या मूर्ती या संग्रहालयात ठेवलेल्या आहेत.
वेबसाइट : http://www.csmvs.in/

भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे 
पुण्यात हे संशोधन केंद्र आणि संग्रहालय १९१०मध्ये सुरू झाले. इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी या संस्थेची स्थापना केली. इतिहासाचा अभ्यास आणि सांस्कृतिक वारसा जतन करणारे हे संग्रहालय असून, त्यात ग्रंथालय व चित्रांचे दालन आहे.

महात्मा फुले वस्तुसंग्रहालय , पुणे
या संग्रहालयाची स्थापना १८९० साली करण्यात आली. या संग्रहालयात हस्तकलेचे नमुने व शेतीशी संबंधित आणि काही औद्योगिक उत्पादने आहेत. या ठिकाणी हत्तीपासून ते सील माशापर्यंत प्रत्येक प्राण्याची शरीररचना बारकाईने पाहायला मिळते. तसेच पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजच्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम आहे. ते वापरत असलेल्या वस्तू तेथे पाहता येतात.

नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालय
मध्यवर्ती संग्रहालयाची स्थापना १८६३ साली झाली. यामध्ये प्रदर्शनीय वस्तूंची संख्या २८ हजार ८८७ आहे. या संग्रहालयाची विभागणी ऐतिहासिक अवशेष, कला-व्यवसाय, पुरातत्त्व, मानववंशशास्त्र, भूगर्भशास्त्र, निसर्ग, इतिहास या सहा मुख्य दालनांत केलेली आहे. कोरीव कामाच्या विविध वस्तू , ब्रह्मदेशातील कलाकृती, प्रागैतिहासिक ते आजपर्यंतच्या इतिहासाचा उलगडा करणारे पुरावशेष, देवटेक येथील अशोकाचा शिलालेख, नष्ट झालेल्या प्राण्यांचे अश्मीभूत अवशेष, भूगर्भातील रहस्यांचा उलगडा करणारे नमुने या सर्व वस्तू संग्रहालयात आपल्याला पाहता येतात.

 वेबसाइट : goo.gl/D9lLbtऔरंगाबाद येथील प्रादेशिक वस्तुसंग्रहालय
प्रादेशिक वस्तुसंग्रहालयाची स्थापना १९७९ साली झाली. ‘सोनेरी महाल’ या मुघलकालीन इमारतीत प्रदर्शनीय वस्तूंची संख्या १०५१ आहे. येथे धातुमूर्ती, काष्ठ-कोरीव काम, काच चित्रे, मृण्मय मूर्ती, शिल्प, नाणी, सचित्र पोथ्या अशा विविध वस्तू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रावबहादूर द. ब. पारसनीस यांनी संग्रहित केलेल्या ऐतिहासिक वस्तू व काही दुर्मीळ चित्रांचा संग्रह आहे.
 
माहूर वस्तुसंग्रहालय
माहूर वस्तुसंग्रहालयाची (ता. किनवट, जिल्हा नांदेड ) स्थापना १९८४ साली झाली. या संग्रहालयात प्रदर्शनीय वस्तूंची संख्या १,२५१ आहे. या संग्रहालयामध्ये वंजारी समाजाच्या दैनंदिन जीवनाची कल्पना देणाऱ्या वस्तू, तसेच मध्ययुगीन नाणी, शिल्पे पाहाता येतात.

तेर वस्तुसंग्रहालय
तेर वस्तुसंग्रहालयाची (ता. जि. उस्मानाबाद) स्थापना १९६७ साली झाली. या संग्रहालयात प्रदर्शनीय वस्तूंची संख्या २४ हजार ७३९ आहे.  या संग्रहालयातील वस्तू प्रामुख्याने तेर येथील जुन्या वसतीस्थानात सापडलेल्या आहेत. यांत मुख्यत: सातवाहनकालीन वस्तूंचा समावेश होतो. पाँपेई (दक्षिण इटलीतील प्राचीन नगरी ) येथे सापडलेल्या हस्तिदंताच्या स्त्रीमूर्तीशी साम्य असणारी हस्तिदंती स्त्रीमूर्ती येथे आहे. याशिवाय मृण्मय, शंख, अस्थी, हस्तिदंत, मौल्यवान दगड, धातू यांपासून तयार केलेल्या वस्तू, मध्ययुगीन शिल्पे या ठिकाणी आहेत.

कोल्हापूर वस्तुसंग्रहालय
कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाची स्थापना १९४६ साली झाली. या संग्रहालयात प्रदर्शनीय वस्तूंची संख्या १४६९ आहे. कोल्हापूर येथील ब्रह्मपुरी उत्खननात सापडलेल्या रोमन अवशेषांसाठी हे संग्रहालय प्रसिद्ध आहे. याशिवाय शस्त्र, शिलाहारकालीन शिल्पाकृती, नाणी, शिलालेख, चंदन व इतर प्रकारच्या लाकडावरील कोरीव काम, ऐतिहासिक व आधुनिक चित्रे, शिंगकाम अशा विविध वस्तू या संग्रहालयात जतन करून ठेवल्या आहेत.

सांगली वस्तुसंग्रहालय
सांगली वस्तुसंग्रहालयाची स्थापना १९७६ साली झाली. या संग्रहालयात प्रदर्शनीय वस्तूंची संख्या ९३० आहे. हे संग्रहालय ऐतिहासिक चित्रांसाठी ओळखले जाते. आधुनिक चित्रकारांच्या अप्रतिम चित्रकृती, कृष्णा नदीवरील पुलाची लाकडी प्रतिकृती, विविध पुतळे, संगमरवरी, हस्तिदंती व लाकडी कलाकृती आणि कोरीव कामे या वस्तुसंग्रहालयात आहेत.

श्री भवानी चित्रसंग्रहालय, औंध, (जि. सातारा)
श्री भवानी चित्र-संग्रहालयाची स्थापना १९३८ साली झाली. या संग्रहालयात प्रदर्शनीय वस्तूंची संख्या ५०५२ आहे. विविध प्रदेशांत निर्माण झालेली व त्या त्या प्रदेशाची वैशिष्ट्ये सांगणारी ऐतिहासिक व पौराणिक चित्रे, संगमरवरी शिल्पे, कोरीव काम केलेल्या धातूच्या व लाकडाच्या वस्तू, पेंढा भरलेले प्राणी, जुनी घड्याळे, हस्तिदंती कोरीव वस्तू या संग्रहालयात आहेत. याशिवाय समृद्ध असा स्वतंत्र बालविभागही येथे आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा
श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची स्थापना १९७० साली झाली. या संग्रहालयात प्रदर्शनीय वस्तूंची संख्या १४९२ आहे. हे संग्रहालय मराठाकालीन वस्तूंनी समृद्ध  आहे. यात मुख्यत: शस्त्रे, वस्त्रे, चित्रे, शिलालेख, संरक्षण चिलखते, मराठाकालीन कागदपत्रे यांचा समावेश आहे. राग–रागिणी, दरबारातील प्रसंग, राजवाड्यातील जीवन, ऐतिहासिक व्यक्तींची चित्रे, सिंहासन वगैरे या संग्रहालयात आपल्याला पाहता येते.


चंद्रकांत मांढरे कलासंग्रह, कोल्हापूर
या  कलासंग्रहामध्ये ४९६ प्रदर्शनीय वस्तू आहेत. या संग्रहालयामध्ये ख्यातनाम चित्रकार चंद्रकांत मांढरे यांनी चितारलेल्या वैविध्यपूर्ण कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत. तसेच जलरंग, तैलरंग, पावडर शेडिंग या विविध प्रकारच्या रंगछटांच्या माध्यमांतून व विविध विषयांवर निर्माण केलेल्या चित्रकृती येथे पाहता येतात. मांढरे यांची तैलरंगातून पारदर्शकता निर्माण करण्याची हातोटी विशेष उल्लेखनीय असून, ती येथे अनुभवता येते.

राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे
२० हजारांहून अधिक पेंटिंग्ज, असंख्य पुरातन वस्तूंचा संग्रह पुण्यातील या संग्रहालयात आहे. यात नऊ दालने, ४० विभाग आहेत. पुण्यात मध्यवर्ती भागात हे वस्तुसंग्रहालय आहे. गुजरात, राजस्थान, कर्नाटक, केरळ अशा ठिकठिकाणच्या लाकडी पेन-दौती, धातू, लाकूड व हस्तिदंतावरील कोरीव काम, ऐतिहासिक चित्रे, धातू व पाषाण शिल्पे, वाद्यांचे प्रकार, विविध प्रकार–आकाराचे अडकित्ते, शाईच्या दौती इत्यादी दैनंदिन जीवनातील पूर्वीच्या काळी वापरात असलेल्या वस्तू या संग्रहामध्ये पाहायला मिळतात. तसेच महिलांशी संबंधित वस्तूंची स्वतंत्र विभागात मांडणी केलेली असून, यातून सांस्कृतिक ठेवा, परंपरा यांचे जतन केले आहे. या संग्रहालयाची मालकी १२ एप्रिल १९७५ रोजी महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्त्व खात्याकडे सोपवली गेली.
वेबसाइट : goo.gl/9exDgW

आदिवासी संग्रहालय, पुणे
आदिवासी संग्रहालय हे पुणे रेल्वे स्थानकाजवळ आहे. या संग्रहालयामध्ये भारतातील अनेक आदिवासी जमातींबद्दलची माहिती दिलेली आहे. सर्व आदिवासी, तसेच आदिवासींच्या वापरात असलेल्या वस्तू, हुबेहुब उभे केलेले त्यांच्या जीवनातील प्रसंग, छायाचित्रे, पुस्तके येथे पाहण्यास मिळतात.
(लेखातील काही माहिती मराठी विश्वकोशातून घेतली आहे.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Pritam salunke About 261 Days ago
Mala he post khup avadli
3
0
Pritam salunke About 283 Days ago
Mala he post kuph avdli
6
0
yashpatil16320@gmail.com About 329 Days ago
Ok
7
0
चव्हाण पुजा About
मला अजुन १५ संग्रहालयाची माहिती पाहिजे
32
2

Select Language
Share Link
 
Search