Next
कागदी पिशव्यांचा ‘राजवाडी पॅटर्न’
संदेश सप्रे
Monday, December 31, 2018 | 12:17 PM
15 1 0
Share this story

देवरुख : राज्यात यंदा प्लास्टिकबंदी लागू झाली आणि कापडी व कागदी पिशव्यांची मागणी वाढली. त्यामुळे या पिशव्यांच्या उत्पादनाला पुन्हा चालना मिळाली. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी गावातील महिला बचत गट गेली पाच वर्षे म्हणजे २०१३पासून कागदी पिशव्या बनविण्याचे काम करीत आहेत. वर्षाकाठी एक लाख कागदी पिशव्यांची विक्री होत असून, त्यातून या महिलांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे. त्यामुळे कागदी पिशव्यांचा राजवाडी पॅटर्न तयार झाला आहे. लोकसक्षमीकरण चळवळ (पेम) या संस्थेने हे घडवून आणले आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गापासून हाकेच्या अंतरावर वसलेले राजवाडी संगमेश्वर तालुक्यातील पाच वाड्यांचे आणि सुमारे ७२५ लोकसंख्येचे गाव. गावातील १७३ कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. गेल्या १० वर्षांत गावात ‘पेम’ नावाची संस्था कार्यरत झाली आणि या छोट्याशा गावाचा कायापालट होऊ लागला. गावातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘पेम’चे अध्यक्ष सतीश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली १० बचत गटांची स्थापना करण्यात आली. विविध योजना हाती घेण्यात आल्या. दोन बचतगटांनी कागदी पिशव्यांचा उपक्रम सुरू करून स्वयंरोजगाराचा नवा मार्ग निर्माण केला आहे. 

२०१३मध्ये राज्यात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आली होती. त्या वेळी दुकानदार कॅरीबॅगला पर्याय शोधू लागले होते. ती गोष्ट लक्षात घेऊन भाग्यलक्ष्मी आणि राधाकृष्ण या दोन बचत गटांना कामत यांनी कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच, दोन्ही गटांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देऊन सात शिलाई मशीन्स घेऊन देण्यात आली. भाग्यलक्ष्मी गटातील १०, तर राधाकृष्ण गटातील ११ महिलांनी हे काम सुरू केले. 

पिशव्या बनविण्यासाठी रद्दी मिळण्याकरिता कामत यांनी नियमित वृत्तपत्रे घेणाऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यातून रद्दी मोफत उपलब्ध झाली. अशा तऱ्हेने पिशव्या बनविण्याचा व्यवसाय. एक महिला सुरुवातीला प्रति दिन ५० पिशव्या तयार करते आणि हळूहळू कौशल्य प्राप्त केल्यावर ही संख्या १००वर जाते. या हिशेबाने आठवड्याला ७०० आणि महिन्याला सरासरी अडीच हजार पिशव्या तयार होतात. 

रत्नागिरी, तसेच संगमेश्वरातील व्यापाऱ्यांशी कामत यांनी चर्चा केली. त्यामुळे त्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून या पिशव्यांना बाजारपेठ उपलब्ध झाली. गावातील संतोष भडवळकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणेश सुर्वे यांच्यासह सर्वच जणांचा या महिलांना पाठिंबा मिळाला.

सतीश कामत म्हणाले, ‘रद्दी मोफत मिळाली, तर शेकडा पिशव्यांमागे ३२ ते ३५ रुपये फायदा होतो. तीच रद्दी आम्ही विकत घेतली, तर सात ते आठ रुपये कमी होतात. तरीही २५ रुपये फायदा कमी नाही. आता पुन्हा प्लास्टिकबंदी झाली आणि मागणी वाढली आहे. त्यामुळे व्यवसायाचे गणित बदलले आहे. यातून प्रत्येक महिलेला दरमहा घरबसल्या किमान तीन हजार रुपयांपेक्षा अधिक प्राप्ती होत आहे.’ 

‘पहिल्या तीन वर्षांत राजवाडीतील महिलांनी एक लाख कागदी पिशव्यांची विक्री केली. गेली दोन वर्षे प्रति वर्षी एक लाख पिशव्यांची विक्री होत आहे. या उपक्रमाला दरमहा दोनशे किलो रद्दी लागते. या महिलांना मदत म्हणून नाममात्र दरात रद्दी देण्यास जिल्ह्यातून कोणी इच्छुक असेल, तर रद्दी आणण्याचे नियोजन करता येईल,’ असेही कामत यांनी सांगितले.

संपर्क : सतीश कामत - ९८६०८ ३७३९७
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sumukh Aroskar About 80 Days ago
Need to extend market this type of business In atlest Maharshtra, and other diffrent districts near Maharshtra this business is quite limited need to extend ( My personal thinks)
0
0

Select Language
Share Link