Next
टॅक्सी ड्रायव्हरने उभारल्या शाळा
BOI
Wednesday, April 19, 2017 | 05:00 PM
15 3 0
Share this article:

गाझी जलालुद्दीनकोलकाता : इच्छा असेल, तर मार्ग सापडतो, या म्हणीचे चालतेबोलते उदाहरण म्हणजे ६३ वर्षीय गाझी जलालुद्दीन. लहानपणी त्यांना शाळा आवडायची. ते उत्साहाने पहिलीत दाखल झाले. दुसरीत ते पहिले आले. त्यांना पुढेही खूप शिकायचे होते; पण गरिबीमुळे त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे शिक्षण थांबवले.

घरी रोज पोट भरणे मुश्कील झाल्यामुळे गाझी कोलकात्यात येऊन भीक मागू लागले. काही वर्षांनी ते कोलकात्यात रिक्षा हाताने ओढू लागले. ही रिक्षा ओढत असतानाच त्यांच्या मनात, गावातील मुलांच्या शिक्षणाची सोय करायची या स्वप्नाने आकार घेतला. १९७७ मध्ये अठरा वर्षांचे असताना गाझी टॅक्सी चालवायला शिकले. टॅक्सी चालवत असतानाच त्यांनी गरीब मुलांना पुस्तकांचे वाटप सुरू केले. हा उपक्रम त्यांनी वीस वर्षे कायम ठेवला. ते त्यांच्या टॅक्सीत बसणाऱ्या प्रवाशांना शैक्षणिक कामासाठी देणगी देण्याचे आवाहन करतात. त्याला बरेच प्रवासी प्रतिसाद देतात.

पश्चिम बंगालच्या सुंदरनगर विभागातील जॉयनगरनजीकचे ठाकूरचाक हे त्यांचे गाव. जंगलांमुळे हा भाग दुर्गम आहे. गाझी यांनी शैक्षणिक निधीसाठी काही अभिनव मार्ग अवलंबले. दहा सदस्यांची समिती स्थापून त्यांनी गावाकडील बेरोजगार तरुणांना टॅक्सी चालवण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. या तरुणांना काम मिळाल्यानंतर तेदेखील इतरांना गाडी चालवण्यास शिकवतील, त्यांना मिळणारे काही पैसे शैक्षणिक कामासाठी वर्षातून एकदा तरी देतील, असा उद्देश यामागे होता. तो साध्य झाला. त्यांच्याकडून नियमित पैसे मिळू लागले. सध्या जॉयनगर भागातील सुमारे ४०० तरुण कोलकात्यात टॅक्सी चालवतात. 

गाझी यांनी त्यांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने पहिले पाऊल १९९८मध्ये टाकले. त्यांनी या वर्षी ठाकूरचाक गावात त्यांच्या बचतीच्या पैशातून दोन खोल्या बांधल्या. त्यातील एका खोलीत त्यांनी शाळा सुरू केली. त्यांची शाळा २२ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांनिशी सुरू झाली. विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश आणि अन्न या सुविधा मोफत दिल्या जात होत्या. ही शाळा लोकप्रिय झाली. अधिकाधिक विद्यार्थी नाव नोंदवू लागले. गाझी यांच्या अख्ख्या कुटुंबाने शाळेच्या कामाला वाहून घेतले आहे. याच वेळी गाझी यांच्या एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे अनेक विद्यार्थी अनाथ आहेत. साधनसामुग्री अपुरी असल्याने त्यांच्यासाठी आपल्याला काही करता येत नाही. 

गाझी यांना २००६मध्ये एका व्यक्तीने ठाकूरचाक गावात सहा बिघे जमीन दिली. त्या जागेत त्यांनी आणखी एक शाळा बांधली. ही शाळा २००९मध्ये सुरू झाली. आता या दोन्ही शाळांमध्ये मिळून १६ शिक्षक, सहा कर्मचारी आणि सुमारे ४०० विद्यार्थी आहेत. त्यांनी अनाथालय बांधण्याचे स्वप्नही २०१६मध्ये पूर्ण केले. या अनाथालयामुळे परिसरातील अनाथ बालकांना हक्काचे ठिकाण मिळाले. बचतीच्या पैशांतून आणि प्रवाशांनी दिलेल्या मदतीतून गाझींनी त्यांचे स्वप्न साकार केले. 

माध्यमिक शाळेचे स्वप्न

गाझी म्हणतात, ‘मी प्रवाशांना नेहमी सुंदरबनच्या शैक्षणिक कामात सहभागी होण्याची विनंती करतो. माझी शिक्षणाची संधी गरिबीमुळे हुकली, तशी ती कोणाची हुकू नये हा एकमेव उद्देश माझ्या धडपडीमागे आहे.’ गाझी यांच्या डोळ्यात आता सुंदरबनमध्ये माध्यमिक शाळा बांधायचे स्वप्न तरळत आहे.
 
15 3 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search