Next
सहजीवन..
BOI
Sunday, February 04, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story


कोणतीही दोन आयुष्यं एकत्र येतात तेव्हा तक्रारी, मतभेद, भांडणं हे होणारच, हे सगळं आपल्याला ठाऊक असतं; पण ते आपण इतकं गृहीत धरतो, की त्यात आपल्या आयुष्याची किती वर्षं, किती ऊर्जा नात्यांमधला कलह कायम ठेवण्यात आपण घालवतो हे तपासतच नाही... वाचा ‘हॅशटॅग (##) कोलाज’मध्ये...
......................
‘दीदी वंदना को शायद हार्ट अॅटॅक आया है, हॉस्पिटल में लेकर गये है सुबह सुबह पाच बजे...’ शिरीन घाबरून सांगत होती आणि मी खाडकन जागी झाले. सकाळचे पावणे ठ वाजत आले होते. शनिवारचा सुट्टीचा दिवस म्हणून मी अजूनही बिछान्यात लोळत पडले होते. आमच्याच इमारतीच्या आठव्या मजल्यावर वंदनाचं कुटुंब राहतं. साधारण तिशीच्या आत-बाहेरची वंदना. सहा वर्षांच्या एका अपत्यानंतर चार दिवसांपूर्वीच तिने एक चिमुकलीला जन्म दिला होता. सिझेरियन झाले होते. कालच तिला घरी आणले होते आणि आज एकदम पुन्हा हॉस्पिटलची पायरी...

शिरीनच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती दिसत होती आणि तिचा स्वर रडवेलासा होता. ही बातमी ऐकताच डोळे उघडण्याच्या पलीकडे कसलीच दाद न मिळाल्याने आणि माझ्या पेंगुळलेल्या अवस्थेला पाहून ती पुन्हा हॉलकडे वळली. एका अस्वस्थ बातमीने सकाळ व्हावी इतकं उदासवाणं इतर काहीच नसतं; पण तिला हॉस्पिटलमध्ये नेलंय तर फार काही काळजीचं कारण नाही, असं निगरगट्टपणे स्वत:लाच समजावलं आणि आणखी पंधरा मिनिटे लोळण्यासाठी स्वत:ला एक कारण दिलं. खरं तर हा शुद्ध निर्लज्जपणा आणि निर्ढावलेपणा होता हे कळत होतं, तरीही उठण्याची इच्छा होत नव्हती. पहिल्याच मजल्यावर घर असल्याने आवाज येत होतेच. शेवटी उठलेच. तेवढ्यात शिरीन पुन्हा धावत आली, ‘दीदी वंदना नही रही...’ मनात धस्स झालं. चार दिवसांत वंदनाची चिमुकली आईविना झाली होती. एकदम कसंसंच झालं. मम्मी-पप्पा दोघेही सोसायटीतील लोकांबरोबर बाहेरच होते.

थोड्याच वेळात अॅम्ब्युलन्स आली. तोपर्यंत तशी मी बरीच स्थिर होते. खाली जायची हिंमत झाली नाही. म्हणून खिडकीतून डोकावून पाहिलं, तर वंदनाचं निपचित पडलेलं शरीर गाडीतून बाहेर काढण्यात येत होतं. तिचे मिटलेले डोळे आणि काळवंडलेले ओठ नजरेस पडले, तेव्हा शरीरातील चैतन्य हरवणं म्हणजे काय हे कळत होतं. अॅम्ब्युलन्समधून स्ट्रेचर बाहेर काढणाऱ्या लोकांमध्ये वंदनाचा नवरा होता. अवेळी, अचानकपणे आपला जोडीदार हरवलाय हे अजूनही त्याला पटत नसावं. त्याच्या डोळ्यांत शून्य भाव होते. थकून गेल्यामुळे तो एकदमच दुप्पट वयाचा दिसत होता. सहजीवनाच्या सुरुवातीच्याच टप्प्यात जोडीदार गमावणे, या जाणिवेने पोटात गोळाच आला. त्याच्या अन् मुलांच्या आयुष्यात या एकाएकी आलेल्या रितेपणाने जास्त कासावीस केले. नवा अंकुर उमलवून घरभर आनंद देणारी ती आता अनंतात विलीन झाली होती.

नंतर कळलं, तिला हार्ट अॅटॅक आलाच नव्हता. बाळंतीण झाल्यापासून तिला सर्दी झाली होती. त्यामुळे श्वसनाला त्रास होत होता. घरी आणल्यापासून तो त्रास बळावला. रात्रीत तो वाढला असावा अन बहुधा झोपेतच... हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच.. वंदनाच्या शेजाऱ्यांनी हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच तिची नाडी तपासली होती. ठोका ऐकू न आल्याने सर्वांचे ठोके चुकले आणि तिला भल्या पहाटे डॉक्टरांकडे नेण्यात आलं. तिला नेमका काय त्रास झाला असावा किंवा नेमके निमित्त काय याला आता फारसं महत्त्व नव्हतं. ती उरली नाही हे इतकंच वास्तव होतं.

वास्तव भीषण होतं. माणसाच्या आयुष्याची क्षणभंगुरता सिद्ध होत होती. नाही म्हटलं तरी येणारा माणूस जाणारच; पण असं अचानकपणे जोडीदाराला एकटं टाकून, मुलांना पोरकं करून...? सहजीवनाच्या आणि भवितव्याच्या असंख्य स्वप्नांच्या सरणावर ती जळणार होती आणि तो तर तिच्याशिवाय आत्ताच बराच म्हातारा दिसत होता. मम्मी सांगत होती, गेल्या वर्षी वंदनाचे वडील गेले, तेव्हा तिचा लहानगा म्हणाला, ‘आता येणाऱ्या वाढदिवसाला आजोबा नसणार, मग आजी पण मरणार, एक दिवस आईपण आणि बाबापण. मग माझा वाढदिवस कोण साजरा करणार.?’ या प्रश्नाने बेचैन होऊन त्यांनी दुसरा चान्स घेतला होता. मुलाला कोणीतरी भाऊ-बहीण असावं म्हणून. आपण नसल्यावर एकमेकांना ते असावेत म्हणून. आता खरंच तसं झालं होतं.

वंदनाला न्हाऊ घालण्यात आलं. साडी-चोळी करण्यात आली. सुवासिनीचे सगळे सोपस्कार झाले. साडेअकरा वाजता तिला वैकुंठात नेण्यात येणार होतं. अॅम्ब्युलन्स तयारच होती. एका मागोमाग एक गाड्या सोसायटीच्या बाहेर पडू लागल्या. तिच्या मुलाला घेऊन आजी इमारतीच्या खालीच उभी होती. आपलं सगळं दु:ख आणि अश्रू लपवून ती माऊली आपल्या लेकीला निरोप देत होती. तितक्यात वंदनाचा मुलगा म्हणाला, ‘आजी आईला कुठे घेऊन जात आहेत..?’ आजीला गलबलून आलं. वेळ मारून नेण्यासाठी, ‘आईला बरं वाटत नव्हतं ना म्हणून जरा बाहेरगावी नेत आहेत.’ असं काहीतरी उत्तर आजीने दिलं. त्यावर त्या छोट्याचा प्रश्न तयारच होता, ‘मग कधी येणार आई.?’ आजीने कसं तरी उत्तर दिलं, ‘येईल थोड्या दिवसांत.’ उत्तराने मुलाचं समाधान झालं नव्हतं; पण सगळा गंभीर प्रसंग त्याला काहीतरी सुचवत होता म्हणून तोही शांत झाला. त्याच्याकडे पाहण्याची इच्छाच झाली नाही. वंदनाची पोरगीसुद्धा आईचा शांतपणे निरोप घेत असावी. त्यामुळे इतक्या वेळेत ती रडलीसुद्धा नाही.

दोन-तीन दिवसांनी मम्मी सांगत होती. वंदनाचा मुलगा सतत विचारत असतो, आई कधी येणार आहे ते. लहान मुलांना भुलवणं सोपं असतं असं वाटून प्रत्येक वेळी काहीतरी उत्तर दिलं जातं. परवा हट्टच करून बसला, ‘शेजारच्या सगळ्या मुलांची आई आहे, मग माझी कुठे.?’ यावर, ‘तू मोठा झाला ना, की येणार आई’, असं उत्तर त्याला कोणी तरी दिलं. मग ‘मी लगेच मोठा होतो ना, सांग कसा मोठा व्हायचं ते’... तो त्याच्या बाबाला त्रास देत राहिला. कोणाकडेच उत्तर नव्हतं. अजून तर पुढे जाऊन मुलीला पडणाऱ्या प्रश्नांचीही उत्तरं ठरवायची होती. पोरांपुढे घर हबकून गेलं होतं.

आयुष्यातील प्रत्येक क्षण किती अमूल्य आहे, हे परत परत अधोरेखित होत होतं. कधी कोणाचा डाव संपेल, हे नियतीलाच ठाऊक असणार याहून विचित्र काहीच नाही. आपण हतबल आहोत. त्या क्षणी वाटत होतं, जी जोडपी आपल्या संसारात आनंद निर्माण करत नाहीत.. सतत भांडत असतात.. कुरकुरत असतात.. जोडीदाराची उणीदुणी काढण्यात मग्न असतात. अशांची कीव येते. का माणसं इतकी असमाधानी असतात..? आणि असमाधानीच असतात, तर मग विभक्त होऊन एकमेकांच्या वाटा सुकर का नाही करत..? तसं करायचं नसेल तर वेळीच एकमेकांचं आयुष्य सुखकर का करत नाहीत..?

वैवाहिक, सांसारिक जीवनात आयुष्यभर एकत्र राहून एकमेकांचे शत्रू असल्यासारखं एकमेकांचा छळ करायचा, याला काय अर्थ..? कोणतीही दोन आयुष्यं एकत्र येतात तेव्हा तक्रारी, मतभेद, भांडणं हे होणारच, हे सगळं आपल्याला ठाऊक असतं; पण ते आपण इतकं गृहीत धरतो, की त्यात आपल्या आयुष्याची किती वर्षं, किती ऊर्जा नात्यांमधला कलह कायम ठेवण्यात आपण घालवतो हे तपासतच नाही. नात्यात नेहमीच असंतोष ठेवणाऱ्या लोकांची चीड आली. हे काही नवरा-बायकोचंच असं नव्हे, ही कोणत्याही नात्यातली समस्या असू शकते. आपली नाती ताणताना, आयुष्याचा वाटेकरी जगात कुठेच सापडणार नाही याची एकदा कल्पना करून पहायला हवी, म्हणजे कळेल वंदनाच्या घरातलं रितेपण आणि आपल्याकडे आयुष्याला जगण्याची असणारी संधी यातला नेमका फरक...

- हिनाकौसर खान-पिंजार
ई-मेल : greenheena@gmail.com

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

(दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘हॅशटॅग कोलाज’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/zHfVVt या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Deepa pillay pushpakanthan About
Ekmekanchi uni duni kadhat natyatli sundartA harvun jate n apn sagla gamavun basloy he samjta tevha khup ushir jhalela asto
1
0
Pooja Deshpande About
Very nice
1
0
rohini About
Nice
1
0

Select Language
Share Link