Next
‘सरकारने मूलभूत गरजांवर खर्च करावा’
प्रेस रिलीज
Tuesday, May 22, 2018 | 02:20 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘मेट्रो आणि मोनोरेल आदी सुविधा देण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारने आरोग्य आणि शिक्षण अशा मूलभूत गरजांवर खर्च करावा,’ अशी अपेक्षा मुंबई येथील केईएम रूग्णालयाचे अधिष्ठता डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केली. मनोविकास प्रकाशन, जन आरोग्य अभियान आणि पुना सिटीझन–डॉक्टर फोरम यांच्यातर्फे आयोजित ‘सर्वांसाठी आरोग्य’ या चर्चासत्रात ते बोलत होते.

या वेळी मनोविकास प्रकाशनतर्फे आरोग्य कार्यकर्ता म्हणून परिचित असलेल्या डॉ. अनंत फडके लिखित ‘सर्वांसाठी आरोग्य? होय शक्य आहे!’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सुपे आणि दोंडाईचा येथील ज्येष्ठ शैल्यविशारद व असोसिएशन ऑफ रुरल सर्जन्स ऑफ इंडियाचे संस्थापक व माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र टोणगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

‘सर्वांसाठी आरोग्य’ या विषयावर झालेल्या चर्चासत्रात बोलताना डॉ. सुपे म्हणाले की, ‘आज आपल्या देशात सार्वजनिक वाहतूक आणि इतर विषयांसाठी पैसे खर्च करण्याची सरकारची तयारी असलेली दिसून येते; मात्र हेच सरकार सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षण यांकडे सोयीस्कररीत्या कानाडोळा करीत असल्याचे पहायला मिळते. ही परिस्थिती बदलने आज महत्त्वाचे आहे. याबरोबरच तमिळनाडूसारख्या राज्यात तीन रुपये किंमतीचे औषध सरकार आठ पैशांना उपलब्ध करून देत असलेले आपण पाहतो. हे मॉडेल लक्षात घेत इतर राज्यातील सराकरनेही त्याचे अनुकराण करावे जेणेकरून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न काही अंशी सुटायला मदत होईल.’       

‘आज बाजारात रोज नव्याने अनेक लस येत असतात; मात्र रुग्णांना त्या लसींची उपयुक्तता किती प्रमाणात आहे व त्या लसींचा फायदा नेमका कोणाला होऊ शकतो याचा विचार न करता ती लस रुग्णांना देण्याचा आग्रह डॉक्टरांनी धरणे बरोबर नाही,’ असे मत डॉ. टोणगावकर यांनी व्यक्त केले.

डॉ. फडके म्हणाले, ‘जेनरिक औषध म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात भांडणे लावण्याचा प्रकार आहे. मी स्वत: या जेनेरिक औषधांचा पुरस्करता असूनही मी ती रुग्णांना लिहून देत नाही. कारण कोणत्याही औषध दुकानात जेनरिक नावांनी ती औषधे उपलब्धच नाहीत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने औषधांचे ‘ब्रॅंड’ बंद करून जेनरिक नावांनी औषधे बाजारात आणण्यात सरकारने पुढाकार घ्यावा, असे मला वाटते.’

या वेळी डॉ. श्रीराम गीत, उल्हास सावंत यांनी पाहुण्यांशी संवाद साधला. अरविंद पाटकर यांनी प्रस्तावना केली. डॉ. अभिजित मोरे यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search