Next
पाठ्यपुस्तकांचे आधुनिक रूप
BOI
Wednesday, April 18, 2018 | 07:00 PM
15 0 0
Share this storyमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीने नुकतीच दहावी इयत्तेची नवी पुस्तके प्रकाशित केली. यंदाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये कालसुसंगत असे अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. ‘क्यूआर कोड’सारख्या गोष्टींच्या वापरामुळे मुलांना अधिक माहितीसाठी इंटरनेटवरील नेमक्या ठिकाणी जाता येणार आहे. गणितासारख्या विषयात ‘जीएसटी’सारख्या ताज्या विषयाची माहिती देणारा संपूर्ण धडा समाविष्ट करण्यात आला आहे. आधुनिक रूपाच्या या पाठ्यपुस्तकाच्या वैशिष्ट्यांचा आकाश गुळाणकर यांनी घेतलेला हा आढावा...

............

पुस्तक डाउनलोड करण्यासाठीचा पहिल्या पानावरचा क्यूआर कोड
क्यूआर कोड 

पाठाच्या शेवटी दिलेले उपक्रम आणि क्यूआर कोडदहावीच्या पाठ्यपुस्तकांच्या अगदी पहिल्याच पानावर एक क्यूआर कोड देण्यात आला आहे. हा क्यूआर कोड विद्यार्थ्यांनी दीक्षा अॅपच्या माध्यमातून स्कॅन केल्यावर त्यांना ते पाठ्यपुस्तक डिजिटल स्वरूपात उपलब्ध होईल. त्याचबरोबर प्रत्येक पाठाच्या शेवटीदेखील एक क्यूआर कोड देण्यात आलेला आहे. हा कोड त्यांना पाठातील संकल्पना समजून घेण्यासठी मदत करणाऱ्या माहितीपर्यंत नेऊन पोहोचवेल. सध्या तरी हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असल्याचे दिसत नाही; पण ‘क्यूआर कोड स्कॅनर’च्या माध्यमातून हा कोड स्कॅन केल्यावर तो आपल्याला https://diksha.gov.in/ या सरकारी संकेतस्थळावर घेऊन जातो. यावर दिलेल्या माहितीनुसार या संकेतस्थळाचे काम अजून सुरू आहे. त्यावर शैक्षणिक विकासासाठीचा व माहिती देणारा मजकूर नियमितपणे दिला जाणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालय  व नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे संकेतस्थळ शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणार आहे. 


याविषयी ‘बालभारती’मधील अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘मागील वर्षी आम्ही यू-ट्यूबवरील लिंक व इतर तयार कंटेंटच्या लिंक पुस्तकांमध्ये दिल्या होत्या; मात्र या वर्षी हा सर्व ‘डिजिटल कंटेंट’ आम्ही स्वतः तयार करत आहोत. राज्यभरातील काही निवडक टेक्नोसॅव्ही शिक्षकांना एकत्र आणून त्यांच्याकडून या कंटेंटच्या निर्मितीचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये व्हिडिओज, अॅनिमेशनसोबतच काही अॅक्टिव्हिटीजचादेखील समावेश असणार आहे.

‘यंदापासून दीक्षा नावाचे एक वेगळे अॅप हा सर्व कंटेंट पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. अंदाजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे अॅप लाँच करण्यात येणार आहे. यामध्ये एफएक्यू (वारंवार विचारले जाणारे प्रश्न), चौकशी व वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीज देण्यात येणार आहेत. या अॅपसाठीचा सर्व कंटेंट साधारण १५ जूनपर्यंत उपलब्ध करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,’ असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पहिली, आठवी व दहावीच्या नव्या पुस्तकांमध्ये क्यूआर कोड देण्यात आलेले असून, इतर सर्व इयत्तांच्या पुस्तकाच्या पुनर्मुद्रित आवृत्तीमध्येसुद्धा क्यूआर कोड देण्यात आलेले आहेत. 


अॅपसाठीचा कंटेंट तयार करणाऱ्या शिक्षकांच्या समन्वयक असलेल्या सायली चौगुले म्हणाल्या, ‘आम्ही या शिक्षकांना तांत्रिक सहकार्य आणि विषयतज्ज्ञांच्या साह्याने मदत करतो. तीन-चार दिवसांच्या कार्यशाळांच्या माध्यमातून आम्ही त्या शिक्षकांना माहिती देतो व त्यानंतर ते आपल्या घरून कंटेंट निर्मितीचे काम करतात. डिसेंबर महिन्यापासून या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, जूनपर्यंत पहिल्या सत्राचे काम पूर्ण होईल.’ तसेच या सर्व कंटेंटचा ‘बालभारती’कडून आढावा घेतला गेल्यानंतरच तो सर्व्हरला अपलोड करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 


पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, स्मार्टफोन व इंटरनेटचे तंत्रज्ञान आजच्या विद्यार्थ्यांच्या परिचयाचे आहे. त्याच साधनांचा वापर त्यांनी शिकण्यासाठी करावा या हेतूने पुस्तकात अनेक नवे भाग समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे त्यांना केवळ लिखित स्वरूपातून नाही, तर दृकश्राव्य माध्यमातूनदेखील बरीच माहिती मिळेल व पर्यायाने शिकणे सोपे होईल. यामध्ये एकूण सात वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यातील काही उजळणीकरिता आहेत, काही प्रॅक्टिकलच्या माध्यमातून शिकण्यासाठी आहेत, तर काही गोष्टी विद्यार्थ्यांना विचार करायला भाग पाडणाऱ्या अशा आहेत. या नव्या भागांची थोडी माहिती घेऊ या.उजळणी 

प्रत्येक पाठाच्या सुरुवातीलाच ‘थोडे आठवा’ हे सदर आहे. विद्यार्थ्यांना एखादा मुद्दा सुरू करण्याआधी त्याची पार्श्वभूमी कळेल अशा पद्धतीचे प्रश्न त्यात विचारण्यात आलेले आहेत. ‘सांगा पाहू’ हे सदर एखादी संकल्पना शिकून झाल्यावर त्याची अधिक माहिती मिळवून देणारे आहे, असे म्हणता येईल. त्यातील प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांचे त्या विशिष्ट संकल्पनेबद्दलचे ज्ञान वाढवतील असेच प्रश्न त्यात आहेत. 
कृतींतून शिका
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना कृतींतून गोष्टी शिकता याव्यात, याकरिता ‘निरीक्षण व चर्चा करा’ आणि ‘करून पाहा’ या दोन सदरांचा समावेश करण्यात आलेला आहे. ‘निरीक्षण व चर्चा करा’ याचा उपयोग मुलांनी माहिती जमा करावी व त्यावर चर्चा करून त्यांना जास्तीत जास्त ज्ञान मिळावे असा हेतू त्यातून दिसतो. ‘करून पाहा’ या सदरांतर्गत प्रयोगांचा समावेश करण्यात आलेला आहे. धड्यांच्या मध्येच प्रयोगांचे एकत्रीकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे ते वेगळे वाटत नाही. 

मेंदूला चालना 

‘जरा डोके चालवा’, ‘शोध घ्या’ व ‘विचार करा’ या सदरांचे नियोजन मेंदूला चालना देण्यासाठी करण्यात आल्याचे दिसते. यामध्ये नुकत्याच शिकून झालेल्या संकल्पनांबाबत अधिक विचार करण्यास, त्याची माहिती जमविण्यास व वाचण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. 

‘इंटरनेट माझा मित्र’ 

या सदरात स्वतःहूनच विद्यार्थ्यांनी इंटरनेट वापरावे व माहिती पाहावी, वाचावी हा हेतू दिसतो. तसेच इतरही अनेक नवनव्या सदरांतून विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक अशी माहिती देण्यात आली आहे. वरील सदरांसोबतच पाठातील संकल्पनांशी संबंधित शास्त्रज्ञांची व त्यांच्या कामाची माहितीदेखील पुस्तकांत देण्यात आलेली आहे.जीएसटी – फायनान्शियल प्लॅनिंग 

गणिताच्या पुस्तकात अन्य धड्यांसोबतच मध्यात दिलेला फायनान्शियल प्लॅनिंगचा धडा अनुक्रमणिकेत लगेच लक्ष वेधून घेतो. देशाची संपूर्ण कररचना बदलणारा नवा निर्णय केंद्र सरकारने जुलै २०१७मध्ये घेतला आणि जीएसटी नावाचा एकच कर देशभरात लागू केला. त्याबाबत सामान्यांमध्ये अजूनही पुरेशी जागरूकता नसल्याचे किंवा पुरेशी माहिती नसल्याचे चित्र पाहायला मिळते. हीच गोष्ट लक्षात घेऊन कदाचित या प्रकरणाचा समावेश करण्यात आल्याचे दिसते. या प्रकरणात ‘जीएसटी’बद्दल गरजेची तेवढी प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे. शिवाय अभ्यास म्हणून सोडविण्यासाठी देण्यात आलेल्या उदाहरणांमध्येदेखील जीएसटी मोजणे व त्या संदर्भातीलच आकडेमोडीचा समावेश करण्यात आला आहे. याचा फायदा जीएसटी ही संकल्पना समजण्यासाठी केवळ लहान मुलांनाच नाही, तर त्यांच्या आई-वडिलांनासुद्धा होईल असे वाटते.  

याचबरोबर पुस्तके रंगीत करण्यात आलेली असून, उत्तम प्रकारे डिझाइन करून ती आकर्षक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चांगली रंगसंगती, फोटो व निरनिराळी चित्रे यांच्या माध्यमातून पुस्तके विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आकर्षक करण्यात आली आहेत. 

(या नव्या पाठ्यपुस्तकांची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link