Next
‘गाळ्यांच्या ई-लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरू’
BOI
Wednesday, July 11, 2018 | 05:38 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : ‘शासनाच्या सूचनेनुसारच सोलापूर महापालिकेच्या सर्व गाळ्यांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, पाणीपुरवठा विभागाकडून नळ जोडणीच्या ठिकाणी लवकरच स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहे,’ अशी माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

‘गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेत कोणताही बदल करण्यात येणार नाही. त्यासाठी आवश्‍यक कार्यवाहीचा मसुदा तयार झाला असून, येत्या आठ ते दहा दिवसांत ही प्रक्रिया सुरू होईल,’ असेही त्यांनी या वेळी सांगितले.  

डॉ. ढाकणे म्हणाले, ‘महापालिकेच्या मालकीच्या मेजर व मिनी अशा एक हजार ३८६ गाळ्यांची लिलाव प्रक्रिया केली जाणार आहे. गाळेधारक, व्यापारी व इतरांचा कोणत्याही प्रकारचा विरोध होत असला, तरी ही प्रक्रिया महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी व निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी राबविण्यातच येणार आहे. प्रथम महापालिकेचे ५१४ मेजर गाळे यांची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. आठ ते दहा दिवसांतच सर्व बाबींची शहानिशा व पूर्तता केली जाईल. या निविदा प्रक्रियेसाठी महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाकडून २६ प्रकारची नियमावली तयार करण्यात आली असून, ते नियम, अटी व शर्ती निविदा धारकासाठी लागू असणार आहेत. त्यांचा भंग होत असेल, तर गाळा परत घेण्याचे अधिकार महापालिकेला असतील.’

गाळे निविदा प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या अटी व शर्तींसंदर्भात चर्चा करण्यासाठी गाळेधारक व व्यापाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती; मात्र या बैठकीस ते उपस्थित राहिले नाही. सूचना व शिफारशीत सुधारणा करण्यासाठी आपली तयारी आहे. यावर आपण चर्चा करण्यासाठी तयार होतो; पण तसे झाले नाही. महापालिकेचे हित महत्त्वाचे असून, यासाठी कोणत्याही प्रकारचा विरोध आपण पाहणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट करतानाच हेच पॅटर्न अन्य महापालिकेनेही आपल्याकडून मागवून घेतल्याचे त्यांनी सांगितले.

‘शहरात शासकीय निमशासकीय व खासगी जागांवरील डिजिटल फलक लावण्याची निविदा काढण्यात आली आहे. एका वर्षासाठी एक कोटी ५९ लाख रुपये अशी निविदा किंमत आहे. फलके लावण्यासाठीचे दर निश्‍चित करण्यात आले आहेत, तर खासगी जागेवर डिजिटल फलक लावताना खाजगी मिळकतदारांनी महापालिकेची परवानगी घेणे जरुरीचे आहे. पाणीपुरवठा विभागाकडून नळ जोडणीच्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. त्याची प्रक्रियाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे,’ असेही डॉ. ढाकणे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link