Next
अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी
BOI
Saturday, December 02, 2017 | 04:00 AM
15 0 0
Share this article:

‘तू माझी अन् तुझा मीच ही खातर ना जोवरी, प्रीतीची हूल फुकट ना तरी!’ म्हणणारे लोकप्रिय कवी आणि लेखक अनंत काणेकर आणि प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे डॉ. अ. वा. वर्टी यांचा दोन डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
........ 
अनंत काणेकर 

दोन डिसेंबर १९०५ रोजी मुंबईत जन्मलेले अनंत आत्माराम काणेकर हे प्रख्यात लोकप्रिय कवी, लेखक आणि पत्रकार! त्यांची भाषा अतिशय रंजक, चुरचुरीत आणि खेळकर असायची. त्यांचं लेखन चौफेर होतं. त्यांनी लघुनिबंध लिहिले, लघुकथा लिहिल्या, कविता लिहिल्या, प्रवासवर्णन लिहिलं आणि नाटकंसुद्धा लिहिली. त्यांनी काही वर्षं ‘चित्रा’ मासिकाचं संपादनही केलं होतं. त्यांचा कम्युनिझमकडे ओढा होता.

‘माणूस’ सिनेमासाठी त्यांनी लिहिलेलं ‘आता कशाला उद्याची बात हे मजेशीर गाणं चांगलंच गाजलं होतं. त्यांच्या सौंदर्यदृष्टीचा प्रत्यय त्यांच्या कवितांमधून येतो. काहीशी मिश्कील अंगाने जाणारी ही प्रियकराची ‘मन की बात’ मांडणारी त्यांची कविता त्यांच्यात लपलेला खेळकर रसिक दाखवून देते -

‘तू माझी अन् तुझा मीच’ ही खातर ना जोवरी
प्रीतीची हूल फुकट ना तरी!
गालाला पडते खळी मला पाहुनी
ही नजर पाहते धरणी न्याहाळुनी
भयभीत प्रीत थरकते लीन लोचनी
ओठांची थरथरत पाकळी, बोल गडे, झडकरी
प्रीतीची हूल फुकट ना तरी!
जिवाजिवांची अभंग जडली जोड असे ही जरी
भीती मग कोणाची अंतरी?
ही गांठ भिडेची गळ्या लाविल
हिरव्याची पिवळी पाने ही होतील
प्रीतीच्या फुलांचा वास उडुनि जाइल
फसाल पुरत्या, बसाल गाळित घळघळ अश्रूझरी
प्रीतीची हूल फुकट ना तरी!

भारत सरकारतर्फे त्यांचा ‘पद्मश्री’ देऊन सत्कार करण्यात आला होता. त्यांना सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कारसुद्धा मिळाला होता. 

चार मे १९८० रोजी त्यांचं निधन झालं.

(अनंत काणेकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
........................
डॉ. अनंत वामन वर्टी 

दोन डिसेंबर १९११ रोजी जळगावमध्ये जन्मलेले डॉ. वर्टी हे प्रामुख्याने विनोदी कथाकार म्हणून ओळखले जातात. एकीकडे ५००हून अधिक कथा लिहिताना त्यांनी एकांकिका आणि नाटकंसुद्धा लिहिली. आपल्याच कादंबरीवर त्यांनी लिहिलेलं ‘राणीचा बाग’ हे नाटक रंगभूमीवर खूपच गाजलं आणि त्याचे ३००हून अधिक प्रयोग झाले होते. त्यांनी काही काळ ‘अमृत’ मासिकाचं संपादन केलं होतं. त्यांना ‘इंदूर साहित्य सभा’ पुरस्कार आणि ‘सर्वोत्कृष्ट नाटककार’ पुरस्कार मिळाले होते. 

अभिनय, नवधर्म, उंदऱ्यामांजऱ्या, कठपुतळी, पसारा, आपले शरीर, साक्ष इतिहासाची अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

दोन फेब्रुवारी १९८७ रोजी त्यांचा मृत्यू झाला. 

(डॉ. वर्टी यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search