Next
दिव्यांगांना भाजपा सरकारने न्याय दिला, निवडणुकीत कमळाचे बटण दाबा - राजेंद्र पुरोहित यांचे आवाहन
BOI
Tuesday, February 14, 2017 | 10:29 AM
15 0 0
Share this article:

भारतीय जनता पार्टीच्या केंद्र व राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी गेल्या अडीच वर्षांत चांगले काम केले असून अनेक प्रलंबित प्रश्न सोडविले आहेत. दिव्यांगांसाठी भाजपाच्या कामाचा आपल्या शहरात व जिल्ह्यातही लाभ होण्यासाठी महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकीत कमळाचे बटण दाबा व भाजपाला मत द्या, असे आवाहन भाजपा प्रदेश दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र पुरोहित यांनी सोमवारी केले.

मा. राजेंद्र पुरोहित म्हणाले की, दिव्यांगांच्या रोजगारनिर्मितीसाठी महापालिका, जिल्हा परिषदा व ग्रामपंचायतींकडे निधी दिला जात असे पण तो त्यांच्यापर्यंत पोहचत नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने निर्णय घेऊन दिव्यांगांचा निधी थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे दिव्यांगांच्या रोजगारनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला व त्यांना न्याय मिळाला. राज्य सरकारच्या दबावामुळे मुंबई महापालिकेने दिव्यांगांच्या कल्याणासाठीचा निधी बेस्टला दिला व त्यामुळे मुंबईत दिव्यांगांना बसने मोफत प्रवास करता येतो. राज्य सरकारच्या पुढाकाराचा महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये दिव्यांगांना पुरेपूर लाभ होण्यासाठी या संस्थांमध्येही भाजपाची सत्ता आवश्यक आहे.

मा. राजेंद्र पुरोहित यांनी सांगितले की, दिव्यांगांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यात विशेष कायदा केला व त्यामुळे दिव्यांगांच्या रोजगार व पुनर्वसनासाठी मदत होणार आहे.रेल्वे फलाटांवर दिव्यांगांच्या सोईसाठी मोठ्या संख्येने लिफ्ट बसविण्यात येत आहेत. दिव्यांगांची वर्गवारी पूर्वी सात घटकांमध्ये होती त्या ऐवजी केंद्र सरकारने दिव्यांगांचे २१ प्रवर्ग निर्माण केले व त्यामध्ये गतिमंदांचाही समावेश केला. दिव्यांगांना सवलतीने रेल्वे प्रवास करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग सुविधा उपलब्ध करण्यात आली. अपंगांविषयी समाजात आदरभाव निर्माण व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढाकार घेऊन दिव्यांग असा शब्द रुढ केला.

त्यांनी सांगितले की, दिव्यांगांना सार्वजनिक संस्थांमध्ये प्रवेश करणे व वावरणे सोपे व्हावे म्हणून सुगम्य भारत अभियान केंद्र सरकारने देशभर चालू केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने या अभियानात पुढाकार घेतला आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर दिव्यांगांना सरकारी सेवांचा अधिक चांगला लाभ घेता येईल. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडूंची राज्य सरकारमध्ये अन्य खेळाडूंप्रमाणे थेट भरती करणे, दिव्यांग मूल जन्माला आले तर त्याच्या संगोपनासाठी विशेष दोन वर्षांची रजा देणे, राज्य सरकारने सव्वा दोन वर्षांमध्ये दिव्यांगांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी ३५ पेक्षा जास्त विशेष आदेश काढले.

दिव्यांगांसाठी केंद्र व राज्य सरकारने केलेले काम ध्यानात घ्यावे. विकासाचे हे परिवर्तन आपल्या शहरात व जिल्ह्यातही होण्यासाठी आगामी निवडणुकीत भाजपाला मत द्यावे, असे आवाहन पुरोहित यांनी सर्व दिव्यांगांना व त्यांच्याविषयी जिव्हाळा असलेल्या सर्वांनाच केले आहे.
 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search